मोदींना भावलेला ‌‘खेळ भावंडांचा‌’...

    19-Jan-2026
Total Views |

व्हॉलीबॉल हा खेळ तसा अपरिचित असला, तरी अलीकडे या खेळाचा प्रचार होताना दिसतो आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांमधून या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. फिस्टबॉल हा देखील व्हॉलीबॉल सदृष्यच खेळ, त्याचाही प्रचार आज होतो आहे. या खेळांचे स्वरुप आणि केंद्र सरकारची या खेळांना मिळणारी साथ याचा घेतलेला मागोवा...

कबड्डी, खो-खो असे खेळ, शहरामध्ये तसेच खेडोपाडी शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांवर अनेकांनी जाता-येता बघितले असतील. त्याचप्रमाणे उंच लावलेल्या जाळीवरून एक जाड चामड्याचा चेंडू हाताने टोलवायचा व जमिनीवर न पाडता तो हाताने अधांतरीच परतवायचा असाही एक खेळ खेळला जातो. जाळीच्या दोन्ही बाजूंना खेळण्याची जागा असते, तेथून सहा-सहा खेळाडूंमधे खेळल्या जाणाऱ्या या व्हॉलीबॉलचा खेळ अनेकांनी नक्कीच बघितला असेल.

दुसऱ्या महायुद्धावेळी सैनिकांच्या मनोरंजनासाठी तयार झालेला हा खेळ, ‌‘व्हॉलीबॉल‌’ या नावाने आता सर्वत्र प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील मॅसॅचुसेट्समधल्या हॉल्योक येथील ‌‘यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन‌’च्या आखाड्यात, 1885 साली या खेळाची सुरुवात झाली. तेथील शारीरिक शिक्षणतज्ज्ञ विल्यम मॉर्गन याने या खेळाचा शोध लावला. तेथूनच मग हा खेळ अमेरिकेत सर्वत्र पसरला व तरुणांना आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवा पुरवणे, तसेच त्यांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत करणाऱ्या ‌‘वायएमसीए‌’ अर्थात ‌‘यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन‌’च्या चळवळीमुळे, आज त्याचा जगभर प्रसार झालेला दिसून येतो. मिंटोनेट बॅडमिंटन खेळापासून आलेले हे नाव आहे; कारण त्याचे या खेळाशी साधर्म्य आहे. पुढे त्या खेळाचे ‌‘व्हॉलीबॉल‌’ असे नामकरण डॉ. अल्फ्रेड हलस्टेड यांनी केले. कारण खेळाडू चेंडू जाळीवर टेनिसप्रमाणे ‌‘व्हॉली‌’ करताना आढळतो.

व्हॉलीबॉल खेळाचे नियम सोपे आहेत. दोन गुणांच्या फरकाने 25 गुण मिळवणारा पहिला संघ सेट जिंकतो, प्रत्येक सामना ‌‘बेस्ट-ऑफ-फाईव्ह‌’ सेट फॉरमॅटनुसार खेळला जातो. आवश्यक असल्यास पाचवा सेट 15 गुणांचा खेळवला जातो. व्हॉलीबॉल समुद्र किनाऱ्यावरील वाळूत तसेच इनडोअर पद्धतीनेही खेळतात. तो कुठे खेळला जातो, त्यानुसार त्याचे मापदंड भिन्नभिन्न असतात. कबड्डी वगैरेंच्या जशा लीग स्पर्धा असतात, तशाच व्हॉलीबॉलच्याही लीग प्रसिद्ध आहेत. महिला व्हॉलीबॉलच्या जागतिक क्रमवारीत भारत 68व्या स्थानावर आहे, तर पुरुषांचा जागतिक क्रमवारीत 58वा क्रमांक लागतो. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, पाकिस्तानी पुरुष व्हॉलीबॉलमध्ये भारतापेक्षा थोडेसे चांगल्या स्थितीत असून, ते 44व्या स्थानावर आहेत. व्हॉलीबॉलमध्ये भारत कधीही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नसला, तरी त्यांनी दोनदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला आहे. व्हॉलीबॉलच्या इतिहासात जागतिक स्तरावर भारताचे स्थान फारसे प्रबळ नसले, तरी आपल्या संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत एक रौप्यपदक आणि दोन कांस्यपदके जिंकून खंडीय पातळीवर काही प्रमाणात यश मिळवले आहे. 1980 नंतरच्या घसरणीनंतर, संघाने अलीकडेच सुरू झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत मात्र चांगली कामगिरी केली. आतापर्यंत एक रौप्य आणि एक कांस्यपदक भारतीय संघाने जिंकले आहे.

जरी हा खेळ बराच काळ अनौपचारिकरित्या खेळला जात असला, तरी पहिली आंतरराज्यीय व्हॉलीबॉल स्पर्धा 1936 मध्येच ‌‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन‌’ (आयओए)द्वारे आयोजित करण्यात आली होती.

1924च्या पॅरिसमधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये, व्हॉलीबॉलचा प्रथमच ‌‘प्रात्यक्षिक खेळ‌’ म्हणून समावेश करण्यात आला होता. 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला संघ अधिकृत खेळ म्हणून सहभागी झाला असून, तेव्हापासून तो ऑलिम्पिक कार्यक्रमात राहिला आहे.

ऑलिम्पिक क्रीडाप्रकार असलेल्या व्हॉलीबॉलला, ‌‘फिस्टबॉल‌’ नावाचं एक धाकटं भावंडदेखील आहे. फिस्टबॉलला मात्र ऑलिम्पिक क्रीडाप्रकारात स्थान मिळाले नसल्याने, फिस्टबॉलने ‌‘वर्ल्ड गेम्स‌’वरच समाधान मानलं आहे. फिस्टबॉलच्या खेळात पाच-पाचजणं सामना खेळतात. फिस्टबॉल हाा खेळ जवळपास व्हॉलीबॉलसारखाच खेळला जातो. यामध्येही एका संघाने आपल्याकडे आलेला चेंडू, परत प्रतिस्पर्ध्याच्या भागात जाळीवरूनच टोलवायचा असतो. फक्त तसे करताना त्याचा एक टप्पा घेऊन उसळी मारल्यानंतर, हाताच्या मुठीने तो (फिस्ट) टोलवणे अनिवार्य असते. फिस्टबॉल जरी विदेशी क्रीडाप्रकार वाटत असला, तरी आपल्या विटी-दांडूसारखे कसब व ऊर्जा त्यात असावी लागते. आज जर्मन जरी या खेळात अग्रणी असले, तरी काय सांगता येतं की उद्या भारत जर्मनला ‌‘काटे की टक्कर‌’ देताना दिसेल. कारण फिस्टबॉल खेळाला भारतात प्रोत्साहन देण्यासाठी, आता संघटनेची स्थापन झाली आहे.

इंग्रजीतील फिस्टचा आपल्याकडचा समानाथ शब्द पाहायचा झाला, तर त्याला आपण ‌‘मूठ‌’ असे म्हणू शकतो. चेंडू जाळीवरून मुठीने मारत खेळला जाणारा क्रीडाप्रकार म्हणजे फिस्टबॉल! ‌‘आंतरराष्ट्रीय फिस्टबॉल महासंघा‌’शी संलग्न असलेला फिस्टबॉल महासंघ आता भारतात कार्यरत असून, या खेळाचे नियमनही करत आहेत. फिस्टबॉल खेळाचा विकास करणे, स्पर्धा आयोजित करणे आणि राष्ट्रीय संघ निवडणे यांसारख्या जबाबदाऱ्या या संघटनेवर आहेत. तसेच ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या खेळासाठी पहिली नियमावली 1900च्या सुरुवातीला तयार करण्यात आली. त्यानंतर 1947 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महासंघ असलेल्या ‌’फेडरेशन इंटरनॅशनल डी व्हॉलीबॉल‌’ अर्थात ‌’एफआयव्हीब‌’ची स्थापना झाली. भारताचा महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असून, त्याचे व्यवस्थापन ‌‘भारतीय व्हॉलीबॉल फेडरेशन‌’द्वारे केले जाते.

नुकतीच व्हॉलीबॉल संबंधित एक घटना घडल्याचे ऐकण्यात आले होते. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी इंडोनेशियाला निघालेला भारतीय व्हॉलीबॉल संघ पुणे विमानतळावर उशिरा पोहोचला. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणत्याही विमानतळावर साधारण दोन तास आधी पोहोचणे अपेक्षित असते मात्र, बंगळुरुहून रस्त्याने पुण्याकडे येणाऱ्या संघाला, पुणे विमानतळावर पोहोचायला विलंब झाला. त्यामुळे नियोजित विमान चुकणार असल्याचा अंदाज आल्यामुळे, या संघाच्यावतीने केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांना संपर्क करण्यात आला. घटना समजल्याबरोबरच केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी विमानतळावरील प्रक्रिया तातडीने करून घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळेच भारतीय व्हॉलीबॉल संघ नियोजित वेळेतच इंडोनेशियाकडे मार्गस्थ होऊ शकला. अशा प्रकारे सरकार व्हॉलीबॉलकडेही लक्ष देत असते, हे प्रकर्षाने दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील व्हॉलीबॉलकडे आपुलकीच्या भावनेने बघताना दिसतात. स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे रविवार, दि. 4 जानेवारी रोजी, दि. 4 ते दि. 11 जानेवारीदरम्यान होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे दृक्‌‍श्राव्य माध्यमातून उद्घाटन त्यांनी केले. या स्पर्धेत विविध राज्ये आणि संस्थाचे 58 संघ सहभागी झाले होते, तर या स्पर्धेत सहभागी खेळाडूंची संख्या एक हजाराहून अधिक होती. त्याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “व्हॉलीबॉल हा एक सामान्य खेळ नाही; कारण तो संतुलन आणि सहकार्याचा खेळ आहे. जिथे चेंडू नेहमी उंचावण्याच्या प्रयत्नांतूनही दृढनिश्चयचे दर्शन होते.” तसेच पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, “व्हॉलीबॉल खेळाडूंना संघभावनेने जोडतो. प्रत्येक खेळाडू ‌‘टीम फर्स्ट‌’ या मंत्रानेच त्याचे पूर्ण योगदान देतो.” पंतप्रधान मोदी यांनी यावरही भर दिला की, “प्रत्येक खेळाडूकडे वेगवेगळी कौशल्ये असली, तरी सर्वजण त्यांच्या संघाच्या विजयासाठी खेळतात.” मोदींनी भारताच्या विकासाच्या कथेत आणि व्हॉलीबॉलमधील समानता पाहिली. ते म्हणाले की, “व्हॉलीबॉल हा खेळ शिकवतो की, कोणताही विजय एकट्याने मिळवता येत नाही, तर तो समन्वय, विश्वास आणि संघाच्या तयारीवरच अवलंबून असतो.” मोदी यांनी अधोरेखित केले की, “संघकार्यात प्रत्येकाची स्वतःची एक भूमिका आणि एक जबाबदारी असते. संघाला यश तेव्हाच मिळते, जेव्हा प्रत्येकजण गांभीर्याने आपले कर्तव्य पार पाडतो.”

आज जग भारताच्या विकासाचे आणि अर्थव्यवस्थेचे कौतुक करत आहे, हे लक्षात घेऊन मोदी म्हणाले की, “ही प्रगती केवळ आर्थिक आघाडीपुरती मर्यादित नाही, तर क्रीडाक्षेत्रावरील आत्मविश्वासातूनही दिसून येते.” पुढे पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, “एक काळ असा होता, जेव्हा सरकार आणि समाज दोघेही खेळांबद्दल उदासीन होते. यामुळे खेळाडूंमध्ये त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती आणि फार कमी तरुणांनीच खेळाला करिअर म्हणून स्वीकारले होते. गेल्या दशकात सरकार आणि समाज दोघांच्याही खेळांबद्दलच्या मानसिकतेत बदल झाला आहे,” असो! तर मोदींना भावलेल्या व्हॉलीबॉल व फिस्टबॉल या भावंडांचा खेळ खेळणारे खेळाडू एक दिवस ऑलिम्पिक, तसेच ‌‘वर्ल्ड गेम्स‌’मध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसोत अशी आपण सकारात्मक भावना व्यक्त करत, या लेखाला पूर्णविराम देऊ.

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704