भाजपची विजयी घोडदौड पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरात सुरू झालेली दिसते. पुण्यातून मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे दोन भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर पिंपरी-चिंचवडमधून रवी लांडगे हे भाजप उमेदवार बिनविरोध आले आहेत. एकंदरीतच स्थानिक राजकारणातील सुरेल नांदीचा हा प्रयोग आणखीन रंगतदार होणार, त्याची ही चुणूक. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणूक रणसंग्रामानंतर अर्थात आता संक्रांतीनंतर या दोन्ही महापालिकेत लोकशाही प्रक्रियेनुसार महापौर आणि नवे सदस्य आगमन करणार आहेत. तिघांनी भाजपची विजयी पताका झळकावत ठेवली आहे. गेली जवळपास तीन वर्षे हा कारभार प्रशासकांच्या भरोशावर सुरू होता. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची तेथे उणीव भासत होती. परिसराचा विकास करण्यासाठी असलेली ही लोकशाही प्रक्रिया रीतसर आटोपली.
राजकीय पक्षांपेक्षा समाजमाध्यमांवर जे लोक व्यक्त होत आहेत, ते केवळ भ्रष्टाचार कसा बोकाळला आणि त्याच्या रीती कशा आहेत, हेच उलगडून सांगत आहेत. यात तथ्य नाही हे सिद्ध करणे, हेच मोठे आव्हान आहे. लोकांनी या सदस्यांना आपल्या प्रभागातील मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी आणि प्रगतीसाठी निवडून दिले आहे. सुदैवाने राज्यात मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर पुण्यासह आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विकासकामांना गती मिळाली.हीच विकासाची ‘री’ ओढून आता नव्या नगरसेवकांना आपला परिसर विकसित करावा लागणार आहे. देशाच्या आर्थिक विकासात ही महानगरे आपला वाटा उचलत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी अनेक उच्चशिक्षित आणि विकासाचे व्हिजन असलेली तरुण मंडळी रिंगणात आहेत. बदलत्या काळानुसार ‘हायटेक’ विकास करावा लागणार आहे. वाहतुककोंडीची समस्या असली, तरी भुयारी मार्गासारखे उपाय उपयुक्त ठरणार आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे आवश्यक आहे. मेट्रोला मिळालेला प्रतिसाद हे त्याचे यश आहे. नागरिक आणि नव्या नगरसेवकांचा हा ताळमेळ योग्य असेल, तरच भविष्यातील विकासाची दिशा निश्चित असल्याचे मानले जाईल. निव्वळ क्षुद्र गोष्टींवर राजकारण होत राहिले, तर काही खरे नाही.
नवे संकल्प...
पुणे महानगरात अनेक विकासकामे वेगाने होत आहेत, तर काही रखडलेली आहेत. ‘नदी सुधार प्रकल्प’ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो रखडला आहे. वाहतुककोंडीवर उपाय शोधण्याचे कामही सुरू आहे. ‘मिसिंग लिंक’ हा त्यावर प्रभावी मानला जात आहे, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यात आता भुयारी मार्ग हा उपायदेखील शोधण्यात आला आहे. जुन्या पुण्याचे आकारमान पाहता, रस्ते विस्तारित करणे अशय आहे. त्यासाठी हा मार्ग उत्तम मानला जातो. येरवडा ते कात्रज हा २० किमी लांबीचा भुयारी मार्ग केला जाणार आहे. या मार्गाची व्यवहार्यता-यश तपासल्यावर शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या नेहमीच्या वर्दळीच्या मार्गावर, तसेच स्वारगेट ते शनिवारवाडा असे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. यासाठी सात हजार, ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुणे परिसरात जवळपास ५८९ किमी लांबीच्या रस्त्यांची १२७ कामे सुरू झाली आहेत.
शिवाय, शहरांतर्गत ८३ किमी वर्तुळाकार रस्त्याचा यात समावेश आहे. हा लिंक कॉरिडोर जर यशस्वी झाला, तर भविष्यात पुण्याची वाहतूक सुरळीत झालेली दिसणार आहे.
नद्यांच्या शुद्धतेची कामे वेळीच झाली, तर वाहन आणि प्रदूषणाची समस्या सुटणार आहे. पार्किंगची समस्या सुटली, तर ज्येष्ठांना पदथावरून चालणे सुकर होणार आहे. छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसाय-विक्रीसाठी जागेचा प्रश्न हे मोठे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीनेदेखील कामे व्हायला हवीत. नालेसफाई हादेखील एक मूलभूत प्रश्न शहरात डोके वर काढीत आहे. त्यामुळे यावर प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. निवडून येणार्या आता ‘मनपा’च्या नव्या सदस्यांनी जर प्राधान्याने काम करण्याचा संकल्प केला, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. विकासाची दृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळे सहकारी विकासाचे व्हिजन घेऊनच कामे करीत असल्याचे नागरिकांना माहीत आहे. नवे येणारे नगरसेवक हा विकासाचा संकल्प घेऊनच कार्य करतील, हीच पुणेकरांची अपेक्षा!
- अतुल तांदळीकर