जगात अनेक दहशतवादी हल्ले होतात आणि त्या देशातील नागरिक त्यानंतर त्यावर प्रचंड चर्चा करतो. भारतही याला अपवाद नाही. मात्र, जनतेने चर्चेबरोबरच सर्तक राहून राष्ट्रीय सुरक्षेमध्ये योगदान दिले पाहिजे. मसूद अझहर याने अलीकडेच भारतात आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. सुरक्षा यंत्रणा सक्षम असल्या, तरी भारतीय जनतेची सतर्कता आवश्यक आहे.
कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याने आतापर्यंत अनेक वेळा, भारतविरोधी धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या बातमीला किती महत्त्व द्यायचे, असे वाटणे स्वाभाविकच. त्याच्या सगळ्याच धमक्या काही खऱ्या ठरलेल्या नाहीत, मग या धमकीला इतके महत्त्व का द्यायचे? पण महत्त्व धमकीला नसून, आपण भारतीय लोक ‘आत्मघातकी दहशतवाद’ याविषयी कितपत जागरूक आहोत, याला आहे! कुणीही भारताला धमकी द्यावी, आपण घाबरावे, अशी परिस्थिती नाही. मात्र, दिल्लीच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर एक नागरिक म्हणून सजगता वाढवणे, प्रसंगी ठिकठिकाणी जागृती अभियाने राबवणे ही काळाची गरज आहे. मसूद अझहर हा ‘जैश-ए-मोहम्मद’ या आता बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. भारतीय संसदेवरील 2001चा हल्ला आणि 2008चा मुंबईवरील हल्ला, याचा ‘मास्टर माईंड’ हाच होता, हे विसरून चालणार नाही. त्याच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत.
गेल्यावष, दि. 22 एप्रिलला पहलगाम येथे हिंदूंना धर्म विचारून मारले गेले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच हे हत्याकांड केलेे. त्याचा प्रतिशोध म्हणून भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये, पाकिस्तानमधील बहावलपूर येथे असलेले ‘जैश-ए-मोहम्मद’चे मुख्यालयसुद्धा उद्ध्वस्त केले गेले. यात मसूदचे नातेवाईकसुद्धा मारल्याच्या बातम्या आहेत. मसूदची बहीण सादिया अझहर हिने ‘जमात-उल-मुमिनात’ ही आत्मघातकी दहशतवादी महिलांची संघटना स्थापन केली असून, त्यात प्रत्यक्ष आणि ऑनलाईनसुद्धा प्रशिक्षण दिले जात आहे. दिल्ली येथे दि. 10 नोव्हेंबरला झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील उमर मोहम्मद, ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधि असल्याचे तपासात उघड झाले आहे. दिल्ली हल्ला दहशतवाद्यांचे एक मोठे मोड्यूल होते. देशात अनेक ठिकाणी दि. 6 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा खरा डाव होता. पण, सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईमुळे हा अनर्थ टळला. या हल्ल्यात सहभागी असणारी महिला डॉक्टर शाहीन सईद, ही ‘जमात-उल-मुमिनात’ची भारतातील प्रमुख असल्याचेही तपासात दिसून आले. यावरूनच ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘जमात-उल-मुमिनात’ यांचे जाळे भारतात किती खोलवर रुजले आहे, याची कल्पना यावी. वास्तविक, 2019 नंतर मसूद अझहर फारसा कुठे दिसलेला नाही. पण त्याच्या कारवाया चालूच आहेत.
मुहमद मसूर अझहर अल्वी : हा पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूरला लहानाचा मोठा झाला. याने पुढे ‘जैश-ए-मोहम्मद’ या इस्लामिक देवबंदी जिहादी संघटनेची स्थापना केली. कराचीतील जामिया उलूम ऊल इस्लामिया येथे त्याचे शिक्षण झाले. या ठिकाणी सुन्नी इस्लामी देवबंदी विचारधारा आधार मानून, शिक्षण दिले जाते. या संस्थेत शिक्षण घेतलेल्यांची नावे पाहिली, तर त्यावरून या विद्यापीठाची कल्पना येईल. यामध्ये,
1)मौलाना अब्दुल गाझी - पाकिस्तानच्या राजधानीतील इस्लामाबादमधील लाल मशिदीचे प्रमुख
2)असीम ओमर - ‘अल कायद्या’चा भारतीय उपखंडप्रमुख
3)सैफुल्ला अख्तर - ‘हरकत-ऊल-जिहाद-अल-इस्लामी-हुजी’चा प्रमुख
4)महमुदूल हसन - अल हैआतुल ऊलया लिल जामियातील क्वामिया बांगलादेशचे चेअरमन
5)तालिबानचा संस्थापक सदस्य मुल्ला ओमर याला या विद्यापीठाने मानद पदवीही दिली आहे.
मसूद याने ‘हरकत-ऊल-अन्सार’साठी, जनरल सेक्रेटरी म्हणून आधी काम केले आहे. जम्मू-काश्मीरमध्येही त्याने अनेक कारवाया केल्या. मसूद याने सौदी अरेबिया, अबूधाबी, झांबिया, इंग्लंड, केनिया या ठिकाणी कारवाया चालू ठेवल्या. जुलै 2007चे लंडन बॉम्बिंग आणि दि. 21 जुलै 2005चे लंडन बॉम्बिंगमागे त्याचाच हात होता. इंग्लंडमधील ‘इस्लामिक जिहाद’ यामागे मसूदचेच प्रयत्न आहेत. मसूदने 1993मध्ये महिन्याभर इंग्लंडला दौरा केला होता. यादरम्यान त्याने 40 भाषण देत, मोठ्या प्रमाणात सदस्य व फंड मिळवले. त्यात साईद शेखसारखा जन्माने ब्रिटिश दहशतवादीही त्याला जोडला गेला. त्यानेच पुढे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा पत्रकार डनियल पर्ल याचे अपहरण आणि हत्येमध्ये मोठी भूमिकाही बजावली.
भारतात मसूद अझहरला अटक झाली होती, पण डिसेंबर 1999च्या कंदहार विमान अपहरणाच्या वाटाघाटीमध्ये त्याची सुटका करावी लागली. त्यानंतर कराची येथे हजारो लोकांच्या सभेसमोर तो म्हणाला होता की, “भारताचा सर्वनाश केल्याशिवाय मुस्लिमांना मुक्ती मिळणार नाही, हे सांगण्यासाठी मी परत आलो आहे.” त्याने काश्मीरला भारतापासून मुक्त करण्याची शपथ घेतली. ‘संयुक्त राष्ट्र संघटने’च्या सुरक्षा परिषदेने त्याला, दि. 1 मे 2019 रोजी ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले. नंतर तो ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख झाला, त्याला ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचाही पाठिंबा आहे. भारताच्या संसदेवरचा हल्ला, मुंबईवरचा 2008चा हल्ला, 2016चा पठाणकोट विमानतळावरचा हल्ला आणि 2019चा पुलवामा येथील आत्मघातकी हल्ला यांमागे ‘जैश-ए-मोहम्मद’चा हात आहे.
आत्मघातकी दहशतवाद : एक प्रक्रिया
ज्याला ‘फिदायीन हल्ला’ म्हणतात, त्याचा मसूद अझहर याने नुकताच उल्लेख केला आहे. ‘आत्मघातकी दहशतवादी’ एका दिवसात तयार होत नाहीत. त्यांना काही वर्षे, महिने, दिवस प्रशिक्षण द्यावे लागते. दहशतवादी संघटना आधी आपले सदस्य हेरतात. त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी, मरण ही पूर्वअट त्यांच्यासमोर ठेवली जाते. त्याशिवाय, हा हल्ला यशस्वी होत नाही. म्हणजेच, या दहशतवादी संघटना मरण्यासाठी तयार होणारे सदस्य तयार करतात. सदस्य भरती झाल्यावर, त्याच्यात इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारधारा भिनवली जाते. ही भरती प्रार्थनास्थळे, मंडळे, इंटरनेट यांद्वारे पद्धतशीरपणे केली जाते. दहशतवाद्यांची प्रेयसी, पत्नी, माता, बहिणी यांचासुद्धा यात वापर करून घेतला जातो. काही काळानंतर आत्मघातकी दहशतवादी बनू शकणाऱ्या सदस्याला स्वतंत्र ठेवले जाते. म्हणजे समाजात, कुटुंबात न ठेवता, त्याला एकांतात ठेवून त्याचे ‘ब्रेनवॉश’ केले जाते. त्याला या विलगीकारणात ठेवून मरणासाठी सिद्ध केले जाते. त्याचे मरण संघटनेसाठी किती आवश्यक आहे आणि त्याला कसे अमरत्व प्राप्त होणार आहे, हे त्याच्या मनावर बिंबवले जाते. त्याला त्यानंतर लक्ष्य सांगितले जाते. त्याची ‘रेकी’ एका वेगळ्या गटाकडून आधी केली जाते. मग ’डी-डे’ आणि वेळ ठरवली जाते. त्याप्रमाणे हा ‘ब्रेनवॉश’ झालेला दहशतवादी हल्ला चढवून ठार होतो. याची काही उदाहरणे म्हणजे 2001 अमेरिकेवरील 9/11चा हल्ला, पुलवामाचा 2019चा हल्ला. विशेष म्हणजे पूर्ण कुटुंबच्या कुटुंबसुद्धा आत्मघातकी दहशतवादी हल्ले चढवतात, ही वस्तुस्थिती आहे. इंडोनेशियाच्या हल्ल्यात (2018) एकाच कुटुंबातील सहाजण आत्मघातकी दहशतवाद्यांनी, एकाचवेळी वेगवेगळ्या तीन चर्चवर हल्ला केला होता. ही नवी ‘मोड्स ऑपरंडी’ आहे. आपण कल्पनापण करू शकत नाही, अशा डॉक्टरांनी दिल्लीचा आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे, इतके हे सर्व गंभीर आहे.
आपण भारतीय नागरिक - मसूद अझहर केवळ वेळोवेळी धमक्या देत राहतो, त्याला कशाला इतके महत्त्व द्यायचे असे वाटू शकते. पण मसूद अझहरच्या निमित्त आपण भारतीय खरंच अशा हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी कितपत जागरूक आहोत, हा खरा प्रश्न आहे. दहशतवादी हल्ल्यासारख्या परिस्थितीला कसे सामोरे गेले पाहिजे, याचे नागरिकांना प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. मुळात, आपल्या सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या कार्याची ओळख, दहशतवादी असे ओळखता येतात का? संशयास्पद हलचाली कशा ओळखाव्या, याचे आपल्याला प्रशिक्षण मिळणे गरजेचे झाले आहे. समाजात आपण कधी डॉक्टरांकडे संशयाने बघतले होते का? काश्मीरमधील पोस्टरमुळे तपासचक्रे फिरली, आणि पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. तरीही दिल्लीचा हल्ला थांबवता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. यात उच्च शिक्षित आहेत, व्हॉटसॲप ग्रुप आहे, परकीय संपर्क आहेत, शिवाय, एरंडेलच्या बियांपासून मिळणाऱ्या विषाचा एक भयंकर पैलूसुद्धा याला जोडलेला आहे. जैविक शस्त्र हे भविष्यात इतके स्वस्त असणार आहे का? यामुळे जलाशयांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा गंभीर होऊ शकतो. पण, सामान्य नागरिक म्हणून याविषयी आपल्यात जागृती कधी होणार? हाच गहन प्रश्न आहे. केवळ सुरक्षा यंत्रणांनी देशाचे अंतर्बाह्य संरक्षण करण्याचा काळ आता निघून गेला. जिथे आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, तिथे भारतीय नागरिकांमध्ये असलेली सतर्कता हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. देशाचे संरक्षण सीमेबरोबरच, नागरिकांनी सतर्क राहूनच करावे लागते. दहशतवादी हल्ल्याच्या तारखासुद्धा खूप बोलक्या असतात, याचीही आपल्याला जाणीव असली पाहिजे. उदाहरणार्थ स्पेनला माद्रीत येथे दि. 11 मार्च 2004ला हल्ला झाला; त्याची जबाबदारी ‘अल कायद्या’ने घेतली होती. या हल्ल्यात आणि अमेरिकेच्या दि. 9 नोव्हेंबर 2001 रोजीच्या हल्ल्यात, 911 दिवसांचे अंतर होते. हा केवळ योगायोग नाही. शिवाय, यानंतर तीनच दिवसांनी स्पेनमध्ये निवडणुका होत्या आणि त्यात सरकार कोसळले. म्हणूनच, आपण सामान्य नागरिकांनी सजग राहण्याची वेळ आलेली आहे. यासाठी ठिकठिकाणी जनजागृती अभियाने राबवण्याची आवश्यकता आहे. सुरक्षा यंत्रणा आणि सामान्य नागरिक यांच्यात थेट संवाद होणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ बरेचदा सामान्य नागरिकच असतात. मग सामान्य नागरिकांनी आता अंतर्गत सुरक्षा हा नागरी कर्तव्याचा भाग म्हणून का स्वीकारू नये? कारण, देश सर्वांचा आहे आणि तो सर्वांनी मिळून वाचवला पाहिजे.
रुपाली कुलकर्णी-भुसारी
(लेखिका ‘एकता’ मासिकाच्या संपादक आणि ‘आत्मघातकी दहशतवाद’ या संशोधनात्मक पुस्तकाच्या लेखिका आहेत.)
9922427596