
मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्ताने शिवाजी पार्क मैदानात पार पडलेल्या भाजप-शिवसेना-रिपाइं (आ) महायुतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांसह भाजप, शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "याठिकाणी काल झालेल्या सभेत पुन्हा तेच मुद्दे आणि तीच कारणे दिसली. ही मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. ३० वर्षे तुम्ही कंचे खेळत होतात का? आदित्यशी चर्चा करा, असे आवाहन मला देतात. आदित्यशी चर्चा करायला आमच्या बाजूची उमेदवार शीतल गंभीर पुरेशी आहे. होऊन जाऊद्या एकदा ही चर्चा. ही मुंबईकरांची शेवटची निवडणूक नाही. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही; तर तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही. या महाराष्ट्राकडे कुणाही वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत नाही.”
महाराष्ट्रात मराठीच सक्तीची
"मराठीसाठी आम्ही एकत्रित आलो, असे ते सांगतात. या महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची असेल. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्रावर समिती तयार करण्याची घोषणा केली. दि. १४ सप्टेंबर २०२१ रोजी या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अहवाल सादर केला. या अहवालाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी, अशी शिफारस होती. त्यानंतर दि. २० जानेवारी २०२२ रोजी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालाला मान्यता दिली. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत,” अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
विकासावर बोलायचे असल्यास मर्द असावे लागते
"धारावीच्या पुनर्विकासाचे पहिले टेंडर आम्ही विकासकाला दिले होते. पण, उद्धव ठाकरे तुम्ही ते टेंडर रद्द का केले? तुम्हालाच अदानींना ते द्यायचे होते का? आम्ही धारावीचा जागा कुणाला दिली नसून ‘डीआरपी’ला दिले आणि त्यात सरकारसुद्धा आहे. तुम्हाला २५ वर्षांत एकही काम करता आले नाही. विकासावर बोलायचे असल्यास मर्द असावे लागते. राहुल गांधी अदानींविषयी बोलतात; पण काँग्रेसशासित राज्यांमध्ये अदानींकडून कोट्यवधींची गुंतवणूक आणली. एकही मराठी माणूस बेरोजगार राहू नये, यासाठी आम्ही जो महाराष्ट्रात येईल, त्यांचे स्वागत करू. आपल्याकडे गुंतवणूक येत असेल आणि आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
स्वार्थासाठी वेगळे झाले आणि स्वार्थासाठीच एकत्र आले : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लोकांना भावनेचे नाही, तर विकासाचे राजकारण हवे आहे. बाळासाहेबांचे विचार आणि मोदींचे व्हिजन घेऊन आपण पुढे जात आहोत. काही लोकांना फक्त निवडणूक आली की, मराठी माणसाची आठवण येते. एरव्ही ते ढुंकूनही पाहात नाहीत. मराठी माणसाच्या आजच्या अवस्थेला हेच लोक जबाबदार आहेत. ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे, असे भावनिक आवाहन कुणीतरी केले. २० वर्षांपूर्वी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही. त्यावेळी तुमचा अहंकार मोठा होता. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आला आहात.”
२५ वर्षांत उद्धव ठाकरेंनी ‘बंगला नंबर २’ बांधला : अमीत साटम
"तुम्ही २५ वर्षे मुंबई महापालिकेवर राज्य करूनही त्यावेळी केलेले एक काम दाखवण्यासारखे नाही. उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार केला आणि ‘बंगला नंबर २’ तयार केला. दर आठवड्याच्या स्टॅण्डिंग कमिटीच्या पाच टक्क्यांवर हे जगतात. उद्धव ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचे पाकिस्तान होईल. तुम्हीच अदानींना घरी बोलावून त्यांच्या गळाभेटी घेतल्या. ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाला मुंबईकर जनता भूलणार नाही. मुंबई महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना साथ द्यावी,” असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी केले.
महायुतीच्या महापौरासाठी पाठिंबा : रामदास आठवले
"भरून गेलेले आहे मैदान शिवाजी पार्क, मी महायुतीला देतो १५० मार्क, ठाकरे बंधूंना देतो ४० मार्क, काँग्रेसला देतो ३० मार्क आणि बाकीचे सगळे आमचे मार्क,” असे काव्यात्मक विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. महायुतीची मुंबईत येणार सत्ता आणि ठाकरे बंधूंचा उडून जाणार पत्ता. मुंबईत महायुतीचा महापौर बसविण्यासाठी माझा पाठिंबा आहे,” असेही त्यांनी सांगितले.