‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १९ वर्षांनंतर धमाकेदार रियुनिअन

    14-Jan-2026
Total Views |

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत काही असे चित्रपट आहेत, अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान करुन आहेत. तब्बल १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘साडे माडे तीन’ हा असाच एक अजरामर चित्रपट. साधी आपुलकीची कथा, निरागस विनोद आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या काळजात घर करणारे कुरळे ब्रदर्स या साऱ्यांमुळे हा चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो. आणि आता, जवळपास दोन दशकांनंतर, ‘साडे माडे तीन’ची हीच जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

येत्या ३० जानेवारी रोजी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच या चित्रपटाचा रियुनिअन सोहळा नुकताच मोठ्या दणक्यात पार पडला आणि या कार्यक्रमाने सगळ्यांनाच जुन्या आठवणींत हरवून टाकलं. या रियुनिअनमध्ये ‘साडे माडे तीन’चा अविभाज्य भाग असलेले सचित पाटील, यांच्यासह ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची संपूर्ण टीम उपस्थित होती. स्टेजवर कलाकार आले आणि जणू काळ मागे फिरला. कुरळे ब्रदर्स पुन्हा एकत्र पाहून उपस्थितांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. यावेळी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रमोशनल साँगचे बीटीएसही दाखवण्यात आले.

या कार्यक्रमात केवळ औपचारिक बोलणं नव्हतं, तर प्रचंड धमाल, मस्ती आणि खळखळून हसवणारे किस्से रंगले. शूटिंगच्या दिवसांतील गंमती-जंमती, पडद्यामागचे मजेशीर प्रसंग, सेटवरील आठवणी सगळंच पुन्हा जिवंत झालं. काही क्षण असे होते की, कलाकार स्वतःच नॉस्टेलजिक झाले होते. प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर करताना त्या जुन्या दिवसांची ऊब पुन्हा अनुभवली.

दरम्यान, या सिक्वेलमध्ये झालेली रिंकू राजगुरुची एंट्री ही सध्या सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरत आहे. दमदार भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाणारी रिंकू, या वेळी थेट कुरळे ब्रदर्सच्या दुनियेत दाखल झाली आहे. आता ती या भावंडांमध्ये नेमका कोणता नवीन गोंधळ घालणार? तिची एन्ट्री कथेला कोणते वेगळे वळण देणार? हे सगळं चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडणार आहे. पण इतकं मात्र नक्की की, तिच्या भूमिकेमुळे चित्रपटातील मजा आणखी दुप्पट होणार आहे.

‘साडे माडे तीन’ पाहिलेल्या जुन्या प्रेक्षकांमध्ये या सिक्वेलबाबत आधीच प्रचंड उत्सुकता आहे. अनेकांसाठी हा चित्रपट म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या, तरुणपणाच्या आठवणींशी जोडलेला आहे. तर दुसरीकडे, आजची तरुण पिढीही या कुरळे ब्रदर्सना नव्याने ओळखण्यासाठी उत्सुक आहे. एकूणच, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट केवळ सिक्वेल नसून, तो प्रेक्षकांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि नव्या पिढीला मराठी विनोदाचा निरागस स्वाद देणारा ठरणार आहे.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत.

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद असलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.