निवडणूक विजयापलीकडची!

भाजपच्या उमेदवारांनी घालून दिला आदर्श

    13-Jan-2026   
Total Views |
KDM Elections
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने झालेले नाराजीनाट्य अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. पण, केडीएमसीतील पॅनेल क्रमांक ७ मध्ये भाजपच्या माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून आपली उमेदवारी सोडून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आता या प्रभागातून शिवसेनेच्या विजया पोटे, भाजपचे शामल गायकर, भाजपच्या हेमलता पवार आणि भाजपपुरस्कृत संदीप गायकर (निशाणी नगारा) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने या चारही उमेदवारांशी केलेली ही बातचीत...
 
प्रभागातील दांडगा जनसंपर्क लक्षात घेता, पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केली. त्याविषयी काय सांगाल?
 
विजया पोटे : केडीएमसीत २००० साली पहिल्यांदा नगरसेविका म्हणून मी निवडून आले. दोन टर्म नगरसेवकपद मी भूषविले आहे. प्रभागातील बर्‍याच महिलांशी मी जोडलेले आहे. महिलांच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवत असते. प्रभागात जी विकासकामे केली, त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारले आहे. त्यामुळेच पक्षाने मला आता पुन्हा तिकीट दिले आहे.
 
माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी तुम्हाला उमेदवारी मिळावी, म्हणून स्वतः उमेदवारी सोडली; तर याविषयी काय सांगाल?
 
शामल गायकर : भाजपकडून या पॅनेलसाठी अधिकृतरित्या संदीप गायकर आणि डॉ. पंकज उपाध्याय यांना उमेदवारी मिळाली होती. पण, मला उमेदवारी मिळावी, यासाठी संदीप गायकर यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळेच प्रभागात आज तुम्हाला एक युवा आणि नवा चेहरा दिसत आहे.
 
सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिल्यानंतर, राजकीय प्रवास सुरू करत आपण यंदा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहात. तेव्हा, काय भावना आहेत?
 
हेमलता पवार : माझे पती नरेंद्र पवार यांचा कल्याणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक, उपमहापौर आणि आमदार असा राजकीय प्रवास घडला. त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन ‘कल्याण विकास फाऊंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेचे काम मोठे होताना माझ्या प्रभागात समाजोपयोगी कामे करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पालिकेतील नगरसेवकपद मिळाल्यास ही कामे होतील, या भावनेने मी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
 
भाजपने अधिकृत उमेदवारी दिलेली असताना डॉ. पंकज उपाध्याय यांनी स्वतःची उमेदवारी सोडून तुम्हाला उमेदवारी दिली. त्याविषयी काय सांगाल?
 
संदीप गायकर : भाजपचे घोषवाक्य ‘प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः’ असे आहे. या घोषवाक्याला साजेशी अशी वर्तणूक कल्याणमधील भाजपची आहे. मला देत असलेली उमेदवारी शामलसाठी सोडत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. पण, मला गुरूस्थानी मानणारे उपाध्याय यांच्या मनाला ही गोष्ट पटत नसल्याने त्यांनी माझी समजूत काढली आणि उमेदवारी घेण्यासाठी आग्रह धरला. त्यांच्या आग्रहखातर आणि पक्षाने दिलेली अधिकृत उमेदवारी यांचा मान राखत उमेदवारी स्वीकारली.
 
निवडणूक आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावे, याची प्रमुख कारणे सांगाल?
 
हेमलता पवार : भाजप-महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाच्या अजेंड्यावर देश आणि राज्य प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शाश्वत संस्था उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. आमदार आणि भाजपचे नेते म्हणून कल्याणमध्ये नरेंद्र पवार यांनी केलेले भरीव काम ही या निवडणुकीत माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे. गेल्या काही वर्षांत कल्याण शहर, तसेच कल्याण जिल्हा भाजपमध्ये मी विविध पदे भूषविली आहेत. त्यामुळे येथील समस्यांची मला जाण आहे.

प्रभागात प्रचार करताना जनतेकडून मिळणार्‍या प्रतिसादाविषयी काय सांगाल?
 
विजया पोटे : प्रभागात प्रचार करताना महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीने चांगल्या प्रकारची विकासकामे केली आहेत. त्यामुळे सकारात्मक वातावरण आहे. मतदार चांगल्या प्रकारे आमचे स्वागत करत आहे. तसेच मतदारासमोर आम्ही ‘लस्टर डेव्हलेपमेंट’ हा महत्त्वाचा प्रभावी मुद्दा घेऊन जात आहोत.
 
आतापर्यंत तुम्हाला नागरिकांकडून प्रचारादरम्यान मिळालेला प्रतिसाद कसा आहे?
 
हेमलता पवार : यंदा पहिल्यांदाच ‘पॅनेल’ पद्धतीत निवडणूक असल्याने आम्ही चारही उमेदवार एकत्रित प्रचारावर जोर देत आहोत. महायुतीस पोषक वातावरण असल्याने नागरिकांकडून आमचे स्वागत होत आहे. विशेषतः महिलांच्या भेटीगाठी होताना, त्या आमच्यासमोर त्यांच्या समस्यादेखील मांडत आहेत.
 
प्रभागात नुकतेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले आहेत. त्याविषयी काय सांगाल?
 
संदीप गायकर : प्रभागातील महिला छेडछाड व गैरप्रकारांना, भीतीमुक्त वातावरण निर्माण व्हावे, महिलांना सुरक्षितेची भावना वाटावी म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे. ज्येष्ठ नागरिक राहात असलेल्या ठिकाणी चोरीचे प्रकार यामुळे कमी होतात. एकटे राहणार्‍यांना संरक्षण मिळते. त्यांना अधिक सुरक्षित वाटते.
 
- जान्हवी मोर्ये