धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः|
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥अ.१श्लो.१॥
धृतराष्ट्र म्हणतो, "हे संजया, माझे आणि पंडूचे पुत्र धर्मक्षेत्रावर आणि कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याच्या हेतूने एकत्र आले आहेत, त्यांचा वृत्तांत कथन कर.” या श्लोकाचा योग्य आशय ध्यानात आणण्यासाठी ज्ञानदेवता श्रीगणेशाला गहन चिंतन करावे लागले. आता प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, एका युद्ध क्षेत्रासाठी वेदव्यासांनी ‘धर्मक्षेत्र’ आणि ‘कुरुक्षेत्र’ अशी दोन विशेषनामे का ठेवली? एक क्षेत्र वा गावासाठी दोन नावे ठेवली, तर व्यवहारात बराच गोंधळ निर्माण होईल. भगवान वेदव्यास हे सर्व जाणत होते. असे असतानाही व्यासांसारख्या प्रखर बुद्धिमान व्यक्तीने, अशा तर्हेने एकाच युद्धभूमीसाठी दोन विशेषनामांचा प्रयोग का केला असावा? व्यासांचा आशय समजण्यासाठी आम्हाला ‘ईशावास्योपनिषदा’चा आधार घ्यावा लागेल. कारण सर्व उपनिषदांचे मंथन करूनच, भगवान वेदव्यासांनी आपणासमोर गीतामृत ठेवले आहे.
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः|
पार्थोवत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्॥
‘ईशावास्योपनिषदा’मध्ये जन्मांध धृतराष्ट्र व त्याचे १०० दुर्गुणी पुत्र, तसेच धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र यांविषयी सत्य ज्ञान सांगितले आहे.
असूर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृता|
तान्स्ते प्रेत्याभिगच्छन्ति ते के चात्महनो जना॥ईशा.श्लो.३॥
अज्ञानाने अंध असणारे लोक ‘असूर्या’ म्हणजे, अज्ञान रुपी अंधकाराने व्याप्त अवस्थेत असतात. म्हणूनच ते स्वतःच्याच खर्या अस्तित्वाला जाणू शकत नाहीत. मृत्यूनंतर प्राप्त होणार्या प्रेतावस्थेला असे अज्ञानांध जातात. असल्यांचे अज्ञानाने आवृत्त जीवन आत्मघातकी नाही काय?
ज्ञानमय वैदिक परंपरा प्रत्येकाच्या कर्मानुसार मिळणार्या फळावर आणि म्हणून पुनर्जन्मावर विश्वास ठेवते. कर्षणशक्तीमुळे चंद्र जसा पृथ्वीभोवती फिरतो, तद्वत् जडावर आसक्त असलेले जीवात्मे मृत्यूनंतर जडाशीच संबद्ध असतात. ‘सुर’ म्हणजे समोर जाणे आणि ‘असुर’ म्हणजेच जडात बद्ध असलेली व्यक्ती. असल्या अतृप्त, आसक्त अवस्थेला उपनिषदे ‘असूर्या’ असे म्हणतात. असले आसक्त पुरुष स्वतःच्या जडशरीराचे राजे असले, तरी त्यांच्या उन्नयनित आध्यात्मिक जीवनाकरिता आंधळे असतात. ‘राष्ट्र’ म्हणजे आपला पिंड आणि धृत म्हणजे धारण केलेला. असल्या ज्ञानांधांना ज्ञानचक्षु असलेल्या संजयाने साहाय्य करायला हवे. संजय म्हणजे कोणतीही सदसद्विवेक बुद्धियुक्त सतर्क मन होय.
धृतराष्ट्र
पिंडरूप हस्तिनापूरचा नाममात्र राजा म्हणजे अज्ञानांध धृतराष्ट्र दाखविला असला, तरी तो त्याचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधनाच्या सल्ल्याने वागत असतो. ‘दुः’ म्हणजे वाईट आणि ‘योधन’ म्हणजे हट्टी, भांडखोर वृत्ती होय. आपल्यातील चांगल्या वृत्तींशी सदा संघर्ष करणारी साधकातील हट्टी, भांडखोर वृत्ती म्हणजे दुर्योधन. ‘राष्ट्र’ म्हणजे आपला पिंड आणि ‘धृत’ म्हणजे त्या पिंडाचा स्वामी. अशा तर्हेने प्रत्येकजण धृतराष्ट्र आहे; परंतु गीतेतील धृतराष्ट्र हा स्वतःच्याच आध्यात्मिक उन्नतीसाठी अंध असतो. स्वतःच्याच उच्च उन्नयनित पांडवी वृत्तींशी कोणताही समेट करण्यास तयार नसणार्या दुर्योधनी वृत्तीच्या कह्यात असतो. व्यासांनी सांगितलेल्या धर्मक्षेत्रावर वृत्तींच्या अस्तित्वाकरिता धर्मयुद्ध सुरू होते. मनावर होणार्या सततच्या संस्कारातून जे संस्कार मनाच्या रसानुसार ग्राह्य मानले जाऊन स्थिर बनतात, त्यांना ‘वृत्ती’ असे म्हणतात. कर्माचे क्षेत्र म्हणजे आपले शरीर होय. मनाच्या पिंडधर्माला अनुरूप अशा क्षेत्राला व्यास ‘धर्मक्षेत्र’ म्हणतात, तर कर्माला योग्य अशा शरीररूप कर्मक्षेत्राला ‘कुरुक्षेत्र’ असे म्हणतात. ग्रहण केलेल्या स्थिर संस्कारांना ‘धर्म’ म्हणतात, तर कुरु म्हणजे कर्म करणे होय. अशा तर्हेने वृत्तींचे युद्ध धर्मक्षेत्रावर आणि कुरुक्षेत्रावर सुरू होते.
कौरवांचा पूर्वपुरुष ‘कुरु’ हा ‘कुरुदेश’ नावाच्या राज्याचा राजा दाखविला गेला असून, तो स्वतः तेथे शेती करत होता असे सांगितले आहे. १३व्या अध्यायातील अगदी पहिल्याच श्लोकात या क्षेत्राबद्दल अथवा शेतीबद्दल सांगितले आहे.
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र मित्यभिधीयते|
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः॥(अ.१३,श्लो.१)
हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र अथवा शेती म्हणतात. जो या क्षेत्ररूप शरीराला जाणेल, त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. राजा कुरु अशाच शरीररूप क्षेत्राची मशागत करीत होता आणि असल्या कुरु राजाचे वंशज म्हणजे कौरव होत.
गांधारी
हस्तिनापूर राज्याचा अंध राजा धृतराष्ट्र याची पत्नी म्हणून गांधारी दाखविली आहे. गांधारी पतिव्रता दाखविल्यामुळे, एखाद्या पतिव्रतेप्रमाणे गांधारी वृत्तीसुद्धा आपला पती पाहू शकत नाही. म्हणूनच स्वतःच्या डोळस ज्ञानावर पट्टी बांधून जाणूनबुजून अंध बनते. ‘ईशावास्योपनिषद’ अशा गांधारी वृत्तीबद्दल सांगते,
अंधं तमः प्रविशान्ति येऽसंभूतिमुपासते|
ततो भूय इव ते तमो य उ संभूत्याँ रतः॥२॥
जे डोळस राहून इतरांचे अंधानुकरण करतात, ते अधिक खोल अशा अज्ञानांधकारात सतत राहतात. अशा तर्हेने साधकातील गांधारी वृत्ती आपल्या अंध वृत्तीरूप पतीशी एकनिष्ठ राहण्याच्या दृष्टीने, ज्ञानदृष्टी असूनसुद्धा त्याचा उपयोग ज्ञानचक्षूंवर पट्टी बांधून नाकारते. ज्ञानाला नाकारणारी अशी आपल्यातीलच गांधारी वृत्ती होय. परमेश्वराने जन्मतः प्रत्येक मानवाला विवेक ज्ञान दिले असतानाही, गांधारीप्रमाणेच स्वतःची बुद्धी न वापरता, इतरांच्या नादी लागून ज्ञानाला वंचित होणारे अनेक लोक असतात. असले लोक अज्ञानापेक्षाही अधिक खोल अशा अज्ञानांधकारात सडत पडतात. गांधारी अशा तर्हेची जन्मांध धृतराष्ट्राची डोळस पतिव्रता पत्नी दाखविली आहे. असल्या गांधारीला जन्मांध धृतराष्ट्रापासून १०० कौरव पुत्र आणि एक मुलगी झाली. ज्यांची नावे ‘दुः’ म्हणजे वाईट या विशेषणाने सुरू होतात. ‘गांधारी’ या नावातसुद्धा वेदव्यास आपली अतुल बुद्धिमत्ता दाखवितात. ‘गंध’ म्हणजे ज्ञान आणि उत्तम कर्म आणि ‘अरि’ म्हणजे शत्रू. त्यामुळे ज्ञानाशी शत्रुत्व ठेवणारी वृत्तीरूप धृतराष्ट्रपत्नी आणि कौरवांची माता गांधारी होय.
१०० कौरव
ज्ञानांध धृतराष्ट्रापासून गांधारीला १०० पुत्र व एक पुत्री झाली, असे दाखविले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, सर्व १०१ पुत्र व पुत्रीची नावे ‘दुः’ म्हणजे वाईट अशा विशेषणांनी सुरू झाली आहेत. आपल्यात दुर्वृत्ती अनेक असतात. म्हटलेच आहे ‘विवेकभ्रष्टानां भवति विनीपातः शतमुखः|’ असल्या १०० वृत्तीरूप प्रवाहांद्वारे आपले अधःपतन होत असते.
- योगिराज हरकरे