
या प्रसंगी डॉ. राजा दीक्षित म्हणाले की "कोषवाङ्मय यावर विद्यापीठांमध्ये स्वतंत्र प्रबंध किंवा अभ्यासक्रम व्हायला हवेत. केवळ मराठी भाषेतच २५० ते ३०० कोष आहेत. मराठीत विपुल कोषवाङ्मय आहेत. कोषवाङ्मय कधी आणि का जन्माला आले, याचा सुद्धा विचार व्हायला हवा. अठराव्या शतकामध्ये प्रबोधनाच्या काळात जगभरात कोषवाङ्मयाची निर्मिती झाली. ज्ञानाचे लोकशाहीकरण हा कोषनिर्मितीचा उद्देश आहे, त्यामुळे मुद्रित मध्यामातून डिजिटल माध्यमाकडे जाणे ही काळाची गरज आहे.”
डॉ. नीलिमा गुंडी म्हणाल्या की, "कोषवाङ्मय आणि सूचीवाङ्मय यांचे नाव एकत्र घ्यायला हवे. ज्ञान आत्मसात करण्यासाठी कोषांची निर्मिती होऊ लागली. सूचीवाङ्मयात नेमकी माहिती असते. संक्षिप्त शब्दांचा कोष, तसेच काही परिभाषांचा विचार करून त्याचा शब्दकोष करायला हवा. प्रसिद्ध व्यक्तिरेखांचा कोष करावा. लहान मुलांसाठी सचित्र शब्दकोष करायला हवा. शब्दकोष हा आपल्या पुढच्या पिढीला डोळ्यापुढे ठेवून करणे आवश्यक. शिवाय उच्चारण कोष करणे गरजेचे आहे. अचुकतेविषयी आस्था आणि ओढ वाटायला हवी. नव्या कोषांची सूची दरवर्षी व्हायला हवी. ज्ञानरंजक स्पर्धा घ्यायला हवी.”
कोषवाङ्मयाचे अभ्यासक मांगीलाल राठोड म्हणाले की, "आपल्याकडे अनेक कोष आहेत. मात्र, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. आपल्या समाजामध्ये अनेक शब्दांचे अपभ्रंश झाल्याने त्या शब्दांचा कार्यशी काय संबंध आहे, हे आपण जाणत नाही. कोषात जे आहे, ते व्यवहारात आणले तर बरेच काम करता येऊ शकते.”
डॉ. साहेब खंदारे म्हणाले, "शब्दांकडे फार जपून बघायला हवे. राजव्यवहाराची भाषा सोपी व्हावी म्हणून कोष निर्माण करण्यात आले. कोषाची प्रणाली नव्या काळानुसार जुळवून घेता येईल अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे. लोकभाषा, बोलीभाषा वेगळी आहे. प्रमाण भाषेचाही सार्थ कोष तयार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोषांचे ज्ञान वाढविण्यासाठी कोषांच्या माध्यमातून खेळ खेळायला शिकवले पाहिजे. कोषांची निर्मिती सामाजिक, सांस्कृतिक मापदंडावर होणे आवश्यक आहे.”

दि. २ जानेवारी रोजी, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ’जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे? या विषयावरील परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रोहन चंपानेरकर (रोहन प्रकाशन), डॉ. मनोज कामत (अर्थतज्ज्ञ), राजीव श्रीखंडे (जागतिक साहित्य पॉडकास्टर, विचारवंत, लेखक), अमृता तांदळे (न्यू इरा प्रकाशन), लेखिका क्षुभा साठे यांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी संदीप तापकीर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अर्थतज्ज्ञ मनोज कामत म्हणाले की, "प्रकाशकांनी फक्त मुद्रित पुस्तके छापण्यापुरता पारंपरिक प्रकार सोडला पाहिजे. एकाच पुस्तकाची माध्यमांतराची क्षमता (पुस्तकाचे नाटक, चित्रपट, मालिका, वेबमालिका, नाटुकल्या, स्कीट्स, ऑडिओ बुस, पॉडकास्ट) प्रकाशकांनी ओळखून वितरणाची योजना आखणे आवश्यक आहे. पुस्तकाचा व्हॉल्यूम (संख्या), व्हॅल्यू (किंमत) आणि स्केल (पोहोच) या तीन मुद्द्यांचा विचार निर्मितीआधीच केला पाहिजे.”
‘रोहन प्रकाशन’चे रोहन चंपानेरकर म्हणाले की, "तरुणाईमध्ये वाचन ही ‘फॅशन’ होणे गरजेचे आहे. तरुणांना जी भाषा आवडते, समजते त्या भाषेत, त्यांच्या आवडीचे विषय पुस्तकांतून मांडले गेले पाहिजेत. आधुनिक काळात ट्रेंडिंग काय आहे, व्हायरल काय आहे, याचा सतत कानोसा घेत, वितरण, जाहिरातीमध्ये सर्जनशील प्रयोग करणारी तगडी टीम प्रकाशकांकडे हवी. लेखकांनीही अधिक प्रयोगशील व्हावे, प्रकाशकांनी गुंतवणूक करण्यास सज्ज असावे, तरच नवे वाचक जोडले जातील.” राजीव श्रीखंडे यांनी प्रकाशन व्यवसायात वाचक हा सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याने, त्याचीही काही जबाबदारी आहे, हा मुद्दा अधोरेखित केला.
"लेखक आणि प्रकाशक यांच्यामध्ये विश्वासाचे नाते जरूर असावे, पण त्यांच्यामध्ये कायदेशीर करारपत्रही अत्यावश्यक आहे,” असे मत ‘न्यू इरा प्रकाशन’च्या अमृता तांदळे यांनी व्यक्त केले. लेखिका क्षुभा साठे यांनी प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत संपादनाचे योगदान असणे गरजेचे असल्याचे मत मांडले. जागतिक पातळीवरचा पुस्तकांचा दर्जा, प्रमोशन यांचा अभ्यास करून, ती तत्त्वे अंगिकारण्याचा प्रयत्न केला जावा. किशोर गटासाठी विशेष प्रयत्न केले जावेत, असेही त्या म्हणाल्या.