अवघ्या दोनच दिवसांत बिगबॉसच्या घरात तुफान गदारोळ

    13-Jan-2026
Total Views |

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला ११ जानेवारीपासून सुरुवात झाली असून १७ नव्या दमदार स्पर्धकांसह हा लोकप्रिय रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात गदारोळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. घरातील भांडी घासण्याच्या टास्कदरम्यान दीपाली सय्यद, रुचिता जामदार, करण सोनावणे, सोनाली राऊत, प्राजक्ता शुक्रे आणि तन्वी कोलते यांच्यात चर्चा रंगली. यावेळी सोनाली राऊत म्हणाली, “प्रभूला पाठवा ना भांडी घासायला,” तर त्यावर रुचिता जामदारने प्रतिक्रिया देत म्हटलं, “प्रभू गावाकडचा आहे, त्यामुळे तो भांडी घासेल.”

याच चर्चेदरम्यान तन्वी कोलतेने दीपाली सय्यदला “सागर कोण आहे?” असा प्रश्न विचारला. त्यावर दीपालीने तिला “सागर दादा… सागर कारंडे” असं उत्तर देत खुणेने सागर कारंडेकडे इशारा केला. दरम्यान, या घटनेनंतर तन्वी कोलतेवर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस मराठी ६’च्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी अनेक तीव्र प्रतिक्रिया नोंदवत सागर कारंडेला अख्खा महाराष्ट्र ओळखतो, असं म्हटलं आहे.


यानंतर दुसरीकडे अभिनेत्री दीपाली सय्यद आणि लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यात खटके उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. घरातील सदस्य डायनिंग टेबलवर गप्पा मारत असतानाच लावणी नृत्यप्रकारावर चर्चा रंगली. याचवेळी दीपाली सय्यद यांनी राधा पाटीलच्या लावणी सादरीकरणावर टीका करत टोमणे मारले. दीपाली म्हणाल्या, “लावणी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. बार डान्सर जे करतात, ते तुम्ही स्टेजवर आणता. लावणीमध्ये जी नजाकत हवी, ती तुमच्या डान्समध्ये कुठे असते?”

दीपालींच्या या वक्तव्यामुळे राधा पाटील प्रचंड संतापली. त्यानंतर दुखावलेल्या राधानेही प्रतिक्रीया देत, “मी देखील त्यांची लायकी काढू शकते,” असं स्पष्ट शब्दांत म्हटलं. या घटनेनंतर घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याचं दिसून आलं आहे. लावणीसारख्या पारंपरिक नृत्यप्रकारावरून सुरू झालेला हा वाद पुढे कोणतं वळण घेणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये पुढील दिवसांत आणखी कोणते वाद आणि नाट्यमय घडामोडी घडतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.