‘धुरंधर’ची अजूनही हवा, त्याआधी ‘या’ चित्रपटांनीही केला होता बॉक्स ऑफिसवर धुरळा

    14-Jan-2026
Total Views |

मुंबई : 'धुरंधर'  हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास दीड महिना होत आहे. मात्र अजूनही चित्रपटाची हवा काही कमी होताना दिसत नाही. आणि फक्त देशातच नाही तर देशाबाहेरही अनेक ठिकाणी सिनेमा सुपरहीट ठरला आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवे विक्रम रचत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशासह परदेशातही या चित्रपटाने दमदार कामगिरी करत भारतीय सिनेसृष्टीचा झेंडा उंचावला आहे. चित्रपटाने अवघ्या ३९ दिवसांत तब्बल १२५९.५० कोटी रुपये कमावले असून ४० दिवसांत हा आकडा १२६२ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे परदेशातील कमाईचाही आकडा लक्षणीय असून धुरंधरने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर जवळपास २९० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. काही अरब राष्ट्रांमध्ये सिनेमावर बंदी घालण्यात आली होती मात्र असं असलं तरीही चित्रपटाने विक्रमी कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान धुरंधर आधी आणखी काही चित्रपटांनीसुद्धा असाच विक्रम केला होता

या भक्कम कामगिरीसह धुरंधरने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ८१०.५ कोटी रुपये कमावत देशातील चौथा सर्वात मोठा कमाई करणारा सिनेमा होण्याचा मान पटकावला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ‘KGF Chapter 2’ (२०२२) असून या चित्रपटाने देशभरात ८५९.७ कोटी रुपयांची कमाई केली होती. विशेष म्हणजे हे कलेक्शन हिंदीसह कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ अशा पाच भाषांमधील एकत्रित कमाईचा आहे. पहिल्या क्रमांकावर १२३४.१ कोटी रुपयांच्या देशांतर्गत कमाईसह ‘पुष्पा २’ आपलं अव्वल स्थान कायम ठेवून आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा ‘बाहुबली २’ असून या चित्रपटाने १०३०.४२ कोटी रुपये देशभरात कमावले होते.


धुरंधरची ही घवघवीत कामगिरी भारतीय सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद मानली जात असून पुढील काळात चित्रपट आणखी कोणते विक्रम मोडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय मार्च २०२६ मध्ये चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याकडेही प्रेक्षकांचं लक्ष आहे. या चित्रपटाची कथा पाकिस्तानातील कराची शहरातील कुख्यात ल्यारी परिसरावर आधारित असून हा भाग गँगवॉर आणि हिंसक राजकरण आणि वर्चस्वाच्या संघर्षांसाठी ओळखला जातो. दरम्यान प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला असून देशभरात कौतुकही होत आहे.