मुंबई : गुवाहाटीमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी अपघातामुळे ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्याबाबत चिंतेची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुवाहाटीतील झू रोड परिसरात झालेल्या या अपघातात आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रूपाली बरुआ जखमी झाले. रात्री १२:०० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार रात्री १२ च्या सुमारास हा अपघात घडला. त्यावेळी दोघेही एका हॉटेलमधून जेवण करुन बाहेर पडले होते.
नेमकं काय घडलं?
प्रत्यक्षदर्शी आणि पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गुवाहाटीतील अॅड्रेस हॉटेलजवळ रस्ता ओलांडत असताना एका वेगवान दुचाकीने या जोडप्याला धडक दिली. धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच गीतानगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात दुचाकीस्वारालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर चाहत्यांकडून आशिष विद्यार्थी यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या दमदार खलनायक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी ओळखले जाणारे आशिष विद्यार्थी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी विविध भाषांमधील सिनेमांमधून आपली छाप उमटवली आहे.
११ पेक्षा अधिक भाषांमध्ये ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आशिष विद्यार्थी यांनी १९८०च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘द्रोहकाल’ या चित्रपटातून त्यांना विशेष ओळख मिळाली आणि या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी बऱ्याच नकारात्मक भूमिका साकारल्या ज्या प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस देखील उतरल्या होत्या.
दरम्यान, या अपघाताचा तपास सुरू असून, पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे. चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांकडून आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.