‘आपल्या मुंबई’साठी मतदान करा!

    15-Jan-2026
Total Views |
Mumbai’s Vote
 
एखाद्या शहराचा कायापालट करण्यासाठी ३० वर्षांचा काळ खूप मोठा आहे. या काळात ज्यांच्या हाती मुंबईची एकहाती सत्ता होती, त्यांनी मुंबईला अधिक सुंदर आणि राहण्यायोग्य शहर बनविले का, त्याचा विचार मुंबईकरांनी करायला हवा. तसे नसेल, तर केवळ भावनेच्या आहारी न जाता; ज्यांच्याकडे मुंबईला भविष्यवेधी शहर बनविण्याची दृष्टी आहे, अशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मुंबईची सूत्रे राहतील, यासाठी मुंबईकरांनी आणि अन्य पालिका क्षेत्रातील नागरिकांनीही त्यांच्या शहराच्या उज्जवल, विकसित भविष्यासाठी आज मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायलाच हवा!
 
भारतातील काही छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई या देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील आणखी २८ महापालिकांच्याही निवडणुका आज पार पडत आहेत. पण, साहजिकच सर्वाधिक चर्चा रंगली ती मुंबईचीच! कारण, मुंबई हे केवळ एक महानगर राहिलेले नाही. ते केवळ राज्याचेच नव्हे, तर देशाचेही सर्वात मोठे आर्थिक केंद्र. त्यामुळे हे शहर केवळ आर्थिक उलाढालीचे केंद्र न राहता राहण्यायोग्यही कसे होईल, त्याचे भवितव्यही आजच्या मतदानावरून ठरणार आहे. मुंबईकरांना आपल्या या लाडक्या शहराचा विकास घडवून आपले जीवनमान उंचावायचे असेल, तर त्यांना योग्य राज्यकर्ते निवडावे लागतील. मुंबईशी केवळ भावनिक नाते सांगून तिच्या संपत्तीची लूट करणार्‍या नेत्यांपेक्षा मुंबईच्या विकासाचा लाभ सामान्य मुंबईकरांना देणार्‍या नेत्यांच्या हाती या महानगराची सूत्रे राहिली पाहिजेत. त्यासाठी मुंबईकरांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्का बजावलाच पाहिजे.
 
जवळपास ३० वर्षे मुंबईसारख्या अर्थनगरीची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती होती. हा काळ एखाद्या शहराचा कायापालट करण्यासाठी खूप मोठा असतो. पण, ३० वर्षांपूर्वीच्या मुंबईपेक्षा आजची मुंबई अधिक सुंदर आणि राहण्यायोग्य आहे का, याचा विचार मुंबईकरांनी केला पाहिजे. तो केल्यास या शहराच्या बकालपणाला आणि अधोगतीला जबाबदार असलेल्या नेत्यांच्याच हाती या महानगराची सूत्रे देणे योग्य ठरेल का, हे आता मुंबईकरांना ठरवायचे आहे. त्यासाठी भावनिक राजकारण बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची गरज आहे.
 
गेल्या ३० वर्षांत मुंबईचा बकालपणा झपाट्याने वाढला आणि धारावीसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीने मुंबईला व्यापून टाकले. अर्थात, शहराच्या अन्य भागांमध्येही छोट्या-मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. त्यात परप्रांतातून आलेले बेरोजगार लोक आणि बेकायदा बांगलादेशी मुस्लिमांची वस्ती निर्माण झाली. एकीकडे मुंबईतील मराठी माणसाचे प्रमाण घटले आणि त्यांची जागा बाहेरच्या राज्यांतून आलेल्या नागरिकांनी घेतली. पण, ठाकरे यांनी आपली सत्ता राखण्यासाठी मराठी माणसाच्या हिताचा दावा करण्याचे भावनिक राजकारणाचेच डावपेच खेळले. मुंबईकरांच्या वाट्याला केवळ मुंबईबाहेरचा रस्ता आला. आता याच परदेशी लोकांच्या जोरावर मुंबईत पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न ठाकरे करीत आहेत. यावरून त्यांचे मुंबईकरांबद्दलचे प्रेम किती बेगडी होते, ते लक्षात येईल.
 
मुंबईत जन्माला आले नसतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या विकासासाठी जितके योगदान दिले आहे, त्याच्या एक दशांशानेही योगदान ठाकरे यांचे नाही. मुंबईत आज दिसणारे कोस्टल रोड, मेट्रो रेल्वे, नवा विमानतळ वगैरे वाहतुकीचे सारे प्रकल्प हे फडणवीसांनी उभे केले आहेत. ठाकरे यांनी या प्रकल्पांना फक्त विरोध केला; पण ते तयार झाल्यावर त्याचे श्रेय लाटण्याचा निलाजरेपणाही केला.
 
मुंबईचे स्वरूप येत्या ५० वर्षांत कसे असेल, याचा विचार करून शहराच्या विकासाचे नियोजन करण्याची गरज आहे. येत्या काही वर्षांत येथे किती माणसे असतील? त्यांचे कामाचे ठिकाण कुठे असेल? तेथे ते कशी ये-जा करतील? त्यासाठी कोणत्या वाहतुकीच्या साधनांचा वापर होईल? त्याचा शहराच्या पर्यावरणावर कसा परिणाम होईल? यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आधीच काढावी लागतात. त्याला अनुसरून शहराच्या विकासाचे प्रकल्प राबवावे लागतात. मुंबईतील बव्हंशी जागा ही झोपडपट्ट्यांनी व्यापली आहे. धारावी हा त्यापैकी मोठा भाग आहे. पण, ही केवळ गरिबांची वस्ती नाहीये. त्यात अनेक कारखाने कार्यरत असून, त्यांचा माल परदेशातही जातो. त्यामुळे आता धारावीच्या विकासाचा व्यापक आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला असून, धारावीच्या विकासाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. त्यात हा भाग केवळ निवासी राहणार नाही, तर सध्याच्या छोट्या-मोठ्या उद्योजकांना येथेच आपला उद्योग सुरू ठेवण्यासाठी सर्व सुविधा आणि जागा मिळेल. धारावी हे आजच्या ‘बीकेसी’प्रमाणे नवे आर्थिक केंद्र बनेल, अशी दूरदृष्टीची योजना मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केली आहे. तसेच ‘बीडीडी चाळ’ नावाच्या नरकात राहणार्‍या मराठी माणसाला ५०० चौ. फुटांचे प्रशस्त आधुनिक घरही फडणवीसांनी तेथेच बांधून दिले. लवकरच सर्व बीडीडी चाळी इतिहासजमा होतील.
 
मुंबईप्रमाणेच सर्वच मोठ्या शहरांमधील जीवनशैली अधिक संपन्न आणि सुरक्षित होण्याची गरज आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात तब्बल २९ महापालिका आहेत, यावरून महाराष्ट्राचे शहरी स्वरूप लक्षात येईल. दिवसेंदिवस शहरीकरण वाढतच जाणार आहे. शहराचा असा विकास होत असताना प्रत्येक शहराची स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख पुसली जाणे आणि काही ठरावीक नेत्यांनाच या विकासाचा लाभ मिळणे, ही शोकांतिका म्हणावी लागेल. तसे घडू नये आणि विकास होत असताना त्या विकासाची फळे सामान्य जनतेलाही मिळावीत, यासाठी भविष्यवेधी दृष्टी लाभलेल्या नेत्यांची निवड आपल्याला करायची आहे, हे या शहरांतील नागरिकांनी लक्षात घेऊन आज मतदान करावे.
 
मुंबई महापालिका निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी निराशाजनक आहे. गेल्या ३० वर्षांत २०१७ मधील निवडणूक वगळता, मतदानाने ५० टक्क्यांचा टप्पाही कधी ओलांडलेला नाही. मुंबईबद्दल प्रेम असलेल्या मतदारांनी आजचा दिवस हा सुटीचा नसून, आपले भविष्य ठरविणारा असल्याचे समजून जास्तीत-जास्त संख्येने मतदान करुन लोकशाहीचा हा उत्सव सर्वार्थाने साजरा करावा!