नववर्षात भारताची गगनभरारी!

    02-Jan-2026
Total Views |

2025 या वर्षात विक्रमी वाटचाल व उद्दिष्टपूर्तीच्या पार्श्वभूमीवर, ‌‘इस्रो‌’च्या संशोधक-शास्त्रज्ञांनी भारताच्या अवकाशातील गगनभरारीसाठी क्षमता सिद्ध केली आहे. अंतराळ मोहिमेतील यशाची अवघ्या जगाने नोंद घेतली असून, त्यामुळे भारत आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावणे स्वाभाविकच. त्याविषयी सविस्तर...

भारताच्या या यशस्वी अंतराळ अभियानाची पार्वभूमी म्हणजे, 2025 मध्ये विविध टप्प्यांवर भारताने आपल्या यशाची छाप पाडली आहे. याचे श्रेय सर्वस्वी ‌‘इस्रो‌’ व ‌‘इस्रो‌’अंतर्गत बंगळुरू, अहमदाबाद, त्रिवेंद्रम येथील संशोधक-अभ्यासक व त्यांचे मार्गदर्शक यांचे असून, केंद्र सरकारच्या नियोजन-प्रोत्साहनाचासुद्धा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. याआधीच्या दशकांमध्ये भारताच्या अंतरिक्ष धोरण आणि मोहिमेला अभियांत्रिकी-तंत्रज्ञान व अंतराळ विज्ञानाची जोड मिळून होती. या मूलभूत तंत्रज्ञान व अभियांत्रिकीला भारतीय संशोधकांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांची जोड मिळत गेली. यातूनच ‌‘चंद्रयान‌’, ‌‘मंगळयान‌’, ‌‘आदित्य एल-1‌’ यांसारख्या मोहिमांचे यशस्वीपणे क्रियान्वयन झाले. याच यशाचा पुढचा टप्पा म्हणून आता 2025 मध्ये भारतीय अंतराळ अभियानाला सर्वाधिक पाठबळ देण्यासाठी ‌‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड‌’ची स्थापना करण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात हा एक महत्त्वाचा व निर्णायक टप्पा ठरणार आहे.

नवीन वर्ष 2026च्या पहिल्या टप्प्यातच भारताने आपल्या अंतराळ संशोधन क्षेत्रात महत्त्वाच्या अशा सहा प्रक्षेपण प्रकल्पांची सिद्धता केली आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. यामध्ये ‌‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड‌’चे अंतराळ प्रक्षेपण-संशोधनासाठी आवश्यक असे माहिती-तंत्रज्ञान, मूलभूत सुविधा, पायाभूत रचना इ.सह प्रत्यक्ष सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे. याचे मोठे व सकारात्मक परिणाम निश्चितपणे होणार आहेत.

अंतराळात भारत आणि भारतीयांचे केवळ पदार्पणच पुरेसे. आपले बस्तान बसविण्यासाठी ‌‘इस्रो‌’ला अंतराळ सुरक्षा व प्रगत तंत्रज्ञानासह आपले प्रयत्न आणि तयारी यशस्वीपणे सिद्ध करावी लागेल. त्यादृष्टीने ‌‘इस्रो‌’चे प्रयत्न आणि नियोजनदेखील सुरू आहे. या तयारीमध्ये मानवरहित संशोधन यानापासून अंतराळयानातून भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळात सुरक्षितपणे पाठविणे व त्यानंतरही त्यांच्या सुरक्षिततेची निश्चिती करणे आवश्यक आहे. यासाठी ‌‘इस्रो‌’तर्फे अंतराळात मानवीय सुरक्षेसाठी आवश्यक प्रयत्नांना चालना देण्यात आली असून, या प्रयत्नांना अधिक गतिमान करणे आवश्यक आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या टप्प्यात ‌‘इस्रो‌’तर्फे प्रायोगिक स्तरावर मानवासह असणारे ‌‘गगनयान‌’ अंतराळात पाठविण्यात येणार असून, त्याद्वारे अंतराळात मानवीय सुरक्षेच्या चाचणीची पडताळणी केली जाणार आहे. या प्रस्तावित प्रयोगाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ‌‘इस्रो‌’च्या पुढील अंतराळ मोहिमांच्या यशाचा पूर्व-टप्पा म्हणून हे प्रयत्न निर्णायक ठरणार आहेत. या चाचणीदरम्यान मानवीय जीवनासाठी आवश्यक अशा प्राणवायू, पर्यावरण, तापमान इ. महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता यानिमित्ताने होणार आहे.

मानवसहित अंतराळयान अंतराळात यशस्वीपणे पाठवून ते स्थिरावण्यासाठी व या प्रयोगाच्या यशस्वीतेची पडताळणीच नव्हे, तर खातरजमा करण्यासाठी विविध प्रकारची परिस्थिती आणि बदलते वातावरण इ. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या कठोर चाचण्या घेण्यात येणार आहेत. हे याआधीच ‌‘इस्रो‌’च्या उच्चपदस्थांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अंतराळातील प्रक्षेपणाशी संबंधित चाचणीच्या पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष अंतराळात पोहोचल्यावर संशोधक-मानवाचे यानातून बाहेर जाणे, त्यांचा अंतराळातील वावर व मुख्य म्हणजे यानामधील फेरप्रवेश इ. टप्प्यांच्या काळजीपूर्वक अभ्यास-चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यादरम्यान पण अर्थातच, संशोधक आणि यान या उभयतांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जाणार आहे. ‌‘इस्रो‌’च्या दृष्टीने अभियानाशी संबंधित पुढचा व महत्त्वाचा टप्पा म्हणजे, अंतराळ मोहीम आटोपून यानाचा पृथ्वीकडचा परतीचा प्रवास. यादरम्यान, परतताना ‌‘चंद्रयान‌’ पृथ्वीच्या पर्यावरणीय कक्षेमध्ये प्रवेश करताना विज्ञान-तंत्रज्ञानच नव्हे, तर पर्यावरणीयसंदर्भात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या विविध टप्प्यांमधील असणारी जोखीम, त्याचे होऊ शकणारे संभाव्य परिणाम व या जोखमींवर घ्यावयाची काळजी, यावर ‌‘इस्रो‌’चा विशेष भर राहणार आहे. यासंदर्भात अंतराळ तंत्रज्ञानाच्या जोडीलाच अद्ययावत माहिती-तंत्रज्ञानाची साथही तितकीच महत्त्वाची. मुख्य म्हणजे, संपूर्णपणे व सुरुवातीपासून मोहिमेच्या यशस्वी परतीच्या अखेरच्या यशस्वी क्षणापर्यंतच्या संदर्भातील जोखीम व्यवस्थापन आखून त्यासाठी आवश्यक ते सर्वप्रकारचे नियोजन करण्यात येत आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. यासाठी आपातप्रसंगी वापरण्यासाठी आवश्यक अशा विशेष व अद्ययावत पॅराशूटचे संशोधन-निर्मिती करण्यात येत आहे.

‌‘इस्रो‌’च्या नव्या व आव्हानात्मक अंतराळ गगनभरारीला संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणांनासुद्धा त्याचदरम्यान सिद्ध ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात मोहिमेचे महत्त्व, त्यातील जटिलता व जोखीम पाहता, अंतराळयान मोहिमेच्या कालावधीत भारतीय नौदलाला सर्व सज्ज ठेवण्यात येणार आहे, एवढे सांगितले म्हणजे विषयाचे गांभीर्य स्पष्ट होते. यासंदर्भातील सराव प्रसंगांमध्येसुद्धा आपल्या नौदलाचा सहभाग असणार आहे.

भारतीय अंतराळ मोहिमेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, या संपूर्ण मोहिमेत ‌‘इस्रो‌’ आणि त्यांच्या संशोधकांचा भर चुकांमधून शिकण्यावर, घोडचुका टाळण्यावरच राहणार आहे. त्याशिवाय, विज्ञान- तंत्रज्ञानापेक्षा प्रसंगी प्रत्यक्ष प्रक्षेपणात सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला धोरणात्मकदृष्ट्या सुरुवातच नव्हे, तर योजनेच्या पूर्वतयारीपासून महत्त्व दिले जाणार आहे. या मोहिमेकडे अंतराळ मोहिमेतील प्रमुख व उभ्या जगाला मार्गदर्शक ठरविण्याचा मनोदय ‌‘इस्रो‌’ने यापूवच जाहीर केला आहे.

अंतराळ मोहिमेशी संबंधित गुंतवणुकीकडे ‌‘इस्रो‌’ दुहेरी दृष्टिकोनातून पाहात असल्याचे दिसते. यात एकीकडे शेकडो-करोडो रुपयांची मोठी आर्थिक गुंतवणूक, प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित आधी केलेले व प्रचलित असे संशोधन हे तर महत्त्वाचे आहेच. मात्र, त्याचजोडीला अंतराळ मोहीम प्रत्यक्षात साकारणाऱ्या व त्याला ‌‘इस्रो‌’च्या यशस्वी
मोहीम-परंपरांमध्ये मूर्त रूप देणाऱ्या शास्त्रज्ञांची सुरक्षा ‌‘इस्रो‌’ने सर्वोपरी मानली आहे.

‌‘इस्रो‌’च्या नव्याने आखलेल्या अंतराळ मोहिमेशी निगडित महत्त्वाच्या बिंदूंमध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणुकीद्वारे होणारे वैज्ञानिक संशोधन, विविध तयारी-चाचण्यांद्वारे होणारा अभ्यास, नव्या उपक्रमांतून नवे संशोधक-शास्त्रज्ञ घडविणे एवढेच नव्हे, तर नजीकच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेला आभाळाएवढी उंची गाठण्याचे सामर्थ्य मिळणार आहे.

- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापक सल्लागार आहेत.)
9822847886