REVIEW : कलाकार-विषयाचं पॅकेज भारी, पण सरप्राईज मात्र गायब!

    03-Jan-2026
Total Views |

 
मराठी भाषा आणि मराठी शाळांचा मुद्दा बरेचदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आता ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीतही यावरून वाद-प्रतिवाद रंगताना दिसतात. तेव्हा अशाच या बहुचर्चित विषयावर भाष्य करणारा मराठी चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट दि. १ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात मोठी आणि तितक्याच तगड्या कलाकारांची फौजसुद्धा पाहायला मिळते.
 
अलिबागमधील ‘क्रांतिज्योती विद्यालय’ नावाची मराठी माध्यमाची शाळा. या शाळेतील बरेचसे विद्यार्थी शिकून मोठे झाले आणि आता ते जगभरात स्थायिक आहेत. जवळपास सगळ्यांनीच आपापली प्रगती साधली. विद्यार्थी मोठे झाले; पण शाळा तिथेच राहिली. जशी होती तशीच. जीर्ण, जुनी आणि मोडकळीस आलेली. त्यातच विद्यार्थीसंख्याही घटली आणि मराठी माध्यमांच्या या शाळेचे महत्त्वही काहीसे कमी झाले. त्यातच ही शाळा काही दिवसांनीच जमीनदोस्त करून तिथे नवी इंटरनॅशनल दर्जाची, आधुनिक पद्धतीची शाळा उभारण्याचे नियोजनही सुरू असते. अशाच वेळी शाळेचे माजी विद्यार्थी एक मेळावा आयोजित करतात. या मेळाव्यासाठी मग माजी विद्यार्थ्यांची पावले आपसूकच गावाकडे वळतात आणि इथून खर्‍या कथेला सुरुवात होते.

हे विद्यार्थी म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे आणि त्यांचे शिक्षक, आताचे शाळेचे मुख्याध्यापक सचिन खेडेकर म्हणजेच दिनकर शिर्के. या सगळ्यांभोवतीच या चित्रपटाची कथा रुंजी घालते. पण, या मेळाव्यामध्ये एकाएकी ‘ट्विस्ट’ येतो. ही शाळेची जागा बळकावण्यासाठी जगताप नावाचा गुंडवजा विकासक पुढे सरसावतो. मग, हे सगळे माजी विद्यार्थी आणि मुख्याध्यापक मिळून या सगळ्या परिस्थितीचा कसा सामना करतात, यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
 
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांनी केले असून, ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ सारख्या यशस्वी चित्रपटांनंतर त्यांच्याकडून मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा साहजिकच उंचावल्या आहेत. यावेळीही हेमंत ढोमे यांनी चित्रपटाच्या विषयाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा लीलया हाताळला आहे. मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, अधिकाधिक पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवले, तरच मराठी भाषा आणि शिक्षण संस्था जिवंत राहतील, हा विचार चित्रपटाच्या केंद्रस्थानी दिसून येतो. आजच्या काळात अत्यंत आवश्यक आणि कालसुसंगत असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न ढोमे यांनी केला आहे.
 
हेमंत ढोमे यांनी हा विषय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्यामागचा हेतू स्पष्टपणे जाणवतो. चित्रपटातील काही प्रसंगांत भावनिक स्पर्श आहे, तर काही ठिकाणी संवाद प्रभावी वाटतात. मात्र, इतका महत्त्वाचा आशय असूनही सादरीकरणात अपेक्षित ती धार आणि ठसकेबाजपणा जाणवत नाही. विषयनिवड चांगली असली, तरी त्याची मांडणी अधिक प्रभावी आणि वेगळी असायला हवी होती, असे जाणवते. कलाकारांची फौजही तितकीच दमदार आहे. सिद्धार्थ, अमेय, क्षिती, हरीश आणि निर्मिती सावंत यांसारखे अनुभवी कलाकार आपल्या भूमिकांमध्ये प्रामाणिकपणे वावरतात आणि अभिनयाच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाहीत. मात्र, हेमंत ढोमेंच्या चित्रपटांमध्ये हेच चेहरे काहीसे सातत्याने दिसत असल्याने त्यात थोडासा एकसुरीपणा जाणवतो. इतक्या ताकदीच्या कलाकारांसोबत काही नवीन चेहर्‍यांची जोड दिली असती, तर चित्रपटाला नवी ऊर्जा आणि ताजेपणा नक्कीच प्राप्त झाला असता. तरीही, कादंबरी कदम आणि सचिन खेडेकर हे दोन्ही नवे चेहरे चित्रपटात दिसतात.
 
विशेष म्हणजे, इतक्या कसदार कलाकारांची फौज असूनही, चित्रपटातील विनोद प्रामुख्याने हलक्या-फुलक्या स्वरूपाचेच राहतात. ज्या ठिकाणी प्रेक्षकांना पोट धरून हसवणारी किंवा वेगळ्या धाटणीची कॉमेडी अपेक्षित असते, तिथे हा चित्रपट फारसे धाडस करताना दिसत नाही. कथानकाची दिशा सुरुवातीलाच स्पष्ट होत असल्याने पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधता येतो आणि त्यामुळे कुतूहल टिकून राहत नाही. चित्रपटातील काही संवाद संस्मरणीय असले, तरी अनेक प्रसंग अतिशय सहज, साधे आणि काहीसे बटबटीतही वाटतात. जी धमाल, जो वेगळा दृष्टिकोन किंवा अनपेक्षित ट्रीटमेंट प्रेक्षकांना हवी असते, ती इथे अभावानेच दिसते. परिणामी, चांगला विषय, प्रामाणिक प्रयत्न आणि उत्तम कलाकारांची फौज असूनही चित्रपट अपेक्षांच्या पूर्ण उंचीपर्यंत पोहोचत नाही, अशी खंत शेवटी मनात राहून जाते. याशिवाय, चित्रपटाची लांबी आणखी कमी ठेवता आली असती.
 
चित्रपटात गाण्यांची संख्या मर्यादित असली, तरी ती कथानकाच्या प्रवाहाशी सुसंगत वाटतात आणि अनावश्यक लांबण न लावता, गोष्ट पुढे नेण्याचे काम करतात. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. पहिल्याच चित्रपटात तिने सहजसुंदर आणि प्रभावी अभिनय करत आपली छाप पाडली आहे. तसेच अमेय वाघने साकारलेली आगरी तरुणाची भूमिकादेखील विशेष लक्ष वेधून घेते. अभिनेते सचिन खेडेकर यांची उपस्थितीही चित्रपटात उठून दिसते. याशिवाय, अलिबागच्या निसर्गरम्य परिसरातील चित्रीकरण हीदेखील चित्रपटाच्या जमेच्या बाजूंपैकी एक म्हणावी लागेल. समुद्रकिनारे, हिरवळ आणि खुले वातावरण चित्रपटाला दृश्यात्मक सौंदर्य देतात. एकूणच अभिनय, संगीत आणि लोकेशन यांच्या जोरावर चित्रपटाच्या काही बाजू नक्कीच भक्कम ठरतात आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. तेव्हा, या नव्या वर्षात कुटुंबासह मराठी चित्रपट पाहायचा असेल, तर ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट तुम्हाला नक्कीच पाहता येईल.
 
दिग्दर्शन, लेखन : हेमंत ढोमे
 
निर्माती : क्षिती जोग
 
कलाकार : सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, अनंत जोग
 
संकलन : भावेश तोडणकर
 
रेटिंग : २.५ स्टार
 
- अपर्णा कड