मंदिर उभविणे हेच आमुचे शील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील...

    18-Jan-2026
Total Views |

संघाचा इतिहास हा केवळ घटनांचा नाही, तर न बोलता कार्य करणाऱ्या, स्वतःला मागे ठेवून राष्ट्रकार्य पुढे नेणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांच्या त्यागाचाही इतिहास आहे. अशाच निःस्वार्थ, साध्या; पण दृढनिश्चयी जीवनातून संघाचा वटवृक्ष घडत गेला, जो आज संघ शताब्दीच्या उंबरठ्यावर भक्कमपणे उभा आहे. कै. परशुराम दत्तात्रय मुळ्ये यांचे जीवन हे अशाच संघनिष्ठेचे प्रत्यंतर आहे...

संघकार्य हे ईश्वरीकार्य समजून ‌‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील|‌’ या भावनेने काम करीत करीत काळाच्या आड झालेल्या हजारो स्वयंसेवकांच्या त्यागामुळेच आज संघाचा वटवृक्ष उभा राहिला आहे. ‌‘मी प्रतिज्ञित स्वयंसेवक आहे. कोणत्याही परिस्थितीत माझी प्रार्थना रोज झालीच पाहिजे,‌’ असा आग्रह ठेवून आयुष्यभर कधीही शाखा न चुकविणारे गावोगावी अनेक स्वयंसेवकांचे जाळे गेल्या 100 वर्षांत विणले गेले. त्यातीलच एक स्वयंसेवक कै. परशुराम दत्तात्रय मुळ्ये.

मुंबईतील गिरगाव नगरात एका अत्यंत गरीब कुटुंबात दि. 10 फेब्रुवारी 1931 रोजी परशुराम मुळ्ये यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षणही गिरगावातलेच. गरिबीचे चटके म्हणण्यापेक्षा त्यांनी लहानपणीच गरिबीशी दोस्ती केली होती. अगदी माधुकरी (भिक्षा) मागूनही त्यांनी दिवस काढले; पण आपली शाळा सोडली नाही. शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी ‌‘मॅट्रीक्युलेट‌’ नंतर सहजपणे नोकरी मिळत असे. परशुराम मुळ्ये यांनाही मंत्रालयात ‌‘उद्वाहन तंत्री‌’ (ते परिचय करून देताना हाच शब्द वापरायचे) म्हणजे ‌‘लिफ्ट मॅकेनिक‌’ म्हणून नोकरी मिळाली. घरी मोठे बंधू व त्यांचा परिवार होता. त्यांनाही आता परशुराम यांचा थोडा आर्थिक हातभार मिळू लागला.

साधारणपणे 1950च्या दरम्यान मुळ्ये यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला. मा. प्रल्हाद अभ्यंकर यांच्याशी परिचय झाला आणि ते कायमचे संघाशी जोडले गेले. छोटी-मोठी जबाबदारी घेत ते संघकाम करीतच होते. त्याच काळात ते ‌‘विस्तारक‌’ म्हणून काहीकाळ भिवंडी येथे गेले होते.

1962 मध्ये कमल जोशी (आता शालिनी मुळ्ये) यांच्याशी परशुराम यांचा विवाह झाला. या नवविवाहित दाम्पत्यास त्याकाळी प. पू. श्रीगुरुजींना भेटण्याचा योग आला. मुंबई सेंट्रल स्थानकातून श्रीगुरुजी रेल्वे पकडणार होते. मात्र, तत्पूव काही तास त्यांच्याजवळ होते. वेळेचा सदुपयोग म्हणून तेव्हा श्रीगुरुजींनी संघातील नवविवाहित दाम्पत्यांना भेटण्याचे ठरविले. यामध्ये मुळ्ये दाम्पत्यसुद्धा होते. श्रीगुरुजींचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता गुरुजींनी शालिनी यांना विचारले, “अध चड्डी घालून रोज शाखेत जाणाऱ्या परशुरामची निवड करताना काय विचार करून निर्णय घेतला?” तेव्हा शालिनी मुळ्ये यांनी उत्तर दिले होते की, “मला हे पक्के ठाऊक आहे की, संघात जाणारा माणूस हा निर्व्यसनी, प्रामाणिक आणि चारित्र्यवान असतो. म्हणूनच, मी हा निर्णय घेतला.” त्यानंतर प. पू. श्रीगुरुजींनी ‌‘शाब्बास‌’ असे म्हणत, दोघांनाही आशीर्वाद दिला होता.

1964 मध्ये परशुराम मुळ्ये हे भांडुप पश्चिमच्या शिवाजीनगर, टेंभीपाडा येथे वास्तव्यास आले. भांडुपला आल्याबरोबर आधी त्यांनी संघाची शाखा कुठे लागते, याचा शोध घेतला. बघता-बघता परशुराम यांना एक संघकार्यकर्ता म्हणून तेथील समाज यांना ओळखू लागला. सर्व स्वयंसेवकांनाही आता एक हक्काचे संघाचे घर मिळाले. या सर्वांचे आगतस्वागत करणे, त्यांच्या परिवाराशी संपर्क करणे, त्या परिवारांनाही संघाशी जोडण्याचे काम आता दोघे पती-पत्नी करू लागले. त्यांना एक मुलगी भारती (मानसी मनोज पिंपुटकर) आणि दोन मुले - मोठा कुमार (पांडुरंग) व धाकटा विवेक. तीनही मुलांवर चांगले संस्कार झाल्यामुळे तिघेही आज प्रतिष्ठित जीवन जगत आहेत. परशुराम यांनी स्वतःसाठी एक नियम केला होता. दर रविवारी ते स्वतः स्वयंपाक करीत असत. पुढे मुले मोठी झाल्यावर हळूहळू तो नियम मोडीत निघाला. संघाचे घर, त्या घरातील आगतस्वागत, त्या घरातील संस्कार, स्वयंसेवकांचा आचार-विचार-व्यवहार-पेहराव या सर्व बाबतीत त्यांनी आदर्श निर्माण केला होता.

भांडुपला आल्यावर तशी त्यांच्याकडे कोणतीच संघाची जबाबदारी नव्हती; पण ओळख करून देताना ते गमतीने आणि अगदी सहजपणे सांगायचे की, मी बेजबाबदार स्वयंसेवक; त्यातील एक जबाबदारी म्हणजे नगरातील सर्व स्वयंसेवकांशी संपर्क करणे. दुसरी जबाबदारी म्हणजे ‌‘कमी तिथे मी‌’ असे म्हणून कोणत्याही कार्यक्रमात, उत्सवात सहभागी होणे. तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणे. अगदी निरोप देण्यापासून ते ध्वज, स्टॅण्ड-पोल, हार, सर, प्रतिमा यांची उपलब्धता, ध्वजस्थान सजावट, गीत, प्रार्थनेपासून ते संपूर्ण ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’पर्यंत कुठेही अडचण होऊ नये, याची काळजी ते घेत असत. त्यामुळे नवीन स्वयंसेवक-कार्यकर्त्यांना त्यांचा खूप आधार वाटत असे.

भांडुपला आल्यावर चंद्रशेखर पांडे यांच्याशी त्यांची दोस्ती झाली. सदरा-धोतर आणि डोक्यावर संघाची टोपी घालून ही जोडी नियमितपणे संपर्काला जात असे. पांडे उत्तर प्रदेशातील आणि मुळ्ये कोकणातील, त्यामुळे बाहेरच्या लोकांना हे जरा विशेष वाटत असे; पण ‌‘संघ बंधू‌’ असा आपण जो उल्लेख करतो, ते बंधुत्वाचे नाते कसे शुद्ध, सात्त्विक आणि भाषा-प्रांत इ. भेद ओलांडणारे असते, त्याचे एक उदाहरण असे की, परशुराम मुळ्ये यांना प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाला जायचे होते; पण एक अडचण होती. शालिनी मुळ्ये यांना विवेकच्या वेळी सातवा महिना चालू होता. दुसरे म्हणजे, तेव्हा चाळीत सार्वजनिक नळावर जाऊन पाणी भरून आणावे लागत होते. पाण्याची वेळ भल्या पहाटेची. घर एका टोकाला आणि नळ चाळीच्या दुसऱ्या टोकाला. अशा परिस्थितीत संघ शिक्षा वर्गासाठी एक महिना कसे जावे, समजत नव्हते. पांडे यांना ही अडचण समजली आणि महिनाभर पाणी भरण्याची जबाबदारी स्वतः पांडे यांनी घेतली. त्यांचे घर मुळ्येंच्या घरापासून साधारण दहा-12 मिनिटांच्या अंतरावर. पहाटे 4 वाजता येऊन पाणी भरून मग पांडे हे कामावर जात. आजूबाजूच्या लोकांना हे अजब वाटत होते; पण स्वयंसेवकांना ठाऊक असते, ‌‘संघ बंधू‌’ हे नाते सख्खा भाऊ किंवा खास मित्र याच्याही पलीकडचे असते.

अत्यंत गरिबीतून आता जरा बरी स्थिती झाली होती. हळूहळू चार-पाच जणांच्या कुटुंबाला आवश्यक त्या सर्व वस्तू-साहित्य घरात जमले होते. कधी चार-पाच स्वयंसेवक चहा-नाश्ता किंवा भोजनासाठी घरी आले, तरी काही कमी पडू नये, असा विचार करून शालिनीताईंनी सर्व साहित्य पोटाला चिमटा काढून जमवले होते. घर छोटे असले म्हणून काय झाले, मन मोठे असावे; असा विचार करून ही जमवाजमव केली होती. पण, दोन दिवस सर्व परिवार भिवंडी येथे नातेवाईकांकडे गेला असता, चोरट्यांनी बंद घरात हात धुवून घेतले. फक्त एक पत्र्याची बादली आणि पितळी पिंप तेवढे राहिले होते. परत आल्यावर घराची अवस्था पाहून मुळ्ये परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली. शेजारीपाजारी सर्वजण समजूत काढण्याच्या भूमिकेत होते. पण, मुळ्ये परिवाराने अगदी सहजपणे त्या परिस्थितीचा स्वीकार केला. नशिबात होते ते झाले, आता ‌‘पुनश्च हरी ओम!‌’ रडारड, आदळआपट असे काही झाले नाही. ‌‘जब संघ हमारे साथ हैं, तो डरने की क्या बात हैं‌’ असे म्हणून कंबर कसून ते पुन्हा कामाला लागले. संघ स्वयंसेवकांना हे समजल्यावर कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, स्वयंपाक घरातील भांडी वगैरे गोष्टी जमा होऊ लागल्या. शाखेची वेळ झाल्याने त्या परिस्थितीतही परशुराम हे संघाची हाफ पॅन्ट घालून शाखेत निघाले होते. संघकाम परिस्थिती निरपेक्ष असते, याचे हे उत्तम उदाहरण.

संघबंदीच्या काळातील एक आठवण अशी की, परशुराम मुळ्ये यांची मुले विवेक आणि भारती हे घरी होते. शालिनीताई नळावर पाणी आणायला गेल्या होत्या. तेवढ्यात दोन पोलीस हवालदार साध्या वेशात घरी आले. त्यांनी मुलांना विचारले, “तुमचे वडील शाखेत जातात का?” त्यावर भारती पटकन ‌‘हो‌’ म्हणाली. इतक्यात, शालिनीताई आल्या आणि त्यांनी सांगितले, “नाही... शाखेत नाही जात, ते तर एकदा आम्ही असेच शाखेच्या बाजूला उभे राहून मैदानात काय चाललंय, ते बघत थांबलेलो. आमचे हे तर मंत्रालयात कामाला आहेत.” त्यानंतर ते पोलीस तिथून निघून गेले.

1996 मध्ये मुळ्ये परिवार कळवा येथे राहायला गेला. कळव्यात परशुराम मुळ्ये यांनी मनीषानगर येथे श्रीकृष्ण दैनंदिन शाखा सुरू केली. तेव्हा भालचंद्र जोशी, मोरेश्वर जोशी, धायगुडे, माईणकर, कवठणकर इ. त्यांचे सहयोगी होते. परशुराम मुळ्ये यांची तिसरी पिढीसुद्धा संघ संपर्कात आहे. दि. 27 जून 2013 रोजी परशुराम मुळ्ये यांचे देहावसान झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शालिनी मुळ्ये, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, जावई, चार नातवंडे, एक नातजावई, एक नातसून आणि एक पणतू असा परिवार आहे. परशुराम मुळ्ये यांचा धाकटा मुलगा विवेक लग्नाच्या आधी काही वर्षे प्रचारक होते, आता ‌‘पितांबरी‌’ कंपनीत नोकरीला असून, कुटुंब सांभाळत संघकार्यदेखील करत आहेत. मोठा मुलगा कुमार (पांडुरंग) एका खासगी कंपनीत नोकरीला असून, त्यांची पत्नी कल्याणी या ‌‘संस्कार भारती‌’ रांगोळी काढण्यात पटाईत आहेत. कुमार-कल्याणी यांचा मुलगा ओंकार याचासुद्धा विवाह झाला असून, ते सध्या दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’मध्ये कार्यरत आहेत. सौ. भारती आदर्श गृहिणीच्या भूमिकेत घर सांभाळत आहे. कै. परशुराम दत्तात्रय मुळ्ये यांचे संघकार्य सदैव
स्मरणात राहील.