राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराने मंडित असलेलेले आदरणीय डॉ. अशोकराव मोडक यांना डिसेंबर २०२५ मध्ये चतुरंग संस्थेने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांचे कोणत्याही विषयावरचे व्याख्यान म्हणजे ज्ञान आणि माहितीने परिपूर्ण असलेली बौद्धिक आणि वैचारिक मेजवानी असे. त्यांच्या कोणत्याही व्याख्यानात संस्कृत सुभाषितांची आतशबाजी असे. त्याच वेळी विविध प्रकारचे दाखले, उदाहरणे देत त्यांचे व्याख्यान वसंत ऋतूप्रमाणे बहरलेले आणि शरद पौर्णिमेच्या शीतलतेने श्रोत्यांना शांत आणि समृद्ध करणारे असे. याचा अनुभव अनेक श्रोत्यांनी घेतला आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आणि अभिमानास्पद अशीच होती म्हणूनच त्यांची केंद्रीय विश्वविद्यालय छत्तीसगडच्या कुलाधिपती या पदावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली होती.
विविध प्रकारची सन्माननीय पदे त्यांनी समर्थपणे निभावली आहेत. अनेक शिक्षण संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. विद्यार्थी परिषदेत सुद्धा त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा विद्यार्थ्यांवर ठसवला. शिक्षण मतदारसंघातून यांनी आमदारपद तेवढ्याच ताकदीने आणि समर्थपणे भूषविले.
मनोहर जोशी जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या वेळेची एक छोटीशी पण महत्वपूर्ण घटना कारण या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.
टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्थान अशोकराव मोडक भूषवित असताना मी त्याच कालखंडात टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाचा कार्यवाह होतो. शाळेच्या कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी डाॅ.अशोकराव मोडक यांच्या समवेत मी गेलो होतो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यांचे सचिव बोंगिरवार यांना म्हणाले," आज डॉ. मोडक सरांचे सभागृहात भाषण आहे. तेव्हा तुम्ही अवश्य उपस्थित रहा. त्यांच्या व्याख्यानातील सर्व मुद्दे व्यवस्थित नोंदवून घ्या. कारण अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शन करणारा आमदार आता दृष्टीला पडणे दुर्मिळ झाले आहे." आपल्या सर्वांनाच माहित आहे
त्यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवही करण्यात आला होता.
मे १९८५ मध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याकडे USSR ची सत्ता आली. त्यांनी पेरिस्त्रोइका म्हणजे रशियात आर्थिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचे ठरवले. तशी घोषणाही केली. तसेच ग्लासनस्त म्हणजे मोकळेपणा आणि पारदर्शकता किंवा उदारीकरण करणार असल्याची घोषणा केली. या दोन गोष्टींची जोड देऊन त्या वेळचे रशियाचे राष्ट्रपती मिखाइल गोर्बोचेव यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे केलेल्या भाषणात यांचा उच्चार करून रशियात राजकीय आणि आर्थिक रचना केली. या विषयावरचे त्यांचे टिळक नगरच्या प्रांगणात केलेले व्याख्यान आठवते आणि तसेच ते अनेकांच्या स्मरणात असेल.
डाॅ. अशोकराव मोडक यांची विविध प्रकारच्या विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचा व्यासंग अत्यंत दांडगा होता. असे असले तरी इतर वक्त्यांची व्याख्याने तन्मयतेने ऐकताना त्यांना अनेकांनी पाहिले असेल. एवढेच नव्हे तर व्याख्यात्याचे कौतुक करून त्याला उत्तेजन देण्याचा त्यांचा सहज स्वभाव आहे.
शांत, स्पष्ट आणि संथपणे ते आपला विषय मांडत असत. विविध प्रकारच्या विषयांची आवड असणाऱ्या या विनयशील विद्वानाला काव्यशास्त्र आणि विनोदाचे वावडे नव्हते. गप्पा मारताना मनमोकळेपणाने गप्पा मारण्याचा त्यांचा स्वभाव होता. तसेच हसताना सुद्धा ते मुक्तपणे हसत असत. त्यांचा हा नैसर्गिक स्वभाव त्यांच्या विद्वत्त्तेला बाधा आणत नाही; तर त्यांच्यातील जित्याजागत्या रसिकत्वाचे दर्शन घडवत असे.
त्यांच्या समवेत काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. आपल्यावर होणाऱ्या टीकेचा ही शांतपणे विचार करून त्यात काही तथ्य असेल तर त्याचा स्वीकार करून आपल्यातला दोष, आपल्यातल्या चुका दूर करण्याचा प्रयत्न करणे यावर ते नेहमी भर देत.
त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज कधीही कठोर झाला नाही. संयम आणि विद्वत्ता या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालताना आढळ होत्या. त्यांच्या वाणीतले माधुर्य आणि आपलेपणाची भावना सहजतेने प्रकट होतो होती. अंतरबाह्य शुद्धता आणि विनयशीलता हे त्यांचे गुणवैशिष्ट्य कोणाच्याही मनावर गारुड करणारे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्यांच्या समावेत काम करणाऱ्या प्रत्येकावर पूर्णपणे विश्वास ठेवायचे. त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे स्वाभाविकतेने त्यांच्यापासून काही लपवून ठेवावे अशी भावना मनात निर्माण होत नसे. स्वाभाविकपणे त्यांच्या समवेत काम करताना एक पारदर्शकता निर्माण होत होती. परस्परांविषयीचा विश्वास दृढ आणि नाजूक पण भक्कम असा भावबंध निर्माण होत असे. हेच त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असल्यामुळे त्यांच्या समवेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा त्यांच्याशी आपुलकीचा, आपलेपणाचा नातेसंबंध निर्माण होत असे.
वि.रा.करंदीकर ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अभ्यासक. टिळक नगर शाळेच्या प्रांगणात त्यांचे व्याख्यान झाले. हे व्याख्यान डॉ. अशोकराव मोडक तल्लीनतेने ऐकत असताना अनेकांनी पाहिले आहे. त्यातही वैशिष्ट्य असे की करंदीकरांच्या व्याख्यानातील काही महत्त्वाचे मुद्दे ते आपल्या डायरीत नोंदवत होते. व्याख्यानानंतर त्यांनी करंदीकरांना विनम्रतापूर्वक प्रणाम केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. तीच गोष्ट प्र.न.जोशी यांच्या बाबतीत घडली. त्यांचेही व्याख्यान ऐकून डॉ. अशोकराव मोडक किती भारावून गेले होते ते अनेकांनी पाहिले आहे.
त्यांना श्रद्धांजली वाहताना अशा अनेक आठवणीच्या गर्दीत मन हरवून जाताना कंठ दाटून येतो.
- दुर्गेश जयवंत परुळकर