पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज शरीफ या पाकिस्तानच्या राजकारणात उठावदार ड्रेसिंग सेन्ससाठी विशेष ओळखल्या जातात. त्यांचा मुलगा जुनेद याचा विवाह नुकताच मोठ्या थाटामाटात नुकताच पार पडला. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वार्यासारखे व्हायरलही झाले. विशेष म्हणजे, वधूने लाल रंगाची भारतीय डिझाईनची साडी परिधान केली होती. मात्र, देशाची आर्थिकस्थिती गंभीर असतानाही मरियम नवाज यांनी आपले नवाबी थाट काही सोडले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेने नाराजी व्यक्त केली. खरं तर या लग्नात वधूपेक्षाही सासूबाई मरियम यांच्या नवाबी थाटाची चर्चा अधिक रंगली. मुलाच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात मरियम नवाज एखाद्या ‘महाराणी’पेक्षा कमी भासत नव्हत्या. म्हणूनच समाजमाध्यमांवर मरियम यांच्या राजेशाही अवताराची तुलना त्यांच्या चाहत्यांनी जुन्या रियासतांतील राण्यांशीच केलीय.
मघाशी म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानची आर्थिकस्थिती गंभीर असून, याठिकाणी गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असा अंदाज आहे की, पाकिस्तानातला प्रत्येक माणूस दिवसाला फक्त ५८५ रुपये कमावतो. तेथील ८४ टक्के लोकसंख्या ही दारिद्य्ररेषेखाली. सुमारे ४० टक्के लोक दररोज ३.६५ डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्नावर जगत आहेत. म्हणजे दर दहापैकी चार लोक अत्यंत गरिबीशी झुंजत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सतत बुडत असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे अनेकदा मदतसुद्धा मागितली; पण पाकिस्तानची कृती आणि परिस्थिती पाहता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीदेखील पाकिस्तानला पैसे द्यायला तयार नाही. ग्रामीण भागात तर याहून भीषण परिस्थिती.
असा अंदाज आहे की, पाकिस्तानमध्ये सुमारे २० दशलक्ष लोक बेघर झाले आहेत. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे नऊ टक्के इतकी. त्यापैकी बहुतेक लोक तात्पुरत्या निवार्यांमध्ये, आश्रयस्थानांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अगदी रस्त्यांवर राहतात. खरेतर पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहराच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. ही संख्या अंदाजे ५९ लाख इतकी. याव्यतिरिक्त, सुमारे दोन लाख लोक रस्त्यांवर झोपतात, असे मानले जाते. पाकिस्तानची परिस्थिती इतकी भीषण असतानाही, पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांना नवाबी थाट मिरवताना पाकिस्तानी आवामची दयनीय अवस्था मात्र डोळ्यासमोर आली नाही.
२०१८ मध्ये पाकिस्तान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मरियम यांनी आपली मालमत्ता २.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २४ कोटी, तीन लाख, ४४ हजार, ७५० रुपये) असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या नावावर एक हजार, ५०६ कनाल (सुमारे १८८ एकर) कृषी जमीन आहे आणि विविध कंपन्यांमध्ये त्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक केलेली आहे. त्यांचे वडील नवाज शरीफ यांच्याकडेसुद्धा पाकिस्तानचे सर्वात धनाढ्य राजकारणी म्हणून पाहिले जाते. २०११ मध्येच त्यांच्याजवळ १६.६ कोटी रुपयांची मालमत्ता होती, विचार करा आज काय चित्र असेल. याचबरोबर लाहोरच्या रायविंडजवळ जट्टी उमरा येथे शरीफ यांचा एक राजवाडा आहे. नवाज यांचे ‘रायविंड पॅलेस’ एक हजार, ७०० एकरात पसरले असून, त्यामध्ये विविध प्रकारच्या आलिशान सोयीसुविधा आहेत. नवाज यांच्या आई, पत्नी आणि मुलीच्या प्रवेशासाठी खास वेगळा प्रवेशद्वार याठिकाणी होता. हा बंगला पाकिस्तानच्या सर्वात आलिशान बंगल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
एकीकडे पाकिस्तानातील कोट्यवधी जनता दोनवेळच्या अन्नासाठी झगडत आहे. बेघरपणा, बेरोजगारी आणि महागाईने सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले आहे; तर दुसरीकडे सत्तेच्या शिखरावर बसलेले नेते आणि त्यांचे कुटुंबीय राजेशाही थाटात लग्नसमारंभ साजरे करताना दिसतायत. मरियम नवाज यांचा नवाबी अवतार हा केवळ वैयक्तिक थाटमाट नसून, तो पाकिस्तानमधील सत्ताधारी वर्ग आणि सामान्य जनतेतील प्रचंड दरीचे जिवंत प्रतीक आहे. जोपर्यंत सत्ता ही सेवेसाठी नसून, ऐषोआरामासाठी वापरली जाते, तोपर्यंत पाकिस्तानची गरिबी ही कमी होणार नाही. उलट, ती अधिक खोलवर रुजत जाणार आहे. ही परिस्थिती केवळ आर्थिक अपयश दर्शवत नाही, तर ती संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या नैतिक दिवाळखोरीचे स्पष्ट दर्शन घडवते.