Pune Municipal Corporation: महापालिकेत भाजपचीच सत्ता

    17-Jan-2026
Total Views |

पुणे : (Pune Municipal Corporation) महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवून भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून मतदारांनी विकासकामांना दिलेला कौल स्वीकारून जोमाने कामाला लागणार असल्याचा विश्वास नव्या नगरसेवकांनी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’शी बोलताना व्यक्त केला. विशेष म्हणजे, यावेळी भाजपने जुन्या 52 नगरसेवकांना उमेदवारी नाकारून नव्या दमाच्या उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, यात अनेकजण उच्च शिक्षित आणि समाजकारणाची आवड असलेल्यांचा समावेश होता. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकल्याने पुण्याच्या विकासाला एक नवे व्हिजन घेऊन हे कारभार हाकतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला असून उमेदवारांनीदेखील हा विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही दिली. (Pune Municipal Corporation)

वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली महापालिका निवडणूक

यावेळीची निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून यात अनेक दिग्गज उमेदवारांना मतदारांनी धूळ चारली असल्याचे बघायला मिळाले. यात माजी उपमहापौर असलेले आबा बागुल तर सातव्यांदा पराभूत झाले आहेत. शिवाय, काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांनादेखील पराभव पाहावा लागला. शिवाय, समाजमाध्यमातून कामे करण्याचे आश्वासन देत सत्ताधारी लोकांवर आरोप करणाऱ्यांनादेखील मतदारांनी यावेळी घरचा रस्ता दाखविला. रीलस्टार आणि चमकेगिरी करण्यात व्यस्त असणारे मतदारांना पसंत पडले नाहीत. वसंत मोरे शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत माजी आ. रविंद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आक्रमक समजल्या जाणाऱ्या रूपाली ठोंबरे तर दोन प्रभागांतून पराभूत झाल्या आहेत. (Pune Municipal Corporation)

उच्च शिक्षित दूरदृष्टी असणाऱ्यांना पसंती

यावेळी भाजपने जुन्या 52 नगरसेवकांना तिकीट नाकारून नव्या दमाच्या अर्थात जेन-झी श्रेणीतील उमेदवारांना रिंगणात उतरविले आणि मतदारांनी त्यांना भरभरून मते देत निवडून आणले. यात सुरेंद्र पठारे, ॲड. कुणाल टिळक, ऐश्वर्या पठारे, राघवेंद्र मानकर, ॲड. अश्विनी बापट, केवळ 22 वषय आणि ‌‘अभाविप‌’मधून पक्षीय राजकारणात प्रवेश कत झालेली सई थोपटे, तन्वी दिवेकर, तेजश्री पोवळे, सनी निम्हण आदींचा यात समावेश आहे. विकासाचे व्हिजन असणारे हे नेते पुण्यातील विकासाला गती देतील, म्हणून याच्यावर मतदारांनी विश्वास टाकला आहे. (Pune Municipal Corporation)

समाविष्ट गावे भाजपच्या पाठीशी

प्रभागरचनेत मागील निवडणुकीपेक्षा काही प्रभागांची संख्या वाढली होती, अर्थात याला महानगराची वाढलेली हद्द आणि महापालिकेच्या कक्षेत आलेली समाविष्ट गावे ही कारणे होती. सहसा ग्रामीण भागात भाजपचा वरचश्मा नसल्याचे बोलले जात होते. मात्र, या निवडणुकीतील भाजप उमेदवारांनी समाविष्ट गावातील प्रभागातदेखील जोरदार विजय मिळविल्याने या गावातील मतदार भाजपच्या पाठीशी असल्याचे निदर्शनास येत आहे. समाविष्ट 11 गावांत चार उमेदवार होते. (Pune Municipal Corporation)

दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादींची वाताहत

भारतीय जनता पक्षाला मागील निवडणुकींच्या तुलनेत यावेळी लक्षणीय यश मिळाले असून महापालिकेत 100 हून अधिक जागांवर विजय मिळवत, या पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. 2017 मध्ये पुणे महापालिकेत 162 उमेदवार निवडून देण्यासाठी निवडणूक झाली होती, तेव्हा या पक्षाने सर्वाधिक 97 जागांवर विजय मिळविला होता. त्यावेळी दोन्ही शिवसेना एकत्रित होत्या आणि राष्ट्रवादी पक्षदेखील एकच होत, या दोन्ही पक्षांना त्यावेळी अनुक्रमे 39 आणि दहा जागांवर विजय मिळविला होता. यावेळी मात्र या दोन्ही पक्षांची शकले झाली असून दोन्ही शिवसेनेंना आणि दोन्ही राष्ट्रवादींना मागील निवडणुकीपेक्षा अत्यंत कमी जागा मिळाल्या आहेत. उबाठा आणि शरद पवार गटाची तर अक्षरशः वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईत एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंपैकी एक असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला मतदारांनी नाकारल्याचे दिसून येते. (Pune Municipal Corporation)

कचऱ्याची समस्या आधी सोडवा

भारतीय जनता पक्षाला भरभरून मत देणाऱ्या पुणेकरांनी आता या पक्षाने वाहतुककोंडी आणि कचऱ्याच्या समस्येतून लवकर आम्हाला मुक्त करावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अनेक वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकांची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो; कारण मनपाचा कारभार वाऱ्यावर होता आता आम्ही आमच्या प्रभागातून हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला,” अशी प्रतिक्रिया दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’शी बोलताना ‌‘पुखराज‌’ सोसायटीतील नागरिक मोहित आळशी यांनी दिली. ते म्हणाले की, “आम्ही आमच्या प्रभागातून निवडून दिलेला उमेदवार हा कार्यक्षम आहे; म्हणूनच त्याला मत दिले. आता त्याने या भागातील कचऱ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात. रस्त्यांवरील खड्डे आणि पावसाळ्यात नेहमी होणाऱ्या ड्रेनेजच्या त्रासातून मुक्त करावे, ही अपेक्षा आहे,” असे आळशी यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation)

पार्किंग समस्येतून सुटका करा

पुण्यातील जैन सोसायटीमध्ये राहणाऱ्या मनोज पटवर्धन यांनी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’शी बोलताना “आम्ही निवडून दिलेल्या उमेदवारांनी प्रभाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या भागात विरंगुळा केंद्र स्थापन करून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. हा भाग तसा संमिश्र वस्तीचा असल्याने प्रभागातील सर्वच नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे विशेषतः खड्डेमुक्त रस्ते आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाहनतळ समस्येतून लवकर सुटका करावी, जेणेकरून या भागातून जाणाऱ्या महिला, लहान मुले, शाळकरी विद्याथ आणि वृद्धांची पदपथावरून चालताना कोंडी होणार नाही.” (Pune Municipal Corporation)

प्रभाग क्र. २९ (क) २९ होर्डिंगमुक्त करणार

प्रभाग क्रमांक 29 (क)मधून निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे आभार मानताना “त्यांच्या अपेक्षांना खरे उतरत, आपण आगामी काळात सर्वप्रथम प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार,” असे नवनिर्वाचित भाजप उमेदवार मंजुश्री खर्डेकर यांनी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’शी बोलताना “आपण आपला प्रभाग सर्वांत आधी होर्डिंगमुक्त करणार,” असे सांगितले. आपला प्रभाग सर्वांगसुंदर ठेवण्याकडे लक्ष देतानाच प्रभागातील नागरिकांना कोणत्याही समस्या असल्यास त्या तातडीने सोडविण्याचे नियोजन करणार,” असेदेखील त्या म्हणाल्या. “ज्या विश्वासाने मतदारांनी आपल्यावर पुन्हा विश्वास टाकला, तो सर्वार्थाने सार्थ ठरविणार,” असे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले. “सर्वांत आधी मूलभूत सोयींची पूर्तता करणार,” असे त्या म्हणाल्या. (Pune Municipal Corporation)