Municipal Elections : नागपूरात उमेदवारासह कुंटुंबाला घरात कोंडले

उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांचा आक्रोष; आ. परिणय फुके यांच्या मध्यस्तीने निघाला तोडगा

    02-Jan-2026   
Total Views |
 
Municipal elections
 
नागपूर : (Municipal elections) राज्यभरात महानगरपालिका निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, नागपूरात एका उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्याला त्याच्याच घरात कोंडून ठेवल्याची घटना घडली. (Municipal elections)
 
नागपूरच्या प्रभाग क्रमांक १३ ड मधील किसन गावंडे यांना भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला होता, पण त्यांचा एबी फॉर्म रद्द झाला. त्यानंतर किसन गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. परंतू, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानुसार ते आपला अर्ज मागे घेण्यासाठी जात होते. मात्र, काही कार्यकर्त्यांसह नागरिकांनी याला विरोध करत त्यांना त्यांच्या घरातच कोंडून ठेवले आणि बाहेरून दाराला कुलूप लावले. यावेळी अनेक समर्थकांनी घराबाहेरच ठिय्या आंदोलनही केले. नागपूरच्या हजारीपहाड भागात एकतरी उमेदवार हवा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. सकाळपासून सुरु झालेले हा हायव्होल्टेज ड्रामा बराच वेळ सुरु होता. (Municipal elections)
 
हेही वाचा : BMC Elections : निवडणूकीच्या तोंडावर मनसेला खिंडार; सामुहिक राजीनामे देत पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश 
 
आ. परिणय फुके यांची मध्यस्ती
 
किसन गावंडे यांच्या घराबाहेर सुरु असलेला हा गोंधळ कळताच आ. परिणय फुके गावंडे यांच्या घरी दाखल झाले. ते चर्चा करण्यासाठी गावंडे यांच्या घरात जाताच कार्यकर्त्यांनी पुन्हा बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर गावंडे यांना सोबत घेऊन परिणय फुके हे पक्षाच्या कार्यालयाकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर परिणय फुके यांच्या मध्यस्तीने पक्षाच्या आदेशानंतर किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. (Municipal elections)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....