स्वस्त पेयांची विषारी खेळी

    15-Jan-2026
Total Views |
Alcohol & Sugary Drinks
 
जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच जाहीर केलेला ‘ग्लोबल रिपोर्ट ऑन द युज ऑफ अल्कोहोल अ‍ॅण्ड शुगर-स्वीट बेव्हरेज टॅसेस’ हा अहवाल केवळ सांख्यिकी किंवा आरोग्यसंबंधी शिफारसींचा दस्तऐवज नाही; तर तो आधुनिक जगातील आहारसंस्कृती, आर्थिक धोरणे आणि आरोग्य-नियोजन यांच्यातील ढासळलेल्या सहसंबंधाचे निदर्शक आहे. आज जगभरात मद्य आणि शर्करायुक्त पेये अधिक स्वस्त होत असून, त्यांचे आरोग्यावरील दुष्परिणाम मात्र प्रचंड वेगाने वाढत आहेत. या पेयांच्या किमतीतील स्थैर्य, उद्योग क्षेत्राचा दबाव आणि सदोष कररचना यांमुळे ही पेये सर्वसामान्यांच्या, अगदी अल्पवयीन मुलांच्या आयुष्यातही सहजपणे प्रवेश करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ही स्थिती केवळ वैयक्तिक आरोग्याच्या प्रश्नापुरती मर्यादित नाही, तर ती व्यापक सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य संकटाची नांदी आहे.
 
या अहवालातील सर्वात चिंताजनक बाब अशी की, बहुतेक देशांमध्ये शर्करायुक्त पेये आणि मद्यपान यांवरील करदर कमी राखण्यात आले असून, ते कालसुसंगत पद्धतीने वाढवण्यात आलेले नाही. त्यामुळेच वास्तविक अर्थाने या उत्पादनांची किंमत कमी राहिल्याने बाजारपेठांतील त्यांची उपलब्धता वाढते. काही देशांमध्ये उत्पादनातील साखर कमी करण्याच्या किंवा उत्पादनांची पुनर्रचना करण्याच्या उपक्रमांची चर्चा होते; परंतु ते प्रयत्न आर्थिक हितसंबंधांसमोर दुर्बल ठरताना दिसतात. मद्य, कार्बोनेटेड पेये, ऊर्जा पेये व तयार कॉफी वा चहा असोत, यांच्या किमतीतील वाढ अत्यंत नगण्य असून, जागतिकवाढीच्या पार्श्वभूमीवर ती उत्पादने आज पूर्वीपेक्षा तुलनेने अधिक स्वस्त आहेत. या सुलभतेचा परिणाम म्हणून सेवनात झालेली वाढ ही सामाजिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थांनाही धक्का देत आहे.
 
आरोग्यदृष्ट्यासुद्धा ही स्थिती धोक्याचीच घंटा आहे. शर्करायुक्त पेयांतील अतिरिक्त फ्रुटोज आणि ग्लुकोज शरीरातील चयापचय प्रक्रियांना बाधित करतात. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्वादुपिंड आणि यकृतातील चरबी अशी गुंतागुंत वाढते. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार, जागतिक पातळीवर ‘टाईप-२’ मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामागे गोड पेयांचे सेवन हाच महत्त्वाचा घटक आहे. यकृतावर जमा होणारी चरबी, पेशींचे नुकसान आणि यकृताच्या कर्करोगापर्यंत पोहोचू शकणारे बदल हे आता अनेक देशांमध्ये गंभीर स्वरूप धारण करत आहेत. मुलांमध्ये अतिचंचलता, चिडचिड आणि झोपेच्या तक्रारी वाढताना आढळतात. कारण, गोड पेये मेंदूतील यंत्रणेला अनैसर्गिक रीतीने उत्तेजित करतात.
 
मद्यपानाचे दुष्परिणाम तर अधिकच व्यापक आहेत. मानसिक अनारोग्य, यकृताचे आजार, रक्तदाबातील अनियमितता, हृदयविकार, रस्ते अपघातातील मृत्यू, घरगुती हिंसाचार या सर्वांकडे या अहवालात ठोस आकडेवारीसह बोट दाखविण्यात आले आहे. मद्यातील ‘अ‍ॅसिटाल्डिहाईड’ शरीरातील पेशींसाठी हानिकारक ठरतो आणि तोंड, घसा, यकृत व पोट यांसारख्या अवयवांच्या कर्करोगाचा धोका वाढवतो. हे सर्व परिणाम एकत्र विचारात घेतले, तर मद्य आणि शर्करायुक्त पेये ही आधुनिक समाजाच्या आरोग्याचा मूक शत्रू ठरत चालल्याचे दिसते.
 
जागतिक परिस्थितीचा विचार केला, तर श्रीमंत देश काही प्रमाणात आरोग्यदायी कर धोरणे राबवितात. तथापि, उद्योग क्षेत्राचा प्रभाव, राजकीय अनिच्छा आणि ग्राहकांच्या ‘अधिकारांच्या’ नावाखाली केलेल्या विरोधामुळे अनेक सुधारणा थांबतात. गरीब देशांत ही समस्या आणखी गुंतागुंतीची बनते. अशा देशांमध्ये कर वाढविणे म्हणजे महागाई वाढल्याचा आरोप, आर्थिक मंदीचा धोका किंवा स्थानिक उद्योगांवर येणारा ताण अशी कारणमीमांसा त्वरित पुढे येते. परिणामी, अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी दीर्घकालीन आरोग्य-नियोजनबळी पडते.
 
या सर्वांचा व्यापक अर्थ असा की, स्वस्त पेये हे आधुनिक आरोग्यव्यवस्थेच्या वाट्याला आलेले सर्वात मोठे आव्हान आहे. ज्या समाजात ही उत्पादने सहज उपलब्ध असतात, त्या समाजात आरोग्यसेवेवरील खर्च झपाट्याने वाढतो. त्यामुळेच आज जगातील सरकारांनी उद्योग क्षेत्राच्या दबावापेक्षा जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिल्यास या संकटावर मात करता येईल, अन्यथा आजची स्वस्त पेये उद्याच्या प्रचंड आरोग्य बोजाचे आणि असमतोल अर्थकारणाचे कारण ठरतील.
 
- कौस्तुभ वीरकर