‘उद्धव जनाब खुदा का नेक बंदा...’ असे एक गाणे सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रचारार्थ मुस्लीम समुदायाच्या वतीने हा व्हिडिओ काढण्यात आल्याचे दिसते. कहर म्हणजे, या व्हिडिओमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ आणि औरंगजेबाचे पोस्टरही झळकले. ‘मशाल’ चिन्हासह ‘उबाठा’ गटाच्या मुंबईतील एका मुस्लीम उमेदवाराचा प्रचार सुरू असल्याचेही या व्हिडिओत दिसते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रांना ‘उद्धव जनाब’ या नावाने संबोधले जावे, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असावी?
वास्तविक, हा व्हिडिओ कुठून आला, कुणी बनवला, याबद्दल अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. मात्र, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत लांगूलचालनाचा प्रयोग केला होता, हे स्पष्ट व्हावे. सत्तेच्या लालसेपोटी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘उबाठा’ गटात झालेले पक्षप्रवेश हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. ‘बलात्कार्यांना आसरा देणारा चेहरा’ अशी ओळख असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुल्तानी यांना उद्धव ठाकरेंनी पक्षात प्रवेश देऊन त्यांचे पुत्र झीशान चंगेज मुल्तानी याला उमेदवारी दिली, तर औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यास विरोध करणारा आणि ‘दंगल पसरवणारा नेता’ अशी ओळख असलेल्या रशीद मामूलाही तिकीट दिले.
हे संपूर्ण चित्र पाहता, ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा बाळासाहेबांचा विचार सोडून आता उद्धव ठाकरे केवळ ‘व्होट बँक’ केंद्रित राजकारणात पूर्णपणे अडकलेले दिसतात. मुंबईपुरता विचार करायचा झाल्यास बेकायदेशीर घुसखोरी, बांगलादेशी प्रश्न, अतिक्रमण या ज्वलंत विषयांवर उद्धव ठाकरे यांची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. याउलट, मराठीचा बाऊ करत ठाकरे बंधू एकत्र आले. परंतु, एकंदरीत ‘उबाठा’ गटाचे सध्याचे चित्र पाहता त्यांच्याकडे असलेला उरलासुरला मराठी माणूसही त्यांच्यापासून दुरावणार असल्याचे ‘एक्टिट पोल’चे आकडे स्पष्ट सांगतात. त्यामुळे आजचा निकाल हा ठाकरेंच्या लांगूलचालनाच्या नीतीला मुंबईकरांनी दिलेली एक सणसणीत चपराक ठरण्याचीच शक्यता अधिक!
प्रचारातही सत्ताधारीच भारी!
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकांसाठी अनेक बडे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक प्रचारसभा, रोड-शो, मुलाखतींच्या माध्यमातून प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या प्रचार कार्यक्रमांचा हा आकडा तब्बल ७७ इतका आहे. यात विविध शहरांमध्ये घेतलेल्या सभांची संख्या ३६ इतकी आहे.
यानंतर दुसर्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतो. त्यांनी विविध शहरांमध्ये तब्बल २९ प्रचारसभा घेतल्या; तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २६ सभा घेतल्या. या आकड्यांच्या खेळात सर्वात शेवटचा नंबर लागतो तो ठाकरे बंधूंचा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईसह अन्य ठिकाणी अशा प्रत्येकी तीन सभा घेतल्यात. वास्तविक, ही निवडणूक सर्वाधिक चर्चेत आली ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीमुळेच. तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही बंधू एकत्र आले म्हटल्यावर दोघेही आपल्या सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरणार, असे वाटत होते. शिवाय, ठाकरे बंधूंसाठी विशेषत: मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची होती. अर्थात, त्यांनी करवून घेतली. मात्र, जेवढी चर्चा त्यांच्या युतीची झाली, त्यामानाने त्यांच्या प्रचारसभांची संख्या फारच किरकोळ म्हणावी लागेल.
‘दे रे हरी पलंगावरी’ अशी एक प्रचलित म्हण. अशीच परिस्थिती सध्या ठाकरे बंधूंची दिसते. निवडणुकीसाठी युती केली; पण मतदारांपर्यंत न पोहोचता मुंबईत सत्ता मिळवण्याचे स्वप्न ते बघत आहेत. शिवाय, गेल्या २५ वर्षांत केलेली विकासकामे सांगतानाही त्यांच्या नाकीनऊ येत आहेत. एखाद्या नेत्याने किंवा उमेदवाराने प्रचाराच्या काळात मतदारांपर्यंत पोहोचायचेच नाही आणि मग ‘ईव्हीएम’, बोटावरची शाई, निवडणूक आयोग आणि मतदान यंत्रणेवर पराभवाचे खापर फोडायचे, ही आता अनेकांची सवयच होऊन बसल्याचे दिसते. थोडक्यात, ‘उकराल माती, तरच पिकतील मोती’ हे ठाकरे बंधूंनी समजून घेणे गरजेचे आहे.