भाजपची क्रांती, विरोधकांवर संक्रांत!

    18-Jan-2026
Total Views |

अखेर राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल उघड होत अपेक्षेनुसार सर्वत्र भाजपचे ‌‘कमळ‌’ फुलले. या निकालांवर दृष्टिक्षेप टाकला असता, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, जवळजवळ सर्वच महापालिकांमध्ये भाजप अग्रस्थानी आहे. यात अचंबा वाटण्याचे कारण अजिबात नाही. भाजपचे ठाम धोरण आणि वाटचाल हे यश पदरात घालणारच होते. त्यामुळे भाजपवर टीका करणाऱ्या विरोधकांवर संक्रांत येणे, हेही अपेक्षितच होते.

राज्यातील 29 पैकी तब्बल 24 महापालिकांवर भाजप-शिवसेना महायुतीने झेंडा फडकावला, यालाच भरघोस यश मिळणे म्हणतात. याचे महत्त्वाचे कारण, कुठलेच यश भाजपच्या डोक्यात जात नाही. जनतेच्या भल्यासाठी निर्धाराने वाटचाल करणे, हा भाजपचा स्थायीभाव आहे. विधानसभा निवडणुकीत जे यश लाभले, त्यानंतरही स्वस्थ बसेल तो भाजप कसला? किंबहुना, तेव्हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजप पुढील मोहिमेच्या तयारीला लागले होते. त्याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. नेतेमंडळी केवळ मुंबई-पुण्यात न बसता, राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि दुर्गम भागात पोहोचली. सर्वसामान्य पक्ष-कार्यकर्त्याला प्रचाराच्या प्रवाहात सोबत घेतले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नव्या कल्पनांना प्रोत्साहन दिले. कार्यकर्त्यांचे हे अभेद्य जाळे हे कायमस्वरूपी निर्माण झाले आहे. पुढील प्रत्येक निवडणुकीत हे नेटवर्क पक्षाला लाभदायी ठरणार आहे, यात शंकाच नाही. त्यातही केवळ निवडणूक प्रचारात सक्रिय राहायचे, हा अन्य पक्षांचा परिपाठ भाजपमध्ये चालत नाही, तर ते कायमस्वरूपी असते. भाजप नेत्यांच्या अभ्यासपूर्ण तयारीचा पहिला फायदा मिळाला, तो नगरपंचायत निवडणुकींच्या निकालात. स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देत जनतेच्या जीवनावश्यक कामांना प्राधान्य द्यायचे, हे भाजपचे लक्ष्य होते आणि ही रणनीती कमालीची यशस्वी ठरणार, यात शंकाच नव्हती.

त्या मोहिमेमुळे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याने भाजपचा आत्मविश्वास तर वाढलाच. शिवाय, महापालिका निवडणुकांचा मार्गही सुकर झाला. परवा लागलेल्या निकालांनी भाजपचे ‌‘होमवर्क‌’ किती अचूक आहे, हे अधोरेखित केले. हे विरोधकांनाही मान्य करावेच लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे केवळ सत्ता भोगण्याची संस्थाने नव्हेत, तर जनसेवेचे व्रत पाळण्याची संधी आहे हे लक्षात घेत, भाजपने त्या भावनेतूनच या निवडणुका लढवल्या.

1992 मधील 74व्या घटनादुरुस्तीमुळे महापालिकांना घटनात्मक दर्जा मिळाला. नियमित निवडणुका घेणे, आरक्षण व्यवस्था आणि स्वायत्तता यांना कायदेशीर बळ मिळाले. ‌‘महापालिका‌’ संकल्पनेची सुरुवात महाराष्ट्रात होऊन शहरी स्वराज्य संस्थांचा पाया ब्रिटिश काळात घातला गेला आणि त्यानंतर मोठ्या शहरांसाठी महापालिका पद्धत रूढ झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर नागरी प्रशासन अधिक मजबूत करण्यासाठी अनेक शहरांमध्ये महापालिका स्थापन करण्यात आल्या. राजकीय प्रभाव आणि बदलता कल, यामुळे 1980 नंतर महापालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण अधिक ठळक झाले. सन 2000 नंतर महापालिका निवडणुका राज्य आणि केंद्रातील राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या ठरू लागल्या. म्हणून भाजपने या निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेत परिश्रम घेतले, ते खरेतर अन्य पक्षांनी अनुकरण करावे असे आहेत; पण कसले काय? विरोधकांची उदासीनताही भाजपच्या यशाला हातभार लावते, इतकेच. कोणतीही दूरदृष्टी नसल्यावर विरोधकांना दारुण पराभव स्वीकारण्यावाचून कोणताही पर्याय उरत नाही, असे व्हायचेच.

मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, पनवेलसह राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांच्या निकालांकडे दृष्टिक्षेप टाकला असता, भाजपच्या नावापुढे दिसणारे आकडे हा या पक्षावर जनतेचा विश्वास किती दृढ आहे, हे दर्शवणारे आहे. महामुंबईत भाजपचा बोलबाला आहे हे तर सिद्ध झालेच; पण त्याचबरोबर पुणे, पिंपरीतही भाजपच आघाडीवर असल्याचे चित्र बरेच बोलके आहे. प्रादेशिक परिणाम पाहायचे, तर पश्चिम महाराष्ट्रात या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीने घवघवीत यश मिळवले. या भागात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड आणि इचलकरंजीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या. उत्तर महाराष्ट्राचाही गड भाजपने राखला. इतकेच नव्हे, तर नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आणि नागपूरमध्ये विजयाचा चौकार लगावत छत्रपती संभाजीनगरात आपली सत्ता राखली.

या सार्वत्रिक विजयाचा खरा मूलमंत्र काय हे कोणी विचारले, तर त्याचे उत्तर म्हणजे काही गुपित वगैरे असे अजिबात काही नाही. ‌‘विकासाचा महामंत्र‌’ हाच या चौफेर विजयाचा मूलमंत्र आहे. भाजपची विकासाची व्याख्या ही विस्तारित, तसेच प्रगल्भ आहे आणि त्याची व्याप्तीही मोठी आहे. दोन-चार किरकोळ कामे म्हणजे विकास, अशी भाजपची विकासाची संकुचित व्याख्या नाही. भाजपच्या दृष्टीने विकास म्हणजे कोणत्याही बाबतीत काळानुसार होणारी सकारात्मक, गुणात्मक आणि दर्जात्मक सुधारणा अथवा प्रगती. ज्यात आर्थिक प्रगती, सामाजिक कल्याण म्हणजे शिक्षण, आरोग्य अशा अनेक पैलूंचा समावेश असतो. याचा अर्थ, केवळ आर्थिक वाढ नसून लोकांच्या जीवनात आणि समाजात होणारी सर्वांगीण सुधारणा. व्यक्ती आणि समाज अधिक सक्षम करणे, हा उद्देश भाजपच्या ध्येय-धोरणातच नव्हे, तर प्रत्येक योजना आणि उपक्रमात डोकावतो.

विरोधक जनतेला कितीही गृहीत धरत असले, तरी तो प्रमाद भाजप कधीही करत नाही आणि भविष्यातही कधी चुकून करणार नाही. हे पाहायचे झाले, तर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे जे निकाल गेल्या महिन्यात लागले, त्याचा विचार करावा लागेल. त्यात महायुतीचा दणदणीत विजय झाला होता, तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. राज्यात महायुतीचे तब्बल 215 नगराध्यक्ष निवडून आले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवरच समाधान मानावे लागले. एकट्या भाजपचे राज्यात 119 नगराध्यक्ष निवडून येत, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला.

प्रत्येक निवडणुकीत भाजप विजयी होतो. याचे कारण सामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या सरकारच्या योजना, त्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन या सगळ्यात आहे. अगदी उमेदवाराची निवडही ‌‘मेरिट‌’नुसार होते. त्याची परिणती लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत दिसून येत आहे.

एकूणात, भाजपची मुळे आता राज्यात पसरली आहेत हे आधी नगरपालिका आणि आता महापालिका निवडणुकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. देशपातळीवरचा पक्ष आपली पाळेमुळे एखाद्या राज्यात कशी रुजवतो, याचे महाराष्ट्र हे देखणे उदाहरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत अशी साखळी निर्माण करणे, हे सोपे काम नाही. त्यासाठी अथक मेहनत करावी लागते. त्यानंतरच यशाची फळे चाखावयास मिळतात. जनतेला न्याय आणि दिलासा देण्याची संधी साधता येते, हे यामागचे खरे कारण आहे. भाजपच्या विजयाचे तेच खरे रहस्य आहे.

- केशव उपाध्ये
(लेखक भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत.)