नाशकात ‘उबाठा’ नेतृत्वहीन

    13-Jan-2026
Total Views |

Nashik Civic Polls

राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकींचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, सर्वच पक्षांच्या शीर्ष नेतृत्वाची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या सभांचे आयोजन केले जात असून, आश्वासनांचा पाऊस पडत आहे. सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या धोरणाकडे उमेदवार आणि मतदारांचाही सर्वाधिक कल असल्याने भाजप पक्ष कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. त्याखालोखाल महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ होत आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही या तीन पक्षांचाच बोलबाला राहणार असल्याचे राजकीय पंडितांकडून सांगितले जात आहे. याउलट, एकत्र आलेल्या आणि आकाश ठेंगणे झालेल्या उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे जहाज मात्र नाशिकमध्ये कप्तानाशिवाय भरकटत असल्याचे बघायला मिळत आहे.
 
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी नाशिकमध्ये ‘मनसे’ची कमान सांभाळणारे दिनकर पाटील यांनी भाजपची वाट धरली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत ‘उबाठा’ गटाचे निष्ठावंत असलेले विनायक पांडे यांनीही माजी महापौर यतीन वाघ यांना सोबतीला घेत, भाजपमध्ये प्रवेश केला. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहरात कमान सांभाळेल असा नेता सध्यातरी नाही, तर ‘उबाठा’ गटातील नेत्यांनी पक्षाला कधीच सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मागे एकटेच राहिलेले वसंत गीते यांच्यावरच महापालिका निवडणुकीत ‘उबाठा’ गटाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यातही त्यांचे पुत्र प्रथमेश गीते उमेदवारी करत असल्याने इतर उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मात्र गीते यांच्यावर मर्यादा पडल्या आहेत. त्यातच दि. ९ जानेवारी रोजी नाशिकला सभा घेत, कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. पण, ठाकरेंकडे तन-मन-धन अर्पण करून स्वतःला प्रचारात झोकून देतील, अशा कार्यकर्त्यांची फळी नाही. परिणामी, नाशिकमध्ये दहा ते १५ नगरसेवक निवडून आले, तरी खूप!
 
शिंदे-पवारांना मैदान अवघड
 
नाशिक महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या अनुक्रमे ‘उबाठा’ गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ता समीकरणात कुठेही दिसत नाही. त्याप्रमाणेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली युतीही फारसा प्रभाव पाडेल, याची खात्री देता येत नाही. कारण, "ज्या भुजबळांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचे काम केले, त्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही,” असे विधान अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मात्र, भाजपबरोबर युती होणार नाही हे लक्षात येताच, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून महापालिका निवडणुकीचा घाट घातला गेला. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक ज्यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यानंतर फारकत घेतली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले होते, ते आता शिंदेंपासूनही दुरावण्याची शक्यता आहे.
 
याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर त्यांच्याकडे नाशिक शहरात गमावण्यासारखे काहीच नाही. दुसरे उपमुख्यमंत्री यांचा नाशिकमध्ये जो काही प्रभाव आहे, तो ग्रामीण भागात असल्याचे बघायला मिळतो. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस शहरात बर्‍यापैकी क्षीण आहे. त्यामुळे शिवसेनेला युतीचा किती फायदा होईल, हे सध्या सांगणे तरी कठीण आहे. परिणामी, शिवसेनेच्या नेत्यांना स्वकीयांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणे क्रमप्राप्त आहे. त्यातही पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व लक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महापालिकांकडे आहे. त्यात आजारपणामुळे मंत्री छगन भुजबळ निवडणूक प्रचारापासून दूर आहेत, तर दुसरे मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा झाल्याने त्यांनीही प्रचारापासून फारकत घेतली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील तिसरे मंत्री नरहरी झिरवाळ प्रचाराची धुरा सांभाळत असले, तरी त्यांचा विशेष असा प्रभाव पडत नाही. यात एकनाथ शिंदे यांच्याशिवाय प्रभावी चेहरा शिवसेनेकडे नसून, त्यांना राज्यातील इतर ठिकाणी प्रचाराला जाणे क्रमप्राप्त आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सध्यातरी शिंदे-पवारांना नाशिकचे मैदान मारणे अवघडच!

- विराम गांगुर्डे