पनवेल : ( BJP-Mahayuti ) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीने दणदणीत विजय मिळवत पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी शेकाप - महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केला. मतदानापूर्वी भाजप - महायुतीच्या सहा, तर एक अपक्ष जागा बिनविरोध झाली होती. त्यानंतर गुरुवारी ७१ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. यामध्ये ५३ जागांवर भाजप - महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होऊन भाजप - महायुतीने एकूण ५९ जागा जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना पराभवाची धूळ चारून पनवेल महापालिकेवर भाजप - महायुतीचा झेंडा फडकवण्यात आमदार प्रशांत ठाकूर सरस ठरले आहेत.
ही निवडणूक पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारी, माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भाजप - महायुतीने नियोजनबद्ध व संघटित प्रचार केला. विकासकेंद्रित धोरण, सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात महायुती यशस्वी ठरली. विजयानंतर संपूर्ण पनवेल शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या विजयामुळे पनवेल शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांच्या समस्या सोडवणे, मूलभूत सुविधा मजबूत करणे आणि पनवेलला आदर्श शहर बनवण्यासाठी भाजप - महायुती कटिबद्ध असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.