मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच गिरगावच्या वॉर्ड क्र: २१८ याठिकाणी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या रंगाला विरोध केल्याची घटना घडलीय. भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी गिरगावच्या वॉर्ड क्र: २१८ परिसरात भगव्या रंगाचे कपडे घालून उपस्थित होते. ते मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करत होते. केवळ भगव्या रंगाचे कपडे घातले म्हणून वॉर्डमधील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या रंगाला विरोध दर्शवत भाजप पदाधिकाऱ्यांना हटकले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचेही लक्षात येत आहे.
गिरगावच्या वॉर्ड क्र: २१८ मधून उबााठाच्या गीता अहिरेकर या पालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या आहेत; तर भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून स्नेहल तेंडुलकर उभ्या आहेत. गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी सकाळी उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून भगव्या रंगाला विरोध करण्यात आला. भाजप पदाधिकाऱ्यांनी घातलेले भगवे कपडे चालणार नाहीत, असे म्हणत त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्यांस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मारहाण झाली तेव्हा तेथील उबाठा शाखाप्रमुख (गीता अहिरेकर यांचे पती), उबाठाचे पाच ते सात पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित घटनेची माहिती मिळताच, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील गिरगावच्या व्ही.पी. रोड पोलीस स्थानकात पोहोचले. त्यांनी सुद्धा उबाठाच्या या गैरकृत्याविरोधात आवाज उठवला. भगव्या रंगाला अशाप्रकारे विरोध चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या गिरगावात कलम १४४ लागू करण्यात आले असून, पोलिसांच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक