मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३ चे भाजप उमेदवार प्रकाश दरेकर यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रभागातील विविध प्रश्न तसेच त्यांचे पुढील पाच वर्षांचे व्हिजन काय असेल, याबद्दल माहिती दिली.
१) तुम्हाला यावेळी भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. काय भावना आहेत?
- भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक ३ मधून मी प्रचाराला सुरुवात केली असून लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. विकासाचे प्रतिक म्हणून महायुतीकडे पाहिले जाते आणि इथे भाजपचे कमळ फुलवायचे आहे, असे जनतेने ठरवले आहे.
२) या वॉर्डमध्ये कोणत्या प्रमुख समस्या आहेत?
- इथे प्रामुख्याने वनजमिनीचा प्रश्न आहे. गेली अनेक वर्षे केतकीपाडा परिसरातील जनतेचा वनजमिनीचा प्रश्न आहे. इथे राहणाऱ्या रहिवाशांना राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून नोटीस दिल्या जात असून त्यांना त्यांचे घर खाली करण्याची भीती आहे. परंतू, ज्या ज्या वेळी अशा नोटीस दिल्या त्यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आ. प्रविण दरेकर, आ. प्रकाश सुर्वे यांच्यासोबत रस्त्यावर उतरून मी लढा दिला. त्यामुळे नक्कीच हा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. येणाऱ्या १५ तारखेला मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वनजमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
३) याआधीही तुम्ही नगरसेवक पदावर होतात. त्यावेळी कोणते प्रश्न मार्गी लावलेत?
- मी याआधी प्रभाग क्रमांक ५ चे काम पाहिले. २०१२ ते २०१७ या कालावधीत या प्रभागात सर्वाधिक निधी आणला. महापालिकेचे पहिले स्विमिंग पुल तयार केले. रुग्णालये, सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, नाले, पाणी असे अनेक प्रश्न मी सोडवले. त्या प्रभागाचा सर्वांगिण विकास करून कायापालट केला. इथल्या जनतेने निवडून दिल्यास या प्रभागासोबतच मुंबई शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी काम करणार आहे.
४) उबाठा गटाने तुमच्या विरोधात उमेदवार दिला आहे. ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आलेत, काय सांगाल?
- त्यांचा मराठीचा मुद्दा बोथट झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू जनतेला ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला. आज ठाकरे बंधू एकत्र आलेत. परंतू, गेली २५ वर्षे मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात होती. पण त्यांनी एकही प्रकल्प केला नाही. कोस्टल रोड, मोनोरेल, मेट्रो, अटल सेतू हा सगळा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला. आम्हीसुद्धा मराठीच आहोत. परंतू, कुणी मतांसाठी मराठीपण जपत असल्यास मराठी माणूस दुधखुळा नाही. महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यास मुंबईला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू.
५) पुढच्या ५ वर्षांचे व्हिजन काय आहे?
- जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता या प्रभागचा विकास करणार आहे. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी कौशल्य विकास केंद्र उभारून या माध्यमातून तरुण-तरुणींना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देणार आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला आधार केंद्र उभारणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी या प्रभागात युपीएससी, एमपीएससीचे अभ्यासकेंद्र उभारणार आहे. प्रभाग क्रमांक ३ हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे त्यामुळे इथे भव्य प्रवेशद्वार तयार करून तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार आहे.