अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिर हे केवळ अभियांत्रिकीचा आविष्कारच नाही, तर या मंदिराने प्रकल्प व्यवस्थापनाचाही एक यशस्वी वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यामुळे असीम श्रद्धा, अप्रतिम स्थापत्त्य कौशल्य आणि त्याला मिळालेली अचूक व्यवस्थापनाची जोड ही राम मंदिराच्या यशस्वी उभारणीची त्रिसूत्री ठरली. दि. २२ जानेवारी रोजी राम मंदिरातील रामललांच्या प्रतिष्ठापनेला दोन वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राम मंदिर निर्माणकार्याचा व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून घेतलेला हा कानोसा...
अयोध्येतील श्रीराम मंदिर पुनर्निर्माणाच्या निमित्ताने श्रद्धेपासून शास्त्रापर्यंत व निर्धारापासून निर्माणापर्यंत एवढेच नव्हे, तर व्यवस्थेपासून व्यवस्थापनापर्यंतचे अनेक कीर्तिमान प्रस्थापित केलेे. श्रीरामसेवकांच्या बलिदानी कारसेवेपासून विविध टप्प्यांवरील प्रखर उपक्रम - आंदोलनाची यशस्वी परिणती, भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती व त्यावरील धर्मध्वजेच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने उभ्या जगाने पाहिली, अनुभवली. मात्र, श्रीराम मंदिर निर्माणापासून धर्मध्वजारोहणाच्या या प्रक्रियेमध्ये व प्रत्यक्ष निर्माणकार्यामध्ये प्रत्यक्ष प्रकल्प व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये विविध टप्प्यांवर व वेगवेगळ्या संदर्भात जी आव्हाने उभी ठाकली व त्या सार्यांवर यशस्वीपणे मात करून मुख्य म्हणजे, निर्धारित व इच्छित वेळेत हे कधी अशयप्राय वाटणारे ‘रामकाज’ पूर्णत्वास नेले गेले, त्याला तोड नाही. यानिमित्ताने अयोध्येच्या ‘श्रीराम मंदिर भवन निर्माण समिती’चे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी लिहिलेला लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. या लेखामध्ये मंदिर निर्माणकार्याच्या विविध टप्प्यांचे साक्षी व प्रत्यक्षदर्शी असलेल्या नृपेंद्र मिश्रा यांनी त्यांना व त्यांच्या सहकार्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विविध संदर्भात त्यांचे कामकाजच नव्हे, तर कार्यकर्तृत्त्वाचा कस लावणार्या आव्हानांना सामोरे जावे लागले व त्यावर कशाप्रकारे मात करता आली व इच्छित मंदिरनिर्माण कशाप्रकारे साध्य केले गेले याचे थोडक्यात; पण महत्त्वपूर्ण वर्णन करण्यात आले आहेच. मुख्य म्हणजे, यानिमित्ताने यशस्वी प्रकल्प व्यवस्थापनाचा वस्तुपाठच त्यांनी सर्वांपुढे मांडला आहे, हे विशेष.
नृपेंद्र मिश्रा यांनी नमूद केल्यानुसार, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणकार्याला मोठे गतिमान पाठबळ मिळाले, ते सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण निकालाने. या न्यायालयीन निकालाने रामजन्मभूमीच्या संदर्भातील मूळ प्रश्न व त्यावरील तर्क-कुतर्कांना पूर्णविराम देतानाच, सर्व तथाकथित विवादास्पद मुद्दे कायमस्वरूपी निकालात काढले. दशकांच्या न्यायालयीन लढ्याचा यानिमित्ताने यशस्वी समारोप तर झालाच. याशिवाय, या निकालाने निर्माण प्रकल्पांवर काम करणार्या प्रत्येकामध्ये वेगळा जोश निर्माण करण्याचे महनीय काम केले.
त्यानंतर शास्त्रोक्त व रीतसर पद्धतीने भूमिपूजन करून प्रत्यक्ष राममंदिराच्या कामाला सुरुवात झाली व कामाच्या पहिल्याच टप्प्यात उभ्या जगाला ‘कोरोना’ने गाठले. अयोध्या पण त्याला अपवाद नव्हती. प्रवास-दळणवळण, सारे व्यवहार, माणसांचे कामकाज ठप्प झाले होते. अशाही परिस्थितीत श्रीराम मंदिराचे निर्माणकार्य सुरूच ठेवले. तेथील कामगार-कारागीर-अभियंत्यांनी चेहर्यावर मास्क लावून मर्यादित स्वरूपात, पूर्ण काळजी व निष्ठेसह आपले काम सुरूच ठेवले व तोसुद्धा एकाप्रकारे श्रद्धापूर्ण इतिहासाचा विषय ठरला.
त्यानंतर उत्खननानंतर असे लक्षात आले की, तेथील जमिनीवर सध्या प्रचलित व प्रगत पद्धतीने गाभ्यासह पाया बनविणे दीर्घकालीन स्वरूपात उपयुक्त होणार नाही. यामुळे पूर्वानुमानानुसार, सुरुवातीच्या टप्प्याला अधिक वेळ लागणार होता. याचा परिणाम प्रत्यक्ष मंदिरनिर्माणावर अपरिहार्यपणे होणार होता. दरम्यान, रात्रंदिवस काम जारीच होते. त्यादरम्यान, या अविरत प्रयत्नांना वेळेत व परिणामकारक स्वरूपात जोड दिली गेली, ती विशिष्ट प्रकारच्या दगडांच्या वापराची. हे मोठे धाडसाचे काम होते. यावेळी हे दगड परिणामकारक व मजबुतीसह कामी आले. नृपेंद्र मिश्रा व त्यांच्या सहकार्यांसाठी हा निर्णय अनेकार्थांनी कसोटीचा ठरला.
मंदिरासाठी अशाप्रकारे प्रत्यक्ष निर्माणकर्त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच, त्याला जोड मिळाली ती ‘नॅशनल जिओ-फिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’ची. निर्माणस्थळी अतिखोलवरच्या जमीन-मातीवर संशोधन करून त्याठिकाणच्या बांधकामाच्या सुरक्षिततेसाठी दगडी पायाची बांधणी अधिक मजबूत ठरेल, यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. परिणामी, राम मंदिराच्या पायासाठी सिमेंटऐवजी विशेष दगडांचा मजबूत दगडी पाया रचण्याचा निर्णय अंतिम झाला व त्यानुसार पायाच्या कामाला नव्या जोमाने सुरुवात झाली.
मात्र, त्यानंतर एक वेगळीच समस्या उभी ठाकली. राजस्थानातील पहारपूर पद्धतीच्या या दगडांचा मोठ्या प्रमाणात व विशिष्ट कालावधीत पुरवठा करण्यासाठी त्या क्षेत्रातील नेमक्या दगड खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात खाणकाम-खोदकाम करणे अत्यावश्यक होते. पर्यावरण-संरक्षणाशी संबंधित नियमांनुसार, त्यासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळणे, तिथल्या दगडांएवढेच कठीण वाटत होते. मात्र, हे परवानगीचे कठीण वाटणारे काम श्रीरामकृपेने सुलभ झाले, हे विशेष.
प्रशासकीय परवानगीनंतर राजस्थानच्या विशिष्ट दगडी खाणींमधून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू होऊन आवश्यक प्रमाणात दगड उपलब्ध झाले. मात्र, हे खाणकाम एकाच वेळी झाल्याने व मोठ्या प्रमाणावर दगड उपलब्ध झाल्याने एक वेगळी व तेवढीच मोठी समस्या निर्माण झाली. ती म्हणजे, या एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी उपलब्ध झालेले दगड मंदिरस्थळी म्हणजेच अयोध्या येथे वाहून नेण्याची. यातून दगड वाहतुकीचे एक वेगळेच आव्हान पुढे आले. विशेषतः याकामी मोठ्या प्रमाणावर भारवहन करणार्या मोठ्या व अवजड वाहनांची फार मोठ्या संख्येत एकाच वेळी व तुलनेने कमी कालावधीत एकत्र करण्याची आवश्यकता होती. या अचानक निर्माण झालेल्या अवजड वाहनांच्या संख्या आणि संकटांवर मात करण्यासाठी देशभरातून अवजड मालवाहतूक करणार्या वाहनांचे तातडीने नियोजन करण्याचे काम प्राधान्यतत्त्वावर केले गेले. याकामी देशभरातून राजस्थानशिवाय कर्नाटक, तेलंगण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू इ. राज्यांतून अवजड मालवाहतूक करणार्या विशेष वाहनांची व्यवस्था केली गेली व मंदिरनिर्माणात निर्माण झालेल्या या संकटावर पण मात केली गेली.
दरम्यान, रामललांच्या मूर्तीला खास निवडलेल्या ‘श्रीकृष्ण शिळा’ म्हणजेच काळ्या दगडातून आकार देण्याचे काम सुरू होतेच. काम बरेच प्रगतिपथावर असताना त्या काळ्या दगडात चीर निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यावर उपाय म्हणून अगदी तशाच ‘कृष्ण शिळे’चा शोध घ्यावा लागला. श्रीरामकृपेने तशीच शिळा लवकरच प्राप्त होऊन बांधकामस्थळी उपलब्ध होऊ शकली. कसबी कारागीर-मूर्तिकारांनी अधिक जोम आणि गतीसह काम सुरू केले. श्रीरामांची मूर्ती या नव्या शिळेसह साकारताना श्रृंगेरीपीठाच्या श्री शंकराचार्यांचे प्रोत्साहनपर आशीर्वाद याकामी प्राप्त झाले व परिणामी अधिक उत्कट व मनभावन राम-प्रतिमा साकारली गेली. मंदिरनिर्माण प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा अशाप्रकारे पूर्णत्वास गेला.
या सार्या प्रयत्नांकडे व श्रीराम मंदिर निर्माणकार्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेकडे आज वळून पाहताना ‘श्रीराम मंदिर निर्माण समिती’चे अध्यक्ष म्हणून नृपेंद्र मिश्रा नमूद करतात की, श्रीराम मंदिराची उभारणी म्हणजे केवळ बांधकाम नव्हते, तर त्याद्वारे शतकानुशतके वंचित ठेवण्यात आलेल्या मंदिरनिर्माणाचे ते काम होते. हिंदूंची श्रद्धा व संस्कृतीचे आगामी युगांसाठी प्रेरणादायी केंद्र यानिमित्ताने उभे राहणार होते. नेमके हेच काम सर्वार्थांनी प्रत्यक्ष पूर्णत्वास गेले, ते २२ जानेवारी २०२४ रोजी प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या श्रीरामललांच्या प्रतिमा प्रतिष्ठापनेने.
नृपेंद्र मिश्रा यांना मनापासून असे वाटते की, प्रत्यक्ष श्रीरामांच्या कामामध्ये बरीच विघ्ने आली व त्याचे यथायोग्य व यशस्वी निराकरण पण झाल्याचे दाखले मिळतात. नेमक्या याच अनुभवांचा पुनर्प्रत्यय अयोध्येतील राम मंदिर निर्माणकार्यादरम्यान त्यांना व त्यांच्या सहकार्यांना आला. अनेक आव्हानांना यशस्वीपणे व वेळेत तोंड देताना प्रत्यक्ष निर्माण समितीने ज्याप्रकारे व्यवस्थापकीय नियोजन केले, ते विलक्षण वाटते. अगदी भूमी उत्खननापासून निर्माणासाठी आवश्यक दगडांची प्रचंड प्रमाणावरील गरज भागविणे, त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविणे व मुख्य म्हणजे ‘कोरोना’ काळात उभ्या जगासाठी अशक्यप्राय ठरताना पण सर्व मर्यादांचे काळजीपूर्वक पालन करून ‘रामकामा’साठी आवश्यक निर्माणकार्य सुरुच ठेवणे, या सार्यातून यशस्वी प्रकल्प व्यवस्थापनाचा वस्तुपाठच सर्व व्यवस्थापन व व्यवस्थापक मंडळींसाठी कायमस्वरूपी उपयुक्तच नव्हे, तर प्रेरणादायी ठरणारा आहे.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)