मल्लिका ढसाळ आजारपणाशी झुंज देत असताना देवेंद्र फडणवीस यांचा आधार
15-Jan-2026
Total Views |
मुंबई :( Devendra Fadnavis ) सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि दलित चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व पद्मश्री स्व. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नाव शाहीर अमर शेख यांच्या कन्या मल्लिका नामदेव ढसाळ सध्या आजारपणाशी झुंज देत आहेत. या कठीण काळात नामदेव ढसाळ यांच्यासोबत विविध चळवळींमध्ये कार्यरत असलेले किंवा त्यावेळी सक्रिय असलेले अनेक सहकारी, मित्रपक्ष आणि नेत्यांकडून कोणतीही चौकशी अथवा संपर्क न झाल्याची खंत मल्लिका ढसाळ यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख प्रतिष्ठानतर्फे मल्लिका ढसाळ यांना वैद्यकीय मदत करण्यात येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेत उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मल्लिका ढसाळ यांना धीर देताना सांगितले की, कोणीही आपल्या सोबत नसले तरी राज्य सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील. नामदेव ढसाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सामाजिक, साहित्यिक आणि चळवळीतील योगदान अतिशय मोलाचे असून, ते कधीही विसरले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत मल्लिका ढसाळ यांची संपूर्ण जबाबदारी घेण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
या संवादावेळी मल्लिका ढसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आपुलकीच्या शब्दांबद्दल आणि संवेदनशील भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या धीर देणाऱ्या संवादामुळे मानसिक बळ मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या हस्तक्षेपामुळे मल्लिका ढसाळ यांच्या उपचारांबाबत दिलासा मिळाला असून, शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळत असल्याची माहिती संवाद दरम्यान उपस्थित असलेल्यांनी दिली.