मुंबई : ( Raj Thackeray ) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेमध्ये ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या विस्तारावरून भाजपवर टीका केली. यावे़ळी एकाच उद्योजकाला सगळे प्रकल्प कसे मिळतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे राहात असलेल्या शिवाजी पार्क भागात सध्या अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. या क्षेत्रात एका विकासकाचा ‘आडवा विकास’ही प्रचंड वेगाने होत असल्याचे चित्र बघायला मिळते. यावरूनच राज ठाकरेंच्या आजूबाजूच्या परिसरात नेमके सुगीचे दिवस कुणाचे, यावरून समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे.
सध्या दादर विभागात इमारतीच्या पुनर्विकासाची कामे सुरू असून, येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शिवाजी पार्क परिसरातही पुनर्विकासाच्या कामांनी जोर धरला आहे. इथे जुन्या इमारत असलेल्या भागात अनेक पागडी इमारतींचा पुनर्विकास होणार असून, या प्रक्रियेत एकच विकासक मात्र अभूतपूर्व आक्रमकतेने पुढे सरसावताना दिसतो. या विकासकाचे फलक आज संपूर्ण दादर परिसरात झळकत असून, कधी गल्लीच्या वळणांवर, कधी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, तर कधी नव्या उंच इमारतींच्या माथ्यावरही झळकताना दिसतात. या विकासकाचे काही प्रकल्प पूर्ण झाले असून, काही प्रकल्प वेगाने उभे राहत आहेत. या विकासकाची आणखी अनेक बांधकामे लवकरच सुरू होणार असल्याचीही चर्चा परिसरात आहे. जवळपास २०पेक्षा अधिक प्रकल्प एकाच विकासकाचे असल्याने दादरच्या आकाशात रात्री चंद्राबरोबर या विकासकाचेच नाव झळकत असल्याची चर्चा दादर विभागात सर्रास रंगते. या विकासकाचा जलद विस्तार कसा होतो? असा प्रश्नही त्यामुळे साहजिकच उपस्थित होतो.
काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानी समूहाचे थेट नाव घेऊन टीकेची झोड उठवली. देशातील सर्व मोठे व्यवसाय, बंदरे, विमानतळ, कोळसा-वीज प्रकल्प, डेटा सेंटर सगळे एका अदानी समूहालाच कसे मिळतात? असा थेट सवालही त्यांनी केंद्र सरकारला यानिमित्ताने विचारला. देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये निवडक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोपही यानिमित्ताने त्यांनी केला. याच वेळी हे सर्व उद्योग गुजराती उद्योजकांना देऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी सभेदरम्यान केली. त्यामुळे ‘देशातील प्रकल्प एकाच उद्योजकाकडे’ अशी टीका करणारे राज ठाकरे त्यांच्याच निवासस्थानाच्या आसपास ‘आडवा विस्तार’ करत असलेला आणि दादरला ‘सुगीचे दिवस’ आणणारा नेमका विकासक कोण, याबाबत राज ठाकरे बोलतील का? हाच प्रश्न समाजमाध्यमांवरही उपस्थित केला जात आहे.