दूर जाणे हीच तुमची सर्वांत मोठी शक्ती का आहे?

    13-Jan-2026
Total Views |

The Strength in Stepping Back

 
समस्येपासून दूर जाण्याला खरं तर लोक पळपुटेपणा मानतात. दूर जाणे म्हणजे कमजोरी, भित्रेपणा, संघर्षापुढे लोटांगण घालणे, असा एक सर्वसाधारण गैरसमज. दूर जाणे म्हणजे पळून जाणे नव्हे; पण दुर्दैवाने अनेकदा या दोन्ही गोष्टींना नकारात्मक समजले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती संघर्षातून माघार घेण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिला कमकुवत, लढा नाकारणारी, पराभूत व्यक्ती मानले जाते आणि तत्काळ लोकांचा अशा व्यक्तीबद्दलचा आदर कमी होतो. पण, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, दूर जाणे म्हणजे पळून जाणे नव्हे.

आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते, धीर धर, लढ, स्वतःला सिद्ध कर! बहुतेक लोकांना वाटते की, ‘पॉवर’ म्हणजे मोठा आवाज करणे, वादविवाद, प्रत्युत्तर, टोलेबाजी. पण, खरी भावनिक प्रगल्भता तेव्हा दिसते, जेव्हा आपल्याला लक्षात येते की, आपली ऊर्जा या क्षणी मर्यादित आहे.

जेव्हा तुम्ही माघार घेता, तेव्हा तुमच्याकडे संधी असो व नसो, तुम्ही संघर्षात न गुंतण्याचा निर्णय स्वेच्छेने घेता. तुम्ही असा एक वेगळा मार्ग निवडलेला असतो, जिथे तुम्हाला पुढे अर्थहीन संघर्ष करायचा नसतो. अशा निवडक माघारी घेण्यामागील कारणे पूर्णपणे स्पष्ट नसल्यामुळे लोकांचे नेहमीच गैरसमज होतात.

आपण कुठे लक्ष द्यायचे नाही, हे ठरवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कुठे लक्ष गुंतवायचे, हे ठरवणेही. ज्या गोष्टी तुमच्या शांततेला विषारी ठरतात, त्यांच्यापासून जितके दूर राहता, तितके तुम्ही अधिक निरोगी होता. हे केवळ शारीरिक नाही; ही मानसिक मुक्तता आहे.

१. खाली खेचणार्‍यांपासून दूर जाणे : नकारात्मक लोकांची साखळी तोडणे.

आपण मोठ्या प्रमाणात आपल्या सभोवतालच्या लोकांचे प्रतिबिंब असतो. सतत नकारात्मकता, शंका, टीका करणार्‍या लोकांच्या सहवासात राहणे म्हणजे निष्ठावान असणे नव्हे; तर ते म्हणजे हळूहळू स्वतःला विष पाजणे होय! आपले नातेसंबंध प्रगल्भ असायला हवेत, ओझे बनायला नकोत. अमेरिकन अभिनेते आणि दिग्दर्शक जोएल ऑस्टीन म्हणतात, "नकारात्मक लोकांसोबत राहून सकारात्मक आयुष्याची अपेक्षा करता येत नाही.” विषारी नात्यांपासून दूर जाणे ही निर्दयता नाही; ती आत्मसंरक्षणाची विचारपूर्ण कृती आहे.

कोणी तुमच्याकडून सतत प्रकाश मिळवत असेल आणि बदल्यात फक्त सावट देत असेल, तर त्या नात्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागते. स्वतःची वाढ गाठायची असेल, तर तुमच्या कुंठिततेचा फायदा घेणार्‍यांपासून स्वतःला मोकळं करावंच लागतं.

२. निरर्थक वादांचा अपव्यय :

आपण सगळेच कधी ना कधी अशा विचित्र वादात अडकतो, जिथे सत्य शोधणे हा हेतू नसतो, तर स्वतःचे वर्चस्व गाजवणे, हा उद्देश असतो. असे वाद मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहेत. यात शहाणपण म्हणजे प्रत्येक वादात आपण उपस्थित राहण्याची गरज नसते, हे जाणणे. आपल्याला भेटणारे काही लोक समजून घ्यायला आलेले नसतात; ते फक्त स्वतःची मतं सिद्ध करायला असतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात, "डुकरांशी कुस्ती करू नका. तुम्ही दोघेही मळता आणि डुकराला मजा येते!”

जेव्हा तुम्ही निरर्थक लढाईत सामील होण्यास नकार देता, तेव्हा तुम्ही आपोआपच जिंकता. तुम्ही तुमचा स्वाभिमान टिकवता, तुमची मनःस्थिती शांत राहते आणि तुमचा वेळ तुम्ही वाचवता. मौन म्हणजे पराभव नव्हे; ती एक स्पष्ट सीमारेषा असते, माझी शांतता तुझ्याबरोबर वादात जिंकण्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

३. दुसर्‍याला प्रभावित करण्याची गरज सोडणे :

माणसाला सर्वांत थकवणारे ओझे कोणते असेल, तर ते अशा लोकांकडून आपले कौतुक व्हावे, अशी इच्छा बाळगणे, ज्यांनी आधीच आपल्याला कमी लेखायचा निर्णय घेतला आहे. आपण त्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करतो, स्वतःला झुकवतो. आपले जीवन अशा साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो, जो आपल्यावर गैरसमज करून घेण्यावर ठाम असलेल्या लोकांसाठी कधीही पुरेसा ठरणार नाही. अशा माणसांना प्रभावित करण्याचा प्रयत्न म्हणजे अंध व्यक्तींसाठी चित्र रंगवण्यासारखे आहे.

ज्या क्षणी तुम्ही बाह्य मान्यतेचा पाठलाग थांबवता, त्या क्षणी तुम्ही खर्‍या अर्थाने मुक्त होता. आपली खरी किंमत ही आपल्याच अंतर्मनात असते, त्याला गाजावाजाची गरज भासत नाही.

पाऊल मागे घेण्याची कला

मागे हटणे ही सजगपणे अलिप्त होण्याची एक प्रक्रिया आहे. यामध्ये तीन महत्त्वाचे बदल समाविष्ट आहेत :

दखल घेणे : एखादी परिस्थिती किंवा व्यक्ती आपल्याला ऊर्जा देण्याऐवजी सातत्याने आपली ऊर्जा शोषून घेत आहे, याचा स्वीकार करणे.

केंद्रबिंदू बदलणे : ‘मी ही परिस्थिती कशी सुधारू’ यावरून ‘मी स्वतःला कसं सुरक्षित ठेवू,’ याचा विचार करणे.

मोकळी जागा : दूर गेल्यावर मिळणार्‍या शांततेत रममाण व्हायला शिकणे. अनेक लोक विषारी परिस्थितीत तसेच राहतात; कारण त्यांना बाहेर पडल्यानंतर येणार्‍या पोकळीची भीती वाटते. पण ती पोकळी खरं तर नवीन, आरोग्यदायी, विकास करण्यासाठी अधिक पोषक परिस्थिती असते. हे घरगुती हिंसेत अडकणार्‍या भगिनींसाठी महत्त्वाचे सत्य आहे.

संघर्षांपासून मागे वळून निघून जाणे, हे एक उच्च दर्जाचे मानसिक कौशल्य आहे. त्यासाठी गैरसमज होण्याची भीती न बाळगण्याचे धैर्य आणि योग्य संगत मिळेपर्यंत एकटे उभे राहण्याची ताकद लागते. ते नेमके कधी करावयाचे, याची योग्य संधी शोधणेही महत्त्वाचे आहे. जे तुम्हाला विद्ध्वंसक वाटते, त्यापासून दूर गेल्याने तुम्ही जीवनापासून पळून जात नाही, तर तुम्ही स्वतःच्या शांत अस्तित्वाकडे वाटचाल करत असता, जे परिपूर्ण आणि अर्थहीन विवादापासून मुक्त आहे.

निरोगी जीवनासाठी ‘संघर्षांतून वेळीच बाहेर पडणे’ हे कदाचित तणाव व्यवस्थापनासाठी सर्वांत दुर्लक्षिलेले साधन आहे. ही एक जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका आहे, ज्याद्वारे आपण असे वातावरण, संवाद आणि परिस्थितीपासून स्वतःला दूर करतो, जिथे भावनिक गुंतवणुकीचा कोणताही फायदा मिळत नाही, उलट तोटाच होतो.

- डॉ. शुभांगी पारकर