महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वधिष्टाने हृदि मरुत-माकाश-मुपरि|
मनोूपि भ्रूमध्ये सकलमपि भित्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे स हरहसि पत्या विहरसे॥९॥
आपण देवीच्या मानवी देहातील कुंडलिनी स्वरूपाला जाणून घेत आहोत आणि तिच्या ऊर्ध्वगमनाचा प्रवासही जाणून घेत आहोत. हा या श्लोकाचे विवेचन करणारा शेवटचा श्लोक आहे.
नाम क्रमांक ११० : कुंडलिनी
श्री ललितादेवीचे हे सूक्ष्मातिसूक्ष्म रूप आहे. ज्याप्रमाणे एखादा साप वेटोळी घालून निद्रिस्त होतो, त्याप्रमाणे साडेतीन वेटोळी घालून सूप्त अवस्थेत, ती कुंडलिनी स्वरूपात मूलाधार चक्रात असते. प्राण जीवाला कार्यक्षम ठेवतो. प्राणाचा मुख्य ऊर्जास्रोत म्हणजे कुंडलिनी. आपण जर दोन्ही कानांवर हात ठेवून दाबले, तर आपल्याला ‘हिस्स’ असा आवाज ऐकू येतो, जणू एखादा संतप्त सर्प फुत्कार टाकत आहे किंवा एखाद्या शेगडीमधील अग्नीचा जळताना होणारा ध्वनी ऐकत असल्याचे भासते. मूलाधार चक्रात जिथे कुंडलिनी स्थित असते, त्याच्या सभोवताली जठर आदी अवयव असतात. तेथील प्रदीप्त अग्नीच मूलाधार चक्राला उबदार ठेवतो. शरीरातील या अग्नींचे संतुलन ढासळले की, आपल्याला रोग होण्यास सुरुवात होते. मूलाधार चक्र हे त्रिकोणी आहे. तिथे इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती निवास करतात. या तिन्ही शक्तींच्या ऐयरूपातूनच ओंकार नाद निर्माण होतो.
योग वसिष्ठ ग्रंथात निर्वाण प्रकरणात वशिष्ठ ऋषींनी कुंडलिनीचा उल्लेख केलेला आहे. कुंडलिनी कशी आहे, तर वेटोळे घालून निद्रिस्त असलेल्या सर्पाप्रमाणे ती आहे. केळ्याच्या फुलाचा गाभा जसा अत्यंत कोमल असतो, तशी ती कोमल आहे. एखाद्या संतप्त सर्पिणीप्रमाणे ती फुत्कार टाकत आहे, त्याचा ध्वनी ‘हिस्स’ असा येत आहे. मनात निर्माण होणार्या विविध भाव तरंगांचे मूळ, हेच फुत्कार आहेत. शरीरातील सगळ्या नाडी या कुंडलिनीशी जोडलेल्या असतात. तिला केवळ ज्ञानमार्गाने शुद्ध केले जाऊ शकते. ज्ञान किरणे तिला शुद्ध करतात. कुंडलिनीची शरीरातील ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हालचाल ही प्राणवायू नियंत्रणात ठेवून करता येऊ शकते, आणि त्यासाठी प्राणवायू हृदयात स्थिर करता आला पाहिजे. ज्या साधकाला हे जमते, तो निरोगी असतो. आपल्याकडे प्राणायाम हा योगाचा मुख्य गाभा आहे आणि त्याचा वारंवार प्रचार करण्याचे तेच खरे कारण. प्राणायाम या यौगिक क्रियेला केल्याने, कुंडलिनीला जागृत करण्यास साहाय्य होते.
नाम क्रमांक १११ : बिसतंतू तनियसि
आवर्तन : ॐ बिसतन्तुतनीयस्यै नमः|
शब्दार्थ : श्री ललितादेवी ही कमळाच्या फुलाचे देठातील एखाद्या तंतुमय धाग्याप्रमाणे आहे. हे श्री ललितादेवीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म वर्णनातील शेवटचे नाम आहे. ती प्राथमिक अवस्थेत नवतरुण मुलीप्रमाणे अल्लड आणि क्षुब्ध असते. मूलाधार चक्रात ती ‘हिस्स’ असा आवाज काढते. मणिपूर चक्रात ती एखाद्या नववधुप्रमाणे शृंगार करते आणि सहस्रार चक्रात ती तिच्या पतीच्या भेटीस जाते. या वर्णनाचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात, पण हे सगळे अर्थ अंतिमतः तिच्या कुंडलिनी शक्तीच्या वर्णनाचेच असतात.
पाठीच्या मणक्यात एक कालव्याप्रमाणे खोलवर असणारी घळी असते. ती अत्यंत सूक्ष्म आणि जवळजवळ दिसणार नाही, इतकी छोटी असते. ज्यावेळी कुंडलिनी या घळीतून ऊर्ध्व दिशेने जाते, त्यावेळी ती एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी होते. यावेळी कुंडलिनीमध्ये साधकाला अफाट सिद्धी प्रदान करण्याची क्षमता असते. साधकाने या सिद्धींचा दुरुपयोग केला, तर त्याला ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान प्राप्त होत नाही आणि त्याला या प्रमादाची शिक्षासुद्धा भोगावी लागते. कुंडलिनी शक्तीला जरी शिवाशी तादात्म्य पावण्याची ओढ असली आणि ती साधकाला सिद्धी प्रदान करत पुढे मार्गस्थ होत असली, तरीसुद्धा या प्रवासात तिचे साधकाच्या चक्रांवर आणि तो सिद्धींचा वापर कसा करत आहे, यावर पूर्ण लक्ष असते. पात्र साधकालाच ब्रह्मज्ञान मिळावे हा शिवाचा दंडक तिला माहीत आहे आणि ती साधकाची पात्रता प्रत्येक पातळीवर परीक्षा घेऊन तपासून मगच त्याला एकेक सिद्धी प्रदान करते.
या नामाच्या रूपाने, वाक्देवी श्री ललितादेवीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म रूपासह तिच्या अफाट सिद्धी प्रदान करण्याच्या क्षमतेचा उल्लेख करतात. देवीचे साधकावर किती सूक्ष्म लक्ष आहे, याचासुद्धा उल्लेख करतात. कारण श्री ललितादेवी शिवाच्या भेटीला जाणारी मिलनोत्सुक तरुणी (तितकी चैतन्य स्वरूप, तितकी लोभस, तितकी आनंदाने रसरसलेली) असली, तरीसुद्धा तिला तिच्या कर्तव्यांची पूर्ण जाणीव आहे. अपात्र साधकाच्या हातात सिद्धी जाऊ देण्यास ती तयार नाही, अर्थात साधक कुंडलिनी उपासना करताना जर अपात्र आहे असे तिच्या लक्षात आले, तर ती त्याची उपासना पूर्णत्वास जाऊ देणार नाही.
या स्वरूपाच्या वर्णनाचा थोडासा आढावा घेणे आवश्यक आहे. श्री ललितादेवी ही आपल्या शरीरात प्राणशक्ती/कुंडलिनी स्वरूपाने कार्यरत आहे. तिला जागृत करून सहस्रार चक्रापर्यंत पोहोचवणे आणि त्या चैतन्याचा बद्ध प्रवाह मुक्त झाल्याने, आपल्या या जन्माला दिव्य आणि लोकोत्तर करून घेणे, याशिवाय आत्मोन्नती साधून मुक्तीच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकणे हेच प्रत्येक जीवात्म्याचे कर्तव्य आहे.
हे साधण्याचे भिन्न भिन्न मार्ग आणि उपासनापद्धती आहेत. मंत्र मार्गाने आपण ‘श्री ललिता त्रिशती’चे पठण करू शकतो. योग मार्गाने प्राणायामाने प्रारंभ करून, खेचरी मुद्रा साध्य करून या उद्दिष्टाला गाठू शकतो. श्री विद्या उपासनेतील मार्ग म्हणजे कौल मार्ग, मिश्र मार्ग आणि समय मार्ग. कौल मार्गी तंत्र आणि यंत्रांचा वापर करून सिद्धीच्या रूपाने हे प्राप्त करण्यासाठी कठोर उपासनारत होतात. मिश्र मार्गातील उपासक उपासना आणि कर्म असा मिलाप साधतो. मूर्तिपूजा हा सुधा मिश्रमार्गातील उपासना भाग आहे. समय मार्ग हा मानसपूजा, ध्यान आणि अन्तोपासना या मार्गाचा वापर करून, कुंडलिनी जागृतीवर विश्वास ठेवतो. समयचा अर्थच ईश्वरी तत्त्वासह केलेली उपासना अर्थात, इथे अद्वैत हेच प्रमाण आहे.
याशिवाय अजून एक पद्धती सध्या प्रचलित होते आहे, ती म्हणजे शक्तिपात दीक्षा घेऊन कुंडलिनी जागृती घडवणे. याबद्दल श्री देवनाथ महाराजांचे भाष्य अत्यंत बोलके आहे. त्यांच्या मते लहान बालकाने जिना चढायला शिकणे आणि कोणी वयस्क व्यक्तीने त्या बालकाला कडेवर घेऊन जिना चढून जाणे, यामधील फरक म्हणजेच शक्तिपात दीक्षा आणि उपरोनिर्दिष्ट उपासना माग यातील भेद आहे.
स्वतः उपासना मार्गावर प्रवास करणे, गुरुकृपेने त्यातील गुह्यत्व जाणून घेणे, गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध प्रगती करणे यातूनच आत्म्याची अपरिवर्तनीय अशी उन्नती होत असते. यातून साधक पुढील जन्मी आपली साधना या जन्मी जिथून खंडित होईल, तिथून प्रारंभ करू शकतो. शक्तिपात दीक्षा घेताना साधकाची पूर्ण पात्रता नसतानादेखील, जर गुरूने त्याच्या चेतनेला ऊर्ध्वगामी केले आणि तो साधक जर पात्र नसेल, तर ही जागृत चेतना त्याच्या साठी वरदान न होता शाप होण्याचा संभवसुद्धा असतो.
मातृस्वरूप देवीची उपासना म्हणजे आईकडे लेकराने हट्ट करावा आणि तिने त्याची प्रगती साधत त्याला आत्मसात करता येईल, अशा लघु स्वरूपात आणि अल्पमात्रेने ज्ञान देत त्याची प्रगती साधावी. यात मातृभाव प्रधान असल्याने साधक देवीच्या कृपामयी दृष्टीच्या सन्मुख राहतो, त्याच्या उपासनेतील न्यूनत्व देवी स्वतः पूर्ण करून घेते. कलियुगात खरोखर सद्गुरू भेटणे आणि लाभणे ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे, त्यामुळे ज्ञान आणि भक्ती यांचे संतुलन साधणारा मिश्र मार्गच अधिक श्रेष्ठ आहे. दीर्घ निश्चित आहे, पण त्यात अपाय होण्याचा किंवा पथभ्रमित होण्याचा संभव मात्र शून्य आहे.
- सुजीत भोगले
(देवीच्या कुंडलिनी स्वरूपाचे विवेचन यापुढील भागातसुद्धा सुरू राहणार आहे.)