मुंबई : एका गंभीर घटनेने मुंबईत खळबळ उडवली आहे. अंधेरीतील ओशिवरा परिसरातील नालंदा सोसायटीमध्ये एका लेखक-दिग्दर्शक आणि मॉडेलच्या घरावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. अचानक झालेल्या या फायरिंगमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने इमारतीकडे सलग गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.
लेखक-दिग्दर्शक आणि मॉडेलच्या फ्लॅटला लक्ष्य?
ही घटना नालंदा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली असून येथे लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा यांचं वास्तव्य आहे. तर चौथ्या मजल्यावर मॉडेल प्रतीक बैद राहतात. गोळीबारानंतर दोन्ही मजल्यावरील फ्लॅटच्या भिंतींवर गोळ्यांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे लेखक आणि मॉडेल यांच्या घरांनाच लक्ष्य करण्यात आलं असावं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच ओशिवारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गोळीबार करणारी व्यक्ती कोण आहे आणि त्यामागचा नेमका उद्देश काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांचा सखोल तपास सुरू
डीसीपी झोन-९ दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नालंदा इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये प्रत्येकी एक गोळी लागल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत कोणताही रहिवासी जखमी झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी अनेक विशेष पथकं तयार केली आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंह दहिया यांनी सांगितलं की, इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर जमिनीवर दोन प्रोजेक्टाइल सापडले आहेत. त्याचबरोबर भिंतींवर गोळ्यांचे निशाण आणि एक लाकडी पेटीही आढळून आली आहे. उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताचा माग काढण्याचे काम सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
याआधीही घडल्या अशा घटना
उल्लेखनीय बाब म्हणजे, सेलिब्रिटी किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानीही गोळीबार करण्यात आला होता. त्याचबरोबर त्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. तसेच, विनोदवीर कपिल शर्मा यांच्या परदेशातील कॅफेवर झालेल्या गोळीबाराची घटनाही समोर आली होती. या सर्व घटनांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे सध्या ओशिवरातील या घटनेने पुन्हा एकदा मनोरंजनविश्वाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.