बाळराजांची कला?

    15-Jan-2026   
Total Views |
Aaditya Thackeray
 
काका नकलाकार, भरीस भर अख्खी ‘अजान’ तोंडपाठ असलेली स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अद्वातद्वा बोलणारी अंधार मावशी आणि ‘दिवा फडफडतोय’ बोलणार्‍या काकूंची कमी होती की, काय म्हणून आता बाळराजे पण मिमिक्री करायला लागले; पण लोकांना कौतुक म्हणून ते नाहीच. बाळराजांनी शिरा ताणून-ताणून नक्कल करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या कोमल आवाजात तो आवेश आलाच नाही. त्यात त्यांची काय चूक? तर लागले लोक बोलायला की, नक्कल करायलाही अक्कल लागते. यावर बाळराजे आणि त्यांचे बाबा, काका यांचे म्हणणे असेल की, आजोबांच्या नावाने, मराठी माणसाच्या नावावर आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, असा कांगावा करत भावनिक ‘ब्लॅकमेल’ ज्यांना करतो, त्यांना अकलेची गरज आहे, आम्हाला नाही.
 
खरंच आहे. कारण, दरवर्षी दरनिवडणुकीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात, असे बळेच आणि खोटे म्हणत जनतेला मूर्ख बनवायचा प्रयत्न करणे याला काय म्हणावे? पण, जनता मूर्ख नसते आणि आजकालची जनता तर मुळीच नाही. भावनिक मुद्दा उपस्थित करणार्‍यांनाच क्षणिक भावनेच्या भरात पाच वर्षे नकारात्मक आणि निष्क्रिय लोकांना सत्तेत बसवण्याचे पाप जनता आता करणार नाही. असो. बाळराजांनी म्हणे, देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केली. सोशल मीडिया आणि त्यातही रील्समुळे लोकांना फुकटमध्ये मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाले. नवे कलाकार, नव्या संकल्पना, नवे विनोद, नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या रील्समुळे लोकांचा चांगला ‘टाईमपास’ होतो. त्यामुळे कुणी नेता केवळ मिमिक्री करून सत्तेची स्वप्ने पाहत असेल, तर जनतेला ना त्या मिमिक्रीचे कौतुक, ना नेत्याचे कौतुक. त्यामुळेच बाळराजेंच्या मिमिक्रीचा विषयच संपला. पण, हे बाळराजेंना कोण सांगणार? काही लोक म्हणतात की, शिवाजी पार्कच्या काकांनी मिमिक्री करत-करत आयुष्याची मिमिक्री केली. ऑर्केस्ट्रात एकच नकलाकार असतो. दोनपेक्षा जास्त असे कलाकार तमाशातच असतात आणि मुंबईकरांचे म्हणणे आहे; मराठी, गुजराती,उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय म्हणत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचाजो कलगीतुरा यांनी सुरू केला आहे, तो बस झाला. बस झाला तमाशा!
 
चुलत बाळराजांचे ज्ञान!
 
‘माझे बाबा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात बाहेरून येणार्‍या ट्रेन आम्ही बंद करू’, इति चुलत बाळराजे अमित ठाकरे. यावर काय म्हणावे? मुळात चुलत बाळराजेंचे बाबा मुख्यमंत्री होणार का आणि कसे? यावरच मोठे प्रश्नचिन्ह. तो विचार करण्याआधी हा विचार करणेही महत्त्वाचे आहे की, मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राबाहेरून येणार्‍या ट्रेन बंद करू शकणारे राज ठाकरे स्वतः त्यांच्या मुलाला अमित ठाकरे यांना आमदारसुद्धा बनवू शकले नाहीत. जाऊ दे, आपल्याला काय? पण, माणसाचे सामान्यज्ञान किती अतिसामान्य असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमित ठाकरेंचे हे वक्तव्य!
 
बरं एकवेळ स्वप्नातल्या स्वप्नात राज ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, तरी रेल्वे खाते हे केंद्र सरकारकडे. त्या रेल्वे बंद करायच्या की चालवायच्या, याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे नाहीतच. मग, स्वप्नात मुख्यमंत्री झालेले राज ठाकरे या रेल्वेगाड्या कशा बंद करतील? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात भारताला जोडण्याचे सर्वार्थाने प्रयत्न केले. भारताला जोडून ठेवण्यामध्ये रेल्वेच्या जाळ्याचे सामर्थ्य मोठे आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून भारतीय देशभरात कुठेही जाऊ-येऊ शकतात. पण, याच रेल्वे महाराष्ट्रात येऊ न देण्याचे घातकी आणि संविधानविरोधी विधान अमित ठाकरे यांनी केले आहे. हा त्यांचा अज्ञानीपणा आहे का? अमित ठाकरे किंवा त्यांचे कुटुंब महाराष्ट्राबाहेर कुठेच जात नाहीत का? नाही, तसे तर बिलकूल नाही. अमित ठाकरेंसह अख्खं ठाकरे कुटुंब महाराष्ट्राबाहेर काय, देशाबाहेरही सर्रास जात असते. असो. अमित ठाकरे हे कधी गुजरातला गेलेत का? नवसारी, बलसाड, बडोदा, इतकेच काय तर मध्य प्रदेशात इंदोरला, बिहारच्या पटण्यामध्ये आणि अगदी तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीलाही मराठी कुटुंबे राहतात, ते काय मराठी नाहीत? हो, ते मराठी आहेत, ते हिंदू आहेत आणि सर्वात आधी भारतीय आहेत. पण, हे हिंदुत्व आणि हे भारतीयत्व ठाकरे कुटुंब विसरलेत. त्यांना हिंदूमध्ये फूट पाडायची आहे, असे दिसते. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा स्पष्ट संदेश असताना हे कुटुंब हिंदूंमध्ये प्रांत-भाषा भेद करत आहेत. देव त्यांना सुबुद्धी देवो, किमान चुलत बाळराजेंचे सामान्यज्ञान वाढवो!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.