अनिष्ट प्रथांविरोधात लढा देणारा सुशांत

    16-Jan-2026
Total Views |
Sushant Sonone
 
आजच्या आधुनिक काळातदेखील अनिष्ट प्रथांविरोधात निकराने लढा देणार्‍या सुशांत सोनोने यांच्याविषयी...
 
महाराष्ट्रात खेडोपाडी अनेक समस्या आहेत. त्यात हुंडाप्रथा, बालविवाह आणि द्विभार्या या बुरसटलेल्या आणि चुकीच्या संकल्पना अजूनही काही गावांत सुरू आहेत. काळ बदलत असताना आणि आपण नवे सुखकर जग निर्माण करीत असताना, या समाजाला घातक, त्रासदायक आणि चुकीचा पायंडा असलेल्या घटना घडणे नक्कीच भूषणावह नाही. हे सर्व येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे, सुशांत सोनोने या ‘जेन-झी’ पिढीतील तरुणाची अहोरात्र मेहनत लक्षवेधक ठरत आहे. कोण आहे हा सुशांत? काय करतो नेमके? त्याचे कार्य दखल घेण्याजोगे का आहे, याचाच हा परामर्ष. नमूद केलेल्या अनिष्ट प्रथांविरोधात उभे राहत सुशांतने गावागावात ‘नेटवर्क’ उभे केले. कोणतीही चुकीची घटना कानावर आली की, तेथील प्रशासनाला माहिती दिली जाते आणि ते काम रोखले जाते. सोप्या पद्धतीने हे जाळे विणणार्‍या सुशांत सोनोने यांची कामगिरी नक्कीच प्रेरक आणि समाजजागृतीचा नवा मापदंड निर्माण करणारी आहे.
 
सुशांत सोनोने हे मूळचे पुण्याचे. पुण्यातील खडकवासला धरणाच्या बाजूला ‘नांदेड सिटी’ शेजारील कॉलनीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण त्याच भागातील शाळेत झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण स. प. महाविद्यालयात झाले. पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने गावखेड्यांचा जवळचा संबंध आला. लहानपण खडकवासला भागात झाल्याने खेडेगावची ओळख होती. पूर्वी नांदेड गाव, खडकवासला हे ‘पुणे ग्रामीण’मध्ये येत असत. या भागाच्या आजूबाजूला शेती होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामानिमित्त खेडेगावांशी जवळचा संबंध येत होता. महाराष्ट्रात खेडोपाडी, गावांमध्ये अनेक समस्या आहेत. त्यात हुंडाप्रथा, बालविवाह आणि द्विभार्या या बुरसटलेल्या आणि चुकीच्या संकल्पना अजूनही गावात सुरू आहेत. हे बघून त्यांचे मन हेलावून जात असे. महिला, तरुण त्यांचे प्रश्न-समस्या सांगत असत. अशा वेळी यासाठी आपण काहीच का करू शकत नाही? असा प्रश्न सातत्याने त्यांना पडत असे.
 
अखेरीस त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना भेटून विविध गावांमधील परिस्थिती सांगायला सुरुवात केली. त्यांच्याकडे कोणी आले की, सुशांत त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांकडे पाठवत असे. कार्यकर्ते त्यातून जमेल तसा मार्ग काढत. हळूहळू जिल्ह्यातील अनेक खेड्यांमध्ये सुशांत यांच्याबद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. तरुणांची घट्ट मैत्री झाली. तरुणांना करिअर मार्गदर्शन करायला सुरुवात झाली. नोकरीनिमित्ताने गावांना भेटी देताना गावांमधील समस्या समोर येऊ लागल्या. गावांमध्ये हुंडाप्रथा आणि बालविवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, हे बघून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या प्रथेविरुद्ध गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली. हळूहळू कार्यकर्त्यांसोबत पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. गावातील प्रश्नांवर आवाज उठवत, प्रश्न तडीस न्यायला नेले. गावातील तरुण-मित्रांना एकत्र करत कुठेही काही चुकीचे होत असल्यास कोणाला संपर्क करायचा, कुठे अर्ज करायचा याची माहिती देऊन काम सुरू झाले. या माध्यमातून आतापर्यंत ४०हून अधिक बालविवाह वाचवण्यात सुशांत आणि त्यांच्या मित्रांना यश आले आहे, तर ९०हून अधिक विवाह हुंड्यामुळे तुटत होते, ते रोखले आहेत.
 
खेडेगावात तरुणांना प्रेमविवाहामुळे अनेकदा अडचणी येतात. अजूनही गावांत प्रेमविवाह म्हणजे मोठी चूक समजली जाते. याविरोधात सुशांत आणि त्यांच्या टीमने काम करायला सुरुवात केली. ज्यांनी प्रेमविवाह केला आहे आणि नातेवाईक स्वीकारत नाहीत, अशा जोडप्यांच्या घरच्यांना ते समजावतात. त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेतात. आयुष्यभर एकमेकांना साथ देणार, याची ग्वाही ते या जोडप्यांना सर्वांसमक्ष घ्यायला लावतात. दोन कुटुंबांना एकत्र आणतात आणि दोघांचे चांगले सुरू आहे की नाही, त्यांना काही त्रास नाही ना, याची खात्री अधून-मधून करतात. सुशांत यांना गावातून अनेक तरुणांची साथ मिळत असते. अनेक भागांत पंचक्रोशीतील तरुण एकत्र करून त्यांचा मेळावा आयोजित करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे खेडोपाडी एकमेकांना मदत होत आहे. त्याच सोबत ‘बालसंगोपन केंद्रा’ची निर्मिती केली जात आहे.
 
गावात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध असते. सुशांत स्वतः ‘कर्ज व्यवस्थापन’ क्षेत्रात काम करत आहेत, या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी तरुणांची टीम उभी केली आहे. गावात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध असते. परंतु, त्यांना त्यांच्या कलेचे मार्गदर्शन मिळत नसल्याने या तरुणांचा गोंधळ होत असतो. यासाठी त्यांनी विविध कल्पना राबवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक छोट्या गावांत सुविधा नाहीत. याठिकाणी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सुविधांसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. यासंदर्भात त्यांनी प्रकल्प सुरू केला आहे. खेडेगावात जनजागृती करणार्‍या सुशांत सोनोने यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
- शशांक तांबे