धर्मेंद्र-असरानींच्या शेवटच्या आठवणींना उजाळा ( Film Review )

    03-Jan-2026
Total Views |
Ikkis
 
१९७१चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्याच्या बर्‍यावाईट स्मृतींची आजही चर्चा होते. अनेक दिवस चाललेलं हे युद्ध प्रत्येक क्षणी एक नवीन कहाणी लिहित होते. अशीच आणखीन एक जळजळीत आणि तितकीच हळवी, खरी कहाणी ‘इक्कीस’ या नव्या हिंदी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि गोवर्धन असरानी यांनी एकामागोमाग २०२५ मध्ये जगाचा निरोप घेतला. या दोघांनाही एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची शेवटची संधी हा चित्रपट देतो. दि. १ जानेवारीला नव्या वर्षाच्या मुहुर्ताला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला आहे. सध्या बरेच देशभक्तीपर चित्रपट येत आहेत पण हा चित्रपट काहीसा वेगळा आहे.
 
‘इक्कीस’ची सुरुवात १९७१च्या युद्धातील प्रभावी फ्लॅशबॅकने होते. ‘इक्कीस’ म्हणजेच २१. एक असं वय, जे एका क्षणात थांबतं. "वो इक्कीस का था और इक्कीस ही रहेगा” हे वाय धर्मेंद्र यांच्या तोंडी येतं आणि त्याच क्षणी संपूर्ण चित्रपटाची भावनिक खोली प्रेक्षकांच्या लक्षात येते.
 
या चित्रपटाची गोष्ट आहे टँक कमांडर अरुण खेत्रपाल यांची, ज्यांना अवघ्या २१व्या वर्षी परमवीर चक्राने गौरवण्यात आलं. अत्यंत कमी वयात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणार्‍या या जवानाचे वडील ब्रिगेडियर एम. एल. खेत्रपाल (धर्मेंद्र) हे स्वतःही देशसेवेतून निवृत्त झालेले अधिकारी असतात, तर आजोबाही सैन्यातील अधिकारी. अशा गौरवशाली सैनिकी पार्श्वभूमीत वाढलेला अरुण ‘एनडीए’मध्ये शिक्षण घेत ‘कमांडर’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतो.
 
चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या काळात उलगडत जाते. एकीकडे १९७१च्या युद्धासाठी भारतीय सैन्याची सुरू असलेली जोरदार तयारी आणि दुसरीकडे वर्तमानकाळात कारगिल युद्धानंतरच्या (२००१-०२) काळात एम. एल. खेत्रपाल कॉलेज रियुनियनसाठी पाकिस्तानला जातात. तिथे त्यांचे आदरातिथ्य ब्रिगेडियर मोहम्मद निसार (जयदीप अहलावत) आणि त्यांचे कुटुंब करते. या भेटीदरम्यान काही धक्कादायक सत्ये समोर येतात. मात्र, त्याने खचून न जाता, एका खर्‍या योद्ध्याप्रमाणे त्यांना सामोरे जाण्याची खेत्रपाल यांची वृत्ती, ‘एक सैन्य अधिकारी कसा असावा’ याचे ठळक उदाहरण ठरते. अरुणच्या कारकिर्दीची सुरुवात, त्याचा कामातील जोश, शिस्त, आणि युद्धात उतरतानाची मानसिक तयारी हे सारे टप्पे चित्रपट हळुवारपणे उलगडतो.
 
चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. राघवन हे चित्रपटातील बारकावे अगदी उत्कृष्टरित्या टिपतात आणि हीच त्यांच्या चित्रपटाची खासियतसुद्धा आहे. ‘इक्कीस’मध्येही ते आपल्याला पाहायला मिळते. ‘इक्कीस’ हा उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचं उदाहरण आहे. कमीत कमीत ‘व्हीएफएस’ वापरलेला हा सिनेमा म्हणता येईल. खरेखुरे रणगाडे (फायटर टँस) चित्रीकरणासाठी वापरले गेले आहेत. त्यातील बारकावे, एका कमांडरसाठी त्यात घर समजून दिवसेंदिवस राहणं, आपल्या टीमसह जुळवून घेणं, हे सगळं दिग्दर्शक राघवन यांनी मोठ्या पडद्यावर दाखवलं आहे.
 
त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या चित्रपट फारच सुंदर साकारला आहे. पण, पटकथा आणि मूळ गाभा यामध्ये बरीच विसंगती संपूर्ण चित्रपटात पाहायला मिळते. दोन वेगवेगळ्या काळात चित्रपट आपल्याला घेऊन जातो, तेव्हा धर्मेंद्र हेच सिनेमाचे हिरो असल्याचं पाहायला मिळतं. जेव्हा की अगत्स्य नंदा याने अरुण खेत्रपाल हे मुख्य पात्र साकारलं आहे. अगत्स्य याचा हा ‘आर्चिज’नंतर दुसरा सिनेमा आहे. २१ वर्षीय अरुण हे पात्र अगत्स्यला समर्पक असे. पण, ते अजिबातच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अगत्स्यला आणखी बरीच मेहनत घेण्याची गरज आहे. बिग बी अमिताभ यांचा नातू अगत्स्य मध्ये मध्ये आपल्याला अभिषेक बच्चनचा भास करवून देतो. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात जयदीप अहलावत, सिकंदर खेर, विवान शाह, सुहासिनी मुळे, राहुल देव, एकवली खन्ना, सिमर भाटिया, अवनी राय, दीपक डोबरियाल, गोवर्धन असरानी असे बरेच कलाकार आहेत.
 
एकूणच हा चित्रपट युद्ध कशाप्रकारे वाईट आहे याचेच उदात्तीकरण करताना दिसतो. तथापि, ‘मुर्ख बहादूर असतो की बहादूर मुर्ख हा निर्णय युद्धच करते’ यांसारखे संवाद चित्रपटाला ठोस बळ देतात. देशभक्तीपर चित्रपटात गाणी नक्कीच असायला हवी होती. पण, चित्रपटात एकही लक्षात राहावं किंवा चित्रपट संपल्यानंतर ओठांवर रेंगाळावं असं एकही गाणं ऐकायला मिळत नाही. कोणत्याही चित्रपटाचे संगीत ही त्याची जमेची बाजू असते. विशेषतः देशभक्तीपर चित्रपटांमध्ये ते यात कुठेच आढळत नाही. देशभक्तीपर चित्रपट म्हणजे मोठमोठे संवाद आणि घोषवाक्य असा जमाना जरी गेला असला, तरी या व्यतीरिक्तसुद्धा हा सिनेमा फार हृदयाला भिडत नाही. धर्मेंद्र यांचं शेवटचं आणि उत्तम काम पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्की पाहू शकता.
 
दिग्दर्शक: श्रीराम राघवन
 
कलाकार: धर्मेंद्र, अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत, सिकंदर खेर, विवान शाह, सुहासिनी मुला, राहुल देव, एकवली खन्ना, सिमर भाटिया, अवनी राय, दीपक डोबरियाल, असरानी
 
निर्मिती : मॅड्डॉक फिल्म्स
 
रेटिंग: ३ स्टार
 
- अपर्णा कड