ठाकरे बंधूंच्या भावनेच्या राजकारणाची सुई अजूनही मुंबई केंद्रशासित आणि मराठी अस्मिता याच मुद्द्यांवर अडकली असली; तरी ठाकरे म्हणजे मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. आता या कालबाह्य संकल्पनांवर निवडणूक जिंकता येणार नाही. मुंबई वाचवायची म्हणजे काय करायचे, ते फडणवीस सरकारने अनेक विकास प्रकल्प राबवून दाखवून दिले आहे. त्याचा पुढील टप्पा गाठण्यासाठी महायुतीला विजयी करण्यास मुंबईकर कटिबद्ध आहेत.
एकीकडे भाजप-शिवसेना (शिंदे) यांची महायुती, तर दुसरीकडे उबाठा सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी अशा दोन प्रमुख गटांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली जाणार आहे. महायुतीमध्ये आपल्या संख्याबळानुसार भाजप-शिवसेनेने जागावाटप पार पाडले. मात्र, उबाठा सेनेने मनसेला अगदीच किरकोळ जागा देऊन आघाडीचे कर्तव्य पार पाडले आहे, असे दिसते. या दोन पक्षांमध्ये 165 जागा उबाठा सेनेने घेतल्या असून, मनसेसाठी जेमतेम 52 जागा सोडल्या आहेत. त्यातही मराठी माणसांची वस्ती असलेल्या बहुतांशी भागांतील जागा उबाठाने घेतल्या आहेत. तसाच विचार केला, तर मुंबईत फारसे अस्तित्व नसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही 94 जागा लढवीत आहे; तर मुंबईत शेंडा-बुडखा नसलेला आम आदमी पक्ष 75 जागा लढवीत आहे. या स्थितीत मुंबईत जन्मलेला आणि मुंबईकरांच्या हितासाठी लढण्याचा दावा करणारा मनसे केवळ 52 जागांच्या दानावर अस्मितेच्या गोष्टी करतो, हा विनोदच. युती-आघाडीत सर्वकाही आपल्या मनासारखे होत नाही हे खरे असले, तरी आपला अगदीच पालापाचोळा होणार नाही, इतपत तरी काळजी त्यांनी घ्यायला हवी होती.
मनसे हा संपुष्टात आलेला पक्ष आहे, ही आदित्य ठाकरे यांची टीका एकापरीने खरीच होती. या पक्षाला राज्याच्या विधानसभेच्या 288 पैकी एकाही जागी आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. अगदी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मतदारसंघात राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यालाही हार पत्करावी लागली होती. तेव्हाच मतदारांनी हा पक्ष केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याची खूणगाठ बांधली होती. अनेक महापालिकांमध्येही या पक्षाचा एकही उमेदवार नाही.
गेल्या पाच-सहा वर्षांत मुंबई वाचविण्यासाठी किंवा मराठी माणसाचे हित जोपासण्यासाठी राज ठाकरे रस्त्यावर उतरल्याचे दिसलेले नाही. तसे ते क्वचितच रस्त्यावर उतरतात म्हणा; पण या काळात मनसे अस्तित्वात आहे, हे केवळ गुंडगिरीच्या बातम्यांमुळेच जनतेला समजत होते. कधी दुकानाचे नाव मराठीत लिहिले नाही म्हणून, तर कधी उत्तर भारतीय व्यक्ती मराठीत बोलली नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड व मारहाणीच्या बातम्या इतकेच या पक्षाचे अस्तित्व राहिले होते. या त्यांच्या मराठी अस्मितेच्या कल्पना आहेत; पण मराठी माणूस, त्यातही मुंबईकर इतका संकुचित मनाचा नाही. याप्रकारची गुंडगिरी म्हणजे मराठी अस्मिता नव्हे, हे ठाकरे बंधूंना समजत नसले; तरी मराठी माणसाला ते चांगलेच समजते. वेळ आणि आवश्यकता असेल, तेथे तो आपला मराठी बाणा दाखवून देतोच. मराठी अस्मिता काय आहे, हे मनसे आणि उबाठा सेना यांच्याकडून शिकण्याची त्याला गरज नाही. या असल्या राडेबाजीच्या कामांसाठी राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांची गरज लागते. कारण, ही तोडफोड करणाऱ्यांवर पोलीस खटले दाखल करतात आणि त्यांना प्रसंगी तुरुंगात जावे लागते. आपल्या आलिशान महालाचा उंबरठाही ओलांडण्याची तयारी नसलेल्या उद्धव आणि राज ठाकरे यांना त्यासाठी कार्यकर्ते लागतात.
उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली 25 वर्षे मुंबईची सूत्रे होती. तरीही, मुंबईची अवस्था फाटक्या कपड्यातील भिकारणीसारखी झाली होती. सर्वत्र घाण आणि कचरा यांचे साम्राज्य, दिवसाच्या कोणत्याही वेळी रस्त्यावर सदैव झालेली वाहतुककोंडी, नवनव्या ठिकाणी उगवणाऱ्या झोपड्या, उखडलेले पदपथ, खड्डेयुक्त रस्ते आणि परप्रांतीयांची बेसुमार आवक यांनी मुंबईचे रूपांतर एका विशाल झोपडपट्टीत झाले होते. मुंबईतील गिरणी कामगार किंवा झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याचा एकही प्रकल्प त्यांना पूर्ण करता आलेला नाही. जेथे केला, तेथे भ्रष्टाचार मात्र काटेकोरपणे केला, हे पत्राचाळीच्या विकासातून दिसून आले. मुंबई विमानतळावर विमान उतरताना प्रवाशांना फक्त निळ्या प्लास्टिकचे छत असलेल्या हजारो झोपड्यांचे दर्शन होत असे. आपल्यासाठी आठ मजली ‘मातोश्री’चा दुसरा बंगला; पण मुंबईकरांसाठी झोपड्या ही उद्धव ठाकरेंच्या मुंबई महापालिकेतील सत्तेची कमाई होती. दगाबाजीने मुख्यमंत्रिपद पटकाविल्यावर तरी मुंबईचा विकास करण्याचे सोडून मुंबईसह राज्यातील सर्व विकास योजनांना उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली होती. अंबानींसारख्या देशाच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या उद्योगपतीकडून कोट्यवधी रुपये उकळण्यासाठी कट रचले जात होते (इतके करूनही अंबानींच्या घरच्या कार्यात सहकुटुंब उपस्थित राहून पाहुणचार झोडण्यात त्यांना काही वाटत नव्हते.) वर मुंबई किंवा महाराष्ट्रातील उद्योग परप्रांतात का जातात? असा प्रश्नही हेच शहाजोगपणे विचारीत, हा ढोंगीपणाचा कळस होता.
उद्धव ठाकरे यांची ही तऱ्हा, तर ‘उरलो फक्त मिमिक्रीपुरता’ अशी राज ठाकरे यांची अवस्था. कुंभमेळ्याला जाऊन संगमातील पवित्र गंगाजल आणणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्याची जाहीरपणे खिल्ली उडवीत आणि त्या गंगाजलाची तुलना गटारातील पाण्याशी करण्याचा अलाघ्य प्रयत्न म्हणजेच ‘ठाकरी बाणा’ अशी कल्पना असलेल्या राज ठाकरे यांनी मुंबईकरांकडून मताची अपेक्षा करणे, हे फारच झाले.
“मुंबई वाचविण्याची ही अखेरची संधी आहे, तेव्हा आमिषांना भुलून मतदान करू नका,” असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबई नव्हे, तर ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व टिकविण्याची ही अखेरची संधी आहे, हे सुज्ञ मुंबईकर मतदार पूर्णपणे ओळखून आहेत. मुंबईचा विकास करून आपले जीवन सुसह्य करण्याची ताकद फक्त भाजप-सेना युतीत आहे, हे गेल्या तीन वर्षांत मुंबईकरांनी अनुभवले. मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, अटल सेतू, वाढवण बंदर, नवी मुंबईत नवा विमानतळ यांसारख्या विकास प्रकल्पांनी मुंबईचे स्वरूप निश्चितच बदलत चालले आहे. मुंबईकरांना आपले जीवन असह्य नव्हे, तर सुसह्य करणारा नेता हवा आहे; जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात त्यांना मिळाला आहे. काँग्रेसच्या संगतीत राहिल्यावर स्वकियांशी ‘भाईचारा’ कसा निभावायचा, हे उद्धव ठाकरे व्यवस्थित शिकल्याचे दिसून येते. उबाठा यांनी आपल्या मोठ्या भावाचे (भाई) कर्तव्य धाकट्या भावाचा ‘चारा’ बनवूनच पार पाडले आहे.