MNS : मनसेचा उदय, पण सातत्याचा अभाव का?

    03-Jan-2026   
Total Views |
 
MNS
 
मुंबई : (MNS) मराठी माणसाचा हक्क, अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मराठीसाठीच्या विविध आंदोलनांमुळे मनसे पक्ष अधिक प्रकाशझोतात आला. (MNS)
 
मराठी तरुणांना नोकऱ्या, दुकानांची फलके मराठीत असणे, मराठी भाषेची संस्कृती आणि इतिहासाचे संवर्धन यासाठी मनसेने विविध आंदोलने केलीत. यामुळे 'स्वाभिमानी मराठी पक्ष' अशी स्वतंत्र ओळख या पक्षाला मिळाली. याचा कधी फायदा तर कधी नुकसानही सहन करावे लागले. २००९ हे वर्ष मनसेसाठी गेमचेंजर ठरले. तेव्हाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे (MNS) १३ आमदार निवडून आले. स्थापनेनंतर ३ वर्षातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा जनाधार मिळाला. पण त्यानंतर मात्र, पक्षाला विधानसभेत यश मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. अर्थात, अजूनही तो संघर्ष सुरुच आहे. (MNS)
 
हेही वाचा :  Vinod Kulkarni : साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला!
 
मुंबई महापालिकेतील बलाबल
 
पुढे मनसेने (MNS) मुंबई महापालिकेकडे आपला मोर्चा वळवला. २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेचे तब्बल २८ नगरसेवक निवडून आलेत. हा त्यांच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत मात्र, मनसेला एक अंकी जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी मनसेचे ७ उमेदवार निवडून आलेत, त्यातीलही ६ नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी पळवले होते. विशेष म्हणजे आता याच उद्धव ठाकरेंसोबत युती करत राज ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. (MNS)
 
वेळोवेळी बदलत्या राजकीय भूमिका
 
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. २०१९ ला त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर २०२४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वबळावर लढवली आणि त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली आहे. ठाकरे बंधूंची ही युती म्हणजे राजकीय अपरिहार्यता आहे. शिवाय ही संपूर्ण पार्श्वभूमी पाहता भविष्यात आणखी होऊ घातलेल्या वेगवेगळ्या निवडणूकांमध्ये राज ठाकरे यांची भूमिका अनिश्चितच म्हणावी लागेल. (MNS)
 
हेही वाचा : Khopoli Case: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणावर त्यांच्या मुलीची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाली, मारेकऱ्यांना...  
 
भाषणांनी पक्ष चालत नाही
 
राज ठाकरे यांची भाषणे बरीच प्रभावी असतात. शिवाय त्यांच्या भाषणांचाही एक वेगळा चाहतावर्ग आहे, असे म्हणतात. परंतू, पक्ष केवळ भाषणांनी चालत नाही, तर जोडीला सातत्य, ठोस भूमिका, संघटन आणि उत्तम नेतृत्वही लागते. शिवाय एक गोष्ट बारकाईने बघितल्यास, निवडणूका असल्या तेव्हाच राज ठाकरे हे अधिक सक्रीय दिसतात. इतरवेळी ते विजनवासात असतात, असेही म्हटले जाते. त्यामुळेच राज ठाकरे यांनी भाषणांच्या पलीकडे जात अधिक सक्रीय होऊन संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. (MNS)
 
 
MNS

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....