‘...अहंकार तुटेल’, निवडणूकीच्या निकालांनंतर कंगनाने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

    17-Jan-2026
Total Views |

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत आणि ऐतिहासिक यशानंतर अभिनेत्री तसेच भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संपूर्ण नेतृत्वाचे अभिनंदन केले.
कंगनाच्या मते हा विजय केवळ राजकीय यश नसून तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा क्षण आहे. २०२० मध्ये बीएमसीकडून मुंबईतील तिचं कार्यालय पाडण्यात आलं होतं. त्या घटनेचा संदर्भ देत कंगनाने यावेळी ठाम आणि स्पष्ट शब्दांत आपली भावना व्यक्त केली. या निकालामुळे आपल्याला न्याय मिळाल्याची भावना असल्याचं तिने सांगितलं असून, त्या काळात झालेल्या वादाची आठवण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच दरम्यान कंगनाचा एक जुना व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.

कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष कौतुक केलं. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं, असं तिने सांगितलं. तिच्या मते, हा भगवा लाटेचा विजय असून भाजप कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. बीएमसीसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकेत मिळालेला विजय राज्याच्या राजकारणात मोठा बदल दर्शवतो.

बीएमसी विजयावर कंगना म्हणाली,

कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, ज्यांनी मला शिव्या दिल्या, माझं घर पाडलं आणि महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली, आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. हा निकाल महिला विरोधी मानसिकता आणि घराणेशाही माफियांसाठी मोठा इशारा आहे. ती म्हणाली की, बीएमसी निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेला जबरदस्त कौल पाहून मला खूप आनंद झाला आहे. हा विजय केवळ एका पक्षाचा नाही तर विकासाच्या विचारांचा आहे.

2020 मधील जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत

बीएमसी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतचा 2020 सालचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मुंबईतील तिचं कार्यालय बीएमसीकडून पाडण्यात आल्यानंतर तिने दिलेली प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
त्या काळात कंगनाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती. व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसते की , आज माझं घर तोडलं गेलं आहे, पण उद्या अहंकार तुटेल. वेळेचं चाक फिरत असतं. या वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे त्या घटनेची आणि वादाची आठवण पुन्हा ताजी झाली असून, सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.