कार्यकर्त्यांचा अवमान

    02-Jan-2026
Total Views |

आमच्या निष्ठेला काही किंमत नाही का? तयारीला लागा, उमेदवारी तुम्हालाच आहे, असे म्हणत दुसऱ्याला उमेदवारी दिली जात आहे. उद्धवसाहेबांनी शब्द का फिरवला?” असे उद्विग्न उद्गार उबाठाचे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी ‌’मातोश्री‌’बाहेर काढले. यावेळी त्यांच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या साथीला होत्या ‌‘फायर आजी‌’ म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या, ज्यांनी यावेळी आपली तोफ थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच डागली. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 202 मधून विजय इंदुलकर यांना डावलून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर उबाठाचे स्थानिक कार्यकर्ते या निर्णयाविरोधात प्रचंड संख्येने ‌‘मातोश्री‌’बाहेर जमले होते. ‌‘फायर आजी‌’ यावेळी म्हणाल्या की, “आम्ही स्पष्ट सांगितले होते की, जाधव यांना यावेळी उमेदवारी देऊ नका. तरीही, उद्धव ठाकरेंनी असे का केले?”

एवढे होऊन विजय इंदुलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून, हे एकप्रकारे नेतृत्वाविरुद्ध बंडच म्हणावे लागेल. “आता निकालानंतर कळेलच की, सामान्य मराठी माणसाच्या मनात काय आहे,” असेदेखील उद्गार विजय इंदुलकर यांनी काढले. पुण्यात तर उबाठाने तिकीट दिले नाही म्हणून कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे पोस्टरदेखील फाडले होते. यानंतर यावर पडदा पडला. अशा घटना संपूर्ण राज्यात पाहायला मिळाल्या.

यावरून सामान्य कार्यकर्ता हा या निवडणुकीत उबाठापासून खूप दूर गेला असून, काँग्रेसची दरबारी राजकारणाची सवय आता उबाठाला पण लागलेली दिसत आहे. एकीकडे मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंची युती आहे म्हणायचे; पण तिकीट वाटपात मात्र आपल्या ‌‘किचन कॅबिनेट‌’मध्ये पसंती असणाऱ्या व्यक्तीला तिकीट द्यायचे, ज्यात सामान्य कार्यकर्त्यांची मते मात्र साफ दुर्लक्षित करायची, अशाने थोडीच मराठी माणसाची एकी होणार आहे. हा तर चक्क कार्यकर्त्यांचा केलेला विश्वासघातच आहे. येत्या काळात याचा परिणाम निवडणूक प्रचारावर अन्‌‍ निकालावर होणार, हे मात्र नक्की!

अहंकारी नेतृत्व बेभान!

निष्ठावंत म्हणून काम करायचे आणि ऐन उमेदवारीच्या वेळी मात्र पुन्हा हातात कार्यकर्ता म्हणून झेंडा घ्यायचा, याला कंटाळून शेवटी उबाठाला ‌‘मातोश्री‌’च्या अंगणातच दिवसा चंद्र दाखवण्याचे काम अपक्ष उमेदवार चंद्रशेखर वायंगणकर यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक 95 मध्ये चंद्रशेखर वायंगणकर यांना डावलून हरी शास्त्री यांना तिकीट दिले. आमदार वरुण सरदेसाई यांनी हरी शास्त्री यांच्यासाठी विशेष ताकद लावली होती, तर वायंगणकर यांच्यासाठी अनिल परब आग्रही होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे तिकीट हरी शास्त्री यांना दिल्याने वायंगणकर टोकाचे नाराज झाले. त्यांनी चक्क अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ‌‘मातोश्री‌’च्या अंगणात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध मोठे आव्हान उभे केले आहे.

कायम मराठी-मराठी करायचे; पण सत्तेत मात्र आपल्या मजतील लोकांना संधी द्यायची, ही उद्धव ठाकरे यांची खेळी आता सामान्य कार्यकर्त्यांनी चांगलीच ओळखली आहे आणि त्याला जशास तसे प्रत्युत्तर द्यायला सुरुवातदेखील केलेली दिसते.

एकीकडे मराठी माणसात फूट पडत आहे म्हणून एकत्र यायचे आवाहन करायचे; पण दुसरीकडे आपणच कार्यकर्त्यांत फूट पाडायची, ही खेळी आता काळानुसार त्यांच्यावरच उलटत चालली आहे.

नगरपालिका निवडणुकीतसुद्धा एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज्यभरात पायाला भिंगरी लावून फिरले, सभा घेतल्या. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी नगरपालिका निवडणुकींकडे सपशेल कानाडोळा केला. कारण, त्यांना राज्यापेक्षा फक्त मुंबईचीच चिंता अधिक. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते असे वाऱ्यावर सोडले गेल्यानेच, शेवटी असे कार्यकर्तेही उबाठाला ‌‘जय महाराष्ट्र‌’ करुन मोकळे झाले. पण, या सगळ्यातूनही ‌‘मातोश्री‌’ धडा घेण्याची शक्यता सुतराम नाही. कारण, ठाकरेंना कार्यकर्त्यांचे मन समजत असते, त्यांच्या अपेक्षा, भावभावना यांची जाण असती, तर मुळात एकनाथ शिंदेंसह मोठ्या नेत्यांची इतकी मोठी फूट शिवसेनेत कधीही पडली नसती. पण, त्या बंडाळीनंतरही ठाकरेंमध्ये सुधारणा नाहीच. याचीच प्रचिती पुन्हा एकदा पालिका निवडणुकाच्या तिकीटवाटपाच्या निमित्ताने आली, एवढेच!

- अभिनंदन परुळेकर