Third railway line: तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे विदर्भात प्रवाशांना फटका; २४ ते ३१ जानेवारीदरम्यान १४ गाड्या रद्द

    21-Jan-2026
Total Views |
 Third railway line
 
नागपूर : (Third railway line) रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी समोर आली आहे. नागपूर विभागातील राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनच्या जोडणीचे काम सुरू होणार असून, या कामाचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) विभागाने २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या आठ दिवसांच्या कालावधीत एकूण १४ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. (Third railway line)
 
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजनांदगाव–कलमना हा विभाग अत्यंत गजबजलेला असून येथे प्रवासी आणि मालवाहतुकीचा मोठा ताण आहे. भविष्यात गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी तिसरी लाईन आवश्यक असल्याने नॉन-इंटरलॉकिंग (Non-Interlocking) तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या काळात ऐन प्रवासाच्या दिवसांत गाड्या रद्द झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. (Third railway line)
 
हेही वाचा : Vijayraj Bodhankar : ‘ध्वनी’चित्रांमधून उलगडला अमूर्त शब्दसंचिताचा प्रवास
 
या कालावधीत रद्द करण्यात येणाऱ्या १४ गाड्यांमध्ये प्रामुख्याने पॅसेंजर आणि मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. (Third railway line)
 
तुमसर रोड–तिरोडी पॅसेंजर
 
तिरोडी–तुमसर रोड पॅसेंजर
 
इतवारी–तिरोडी पॅसेंजर
 
बालाघाट–इतवारी–तिरोडी मेमू स्पेशल
 
दुर्ग–गोंदिया मेमू
 
गोंदिया–दुर्ग मेमू
 
इतवारी–गोंदिया मेमू
 
गोंदिया–इतवारी मेमू
 
डोंगरगड–गोंदिया मेमू स्पेशल
 
गोंदिया–डोंगरगड मेमू
 
याशिवाय काही गाड्या पूर्ण मार्गावर न धावता अर्ध्या मार्गावरच थांबवण्यात येणार आहेत. विशेषतः तुमसर रोड ते तिरोडी दरम्यानच्या सर्व डेमू गाड्या मध्यावरच थांबवल्या जातील, तर बालाघाट–तिरोडी दरम्यानच्या डेमू गाड्याही अंतिम स्थानकापर्यंत पोहोचणार नाहीत. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसणार आहे. (Third railway line)
 
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, स्थानकावर येण्यापूर्वी १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपवर आपल्या गाडीची स्थिती तपासून घ्यावी. रद्द झालेल्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पर्यायी खासगी वाहने किंवा बससेवेचा आधार घ्यावा लागणार आहे. (Third railway line)