‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ : वारशातून आत्मनिर्भर भारताची नौवहनयात्रा

Total Views |
INSV Kaudinya
 
मस्कतच्या बंदरात दाखल झालेल्या ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ने केवळ हजारो मैलांचे अंतर पार केले नाही, तर इतिहासही जिवंत केला. प्राचीन भारतीय जहाजबांधणी परंपरेचे हे पुनरुज्जीवन सागरी वारसा, सांस्कृतिक राजनय आणि आधुनिक भारताच्या जागतिक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरते. जागतिक व्यापार, पुरवठा साखळी आणि भू-राजकारण अधिकाधिक सागराभोवती केंद्रित होत असताना, भारताची सागरी भूमिका नव्याने अधोरेखित होत आहे. त्याविषयी...
 
मस्कतच्या निळ्याशार समुद्रावरील तो क्षण केवळ एक दृश्य नव्हते, तर ती भारताच्या सांस्कृतिक वारशााच्या इतिहासाची पुनरावृत्ती होती. क्षितिजावर हळूहळू पुढे सरकणारे पारंपरिक पालवहन जहाज ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ जेव्हा पोर्ट सुलतान काबूस येथे दाखल झाले, भारत-ओमानमधील तब्बल पाच हजार वर्षांचा सागरी संवाद पुन्हा एकदा जिवंत झाला. ही घटना केवळ एका जहाजाच्या आगमनाची नव्हती, तर सागराने जोडलेल्या दोन प्राचीन संस्कृतींच्या अखंड मैत्रीचा, स्मृतींचा आणि भविष्याकडे पाहणार्‍या आश्वासनांचा उत्सव होता.
 
भारताचे सागराशी असलेले नाते आधुनिक राष्ट्र-राज्यांच्या चौकटीत बसणारे नाही. राजकीय सीमारेषा आखल्या जाण्याच्या कित्येक शतकांपूर्वी भारतासाठी समुद्र हा केवळ वाहतुकीचा मार्ग नव्हता, तर दूरवरच्या जगाशी संवाद साधणारा, संस्कृती पोहोचवणारा आणि व्यापार घडवणारा सभ्यतागत महामार्ग होता.
 
सिंधू संस्कृती ते भारतीय महासागर
 
सिंधू संस्कृतीतील पुरातत्त्वीय पुरावे विशेषतः लोथल येथे सापडलेली प्रगत गोदी, नौवहनाशी संबंधित अवशेष आणि सागरी व्यापाराचे संकेत हे स्पष्ट करतात की, प्राचीन भारतीय समाज समुद्राकडे पाठ फिरवणारा नव्हता. उलट, तो मान्सूनच्या वार्‍यांचा, समुद्री प्रवाहांचा आणि भरती-ओहोटीच्या चक्राचा सखोल अभ्यास करणारा होता. या ज्ञानाच्या बळावर भारतीय व्यापार्‍यांनी अरबस्तान, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियाशी शतकानुशतके व्यापार केला. मसाले, कापड, मौल्यवान दगड, तांबे, लाकूड आणि लोबान यांसोबतच कल्पना, श्रद्धा, कला आणि जीवनपद्धती यांचीही देवाणघेवाण झाली. विशेष म्हणजे, हा संपर्क कोणत्याही लष्करी विस्तारातून नव्हे, तर सागरी व्यापार आणि सांस्कृतिक संवादातून घडला. त्यामुळे भारताची सभ्यतागत उपस्थिती ही शांत, टिकाऊ आणि परस्पर सन्मानावर आधारित होती.
 
कौंडिण्य : इतिहासातून वर्तमानात
 
याच पार्श्वभूमीवर ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’चे महत्त्व अधिक ठळक होते. अजिंठा लेण्यांतील पाचव्या शतकातील भित्तिचित्रांवर आधारित या जहाजाची रचना विकसित करण्यात आली आहे. एकही आधुनिक खिळा किंवा धातूचा फास्टनर न वापरता, नारळाच्या सालीपासून तयार केलेल्या कोयर दोर्‍यांनी या जहाजाच्या फळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. ही बांधलेली जहाजे लवचिक, मजबूत आणि दीर्घ सागरी प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त होती. समुद्राच्या तुफानी लाटांशी झुंज देण्याऐवजी त्यांच्याशी जुळवून घेण्याची ही अभियांत्रिकी दृष्टी आजही संशोधकांना आश्चर्यचकित करते. ओमानच्या रास अल-जिन्झ येथे सापडलेले सुमारे इ.स.पू. २५०० वर्षांपूर्वी बांधलेले हे जहाज मेलुहा (सिंधू प्रदेश) आणि मगन (प्राचीन ओमान) यांच्यातील सागरी व्यापार किती प्रगत होता, याची साक्ष देते.
 
पोरबंदर ते मस्कत : मार्ग नव्हे एक नातं...
 
पोरबंदरहून सुरू झालेला ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’चा हा पहिला आंतरराष्ट्रीय सागरी प्रवास केवळ प्रतीकात्मक नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि अर्थपूर्ण आहे. प्राचीन काळात ओमान हे भारतीय महासागर व्यापार-जाळ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते. दक्षिण आशिया, मेसोपोटेमिया, भूमध्य सागर आणि पूर्व आफ्रिका यांना जोडणारा हा मध्यवर्ती दुवा होता. या प्रवासाच्या यशस्वी पूर्ततेनंतर मस्कतमध्ये केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्वतः जहाज आणि नौदलाच्या कर्मचार्‍यांचे स्वागत केले. भारत-ओमान राजनैतिक संबंधांच्या ७०व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रसंग दोन्ही देशांसाठी भावनिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरला.
 
सागर : भूतकाळाचा वारसा, भविष्याचा मार्ग
 
आपल्या भाषणात सोनोवाल यांनी अत्यंत समर्पक शब्दांत या प्रवासाचे मर्म मांडले. ही यात्रा एका जहाजाची नाही, तर दोन प्राचीन संस्कृतींना जोडणार्‍या सागरी मार्गाची आहे. खरं तर समुद्र भारतासाठी केवळ भौगोलिक सीमारेषा नाही, तर व्यापार वाढवणारा आणि अधिक राष्ट्रांना जोडणारा मार्ग आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतीय खलाशी आणि व्यापारी जे मार्ग वापरत होते, त्याच मार्गांवरून आज ‘कौंडिण्य’ प्रवास करत आहे. त्यामुळे भारताच्या जहाजबांधणीचा प्राचीन इतिहास संग्रहालयात बंदिस्त न करता, प्रत्यक्ष समुद्री लाटांवर विहार करत उतरवण्याचा प्रयत्न आहे.
 
संस्कृतींचा उत्सव
 
मस्कतमधील स्वागत सोहळा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर संस्कृतींचा संगम होता. ओमानच्या वारसा व पर्यटन मंत्रालयाचे अधिकारी, ‘रॉयल नेव्ही ऑफ ओमान’, ‘रॉयल ओमान पोलीस कोस्ट गार्ड’, भारतीय नौदलाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेला भारतीय समुदाय अशा सर्वांनी मिळून या क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद घेतला. भारतीय आणि ओमानी पारंपरिक नृत्य-वाद्यांच्या सादरीकरणाने या ऐतिहासिक घटनेला सांस्कृतिक रंगत लाभली.
 
जागतिक व्यापारात भारताची सागरी वाटचाल
 
आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत ९० टक्क्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी मार्गाने होतो. भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी मजबूत बंदरे, कार्यक्षम जहाजवाहतूक आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर सोनोवाल यांनी ओमानचे परिवहन, दळणवळण व माहिती तंत्रज्ञानमंत्री इंजि. सईद अल मावाली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. महाराष्ट्रातील वाढवण बंदर जे २३ दशलक्ष टीईयू क्षमता, सुमारे नऊ अब्ज डॉलर्स गुंतवणूक आणि तुतिकोरिन आऊटर हार्बरसारखे प्रकल्प भारताला जागतिक लॉजिस्टिक हब बनवण्याच्या दिशेने नेत आहेत. यासोबतच भारताच्या जहाजबांधणी आणि सागरी पायाभूत सुविधांमध्ये ओमानसारख्या देशांसाठी मोठ्या सहकार्याच्या संधी उपलब्ध होत आहेत.
 
ग्रीन शिपिंग कॉरिडोर
 
सागरी व्यापार वाढवत असताना पर्यावरणीय जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘भारत-ओमान ग्रीन शिपिंग कॉरिडोर’चा प्रस्ताव हा भविष्यातील नौवहनाचे दिशादर्शक पाऊल ठरतो. स्वच्छ इंधन, कमी कार्बन उत्सर्जन आणि शाश्वत बंदर व्यवस्थापनाच्या माध्यमातून हा मार्ग जागतिक पातळीवर आदर्श ठरू शकतो. ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’चे मस्कतला आगमन हे इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा सागरी सेतू आहे. प्राचीन ज्ञानाच्या बळावर आधुनिक धोरणे घडवत भारत जागतिक शिपिंग ट्रेडमध्ये आपली भूमिका अधिक भक्कम करत आहे. भारत-ओमानची ही सागरमैत्री केवळ दोन देशांपुरती मर्यादित न राहता, जागतिक व्यापार, सांस्कृतिक संवाद आणि शाश्वत विकासाचा नवा अध्याय लिहित आहे आणि त्या अध्यायाचा पहिला पालवारा मस्कतच्या किनार्‍यावर अलगद फडकला आहे.
 
‘आत्मनिर्भर भारता’चा उत्तम नमुना
 
‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या जहाजाने यशस्वीपणे पोरबंदर ते मस्कत हा प्रवास केला. या घटनेला खूप महत्त्व आहे. याचे मुख्य कारण ज्या पद्धतीने ही नौका बांधण्यात आली होती, ती पद्धत अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात अवलंबली जात होती. यामध्ये भारतात ‘मलबार’ नावाच्या सालाच्या झाडाचे लाकूड वापरतात. त्यांना दोर्‍याच्या साहाय्याने सरस वापरून बांधतात. त्यामुळे ते नौका अतिशय हलकी होते. पण, त्याचवेळी ती मजबूतही असते. ही नौका स्वस्तही असते. आपण अशा नौका बांधायचो, हे जगाला कायमच सांगत आलो; मात्र आज ते प्रत्यक्षात करून दाखविले, याचे कौतुकच आहे. याचा परिणाम म्हणजे, अशी अनेक लहान जहाजे बांधून आपल्या सूक्ष्म, लघु नौकावहन खलाशांना मार्ग उपलब्ध होईल. वाढवणला एक नवं बंदर होऊ घातले आहे. वाढवण आणि आजूबाजूच्या खलाशी बांधवांना छोटे व्यवसाय सुरू होण्यास ही एक फार उत्तम संधी आहे. यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हल्ली सगळीकडे पर्यावरणपूरकतेविषयी चर्चा होते. त्यामुळे अशा प्रकारची नौका पूर्णतः पर्यावरणास सुरक्षित नौका आहे. त्यामुळे ती बांधताना आणि चालवताना प्रदूषण होणार नाही. जहाजबांधणीचे हे तंत्रज्ञान संपूर्णतः भारतीय होते. आजही गुजरातच्या मांडवी बंदराच्या आजूबाजूच्या क्षेत्रात अनेक जहाजबांधणी व्यवसाय आहेत. ही जहाजे नुसती भारताचा पश्चिम किनारा ते ओमान, दुबई नव्हे, तर थेट सोमालियापर्यंत प्रवास करतात. हा आत्मनिर्भरतेचा उत्तम नमुना आहे. परकीयांचा कोणताही आधार न घेता, आपण अशी उत्तम जहाजे बांधू शकतो, हा आत्मविश्वास सर्वार्थाने महत्त्वाचा!
 
- चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक

 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.