अजय देवगणचा नवा ऐतिहासिक प्रयोग! AI ने साकारणार ‘बाल तन्हाजी’

    19-Jan-2026
Total Views |

मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात होताच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा कामात पूर्णपणे सक्रिय झाला आहे. २०२६च्या सुरुवातीपासूनच तो आपल्या आगामी चित्रपटांच्या तयारीत व्यस्त असून ‘दृश्यम ३’ आणि ‘धमाल ४’ सारख्या बहुप्रतीक्षित चित्रपटांमुळे सध्या तो चर्चेत आहे. मात्र, या सगळ्यात अजयचा एक नवा प्रोजेक्ट असा आहे, ज्याने काही मिनिटांतच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि तो म्हणजे 'बाल तान्हाजी'.

‘तन्हाजी’च्या यशानंतर ‘बाल तन्हाजी’ची घोषणा

२०२० साली प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘तन्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा अजय देवगणने काही काळापूर्वी केली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सिक्वेलचं नाव अखेर समोर आलं असून, या चित्रपटाचं शीर्षक ‘बाल तन्हाजी’ असणार आहे. विशेष म्हणजे, अजयने या चित्रपटाचा पहिला लूकही प्रेक्षकांसमोर सादर केला आहे.

‘बाल तन्हाजी’ हा केवळ सिक्वेल नसून, भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्त्वाचा प्रयोग ठरणार आहे. कारण हा चित्रपट पूर्णपणे AI-बेस्ड स्टोरीटेलिंगच्या माध्यमातून साकारला जात आहे. अजय देवगणने आपल्या नव्या प्रोडक्शन कंपनी लेन्स वॉल्ट स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या AI प्रोजेक्टचा फर्स्ट लूक नुकताच जाहीर केला आहे.

चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर रिलीज करण्यात आला असून, तो प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. ‘तन्हाजी’ मधील ऐतिहासिक कथानक पुढे नेण्यासाठी मेकर्सनी आधुनिक तंत्रज्ञानाची, विशेषतः जनरेटिव AIची मदत घेतली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला फर्स्ट लूक


अजय देवगणने ‘बाल तन्हाजी’चा AI-पावर्ड फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ‘बाल तन्हाजी’ मध्ये मूळ ‘तन्हाजी’ चित्रपटाच्या कथेशी कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. कथा जशीच्या तशी ठेवत, फक्त ती अधिक प्रभावीपणे सादर करण्यासाठी AI टूल्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट ऐतिहासिक भावनांना जपणारा, पण सादरीकरणात आधुनिक असणार आहे.