
स्वामी विवेकानंद यांची जयंती ही केवळ एक तारीख नाही, तर भारतातील युवांना जागृत करण्यासाठी एक स्मरणदिवस आहे. १८६३ साली कोलकाता येथे जन्मलेले हे थोर साधक, विचारवंत आणि राष्ट्रसंत आजही लाखो युवकांच्या हृदयात प्रेरणेचा ज्योत प्रज्वलित करतात. विशेषतः आज भारत विकसित होण्याच्या मार्गावर आहे. विकसित देशातील युवांचे विचार सुद्धा त्याच मार्गावर असायला हवेत. आजच्या युवकांच्या विचारांच्या दिशेवर भविष्यातील भारत घडणार आहे. भारत जर विश्वगुरू होणार आहे तर त्या भारतातील युवा कसे असायला हवेत याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा, विवेकानंदांचे विचार युवांना नागरी जबाबदारीची खरी जाणीव करून देतात. "उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका!" – हे त्यांचे उद्गार केवळ शब्द नाहीत, तर जीवनाचे मंत्र आहेत. या लेखात, विवेकानंदांच्या जीवनकथेनुसार युवकांसाठी नागरी जबाबदारीचे महत्त्व, त्यांचे आदर्श आणि आजच्या काळातील अमल यावर प्रकाश टाकू.
विवेकानंदांचे प्रारंभिक जीवन : संघर्ष ते जागृती स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. श्रीरामकृष्ण परमहंसांच्या सान्निध्यात त्यांची आध्यात्मिक जागृती झाली. ब्रह्मचर्य, तपश्चर्या आणि वेदांताच्या अभ्यासाने ते जगप्रसिद्ध झाले. १८९३ च्या शिकागो धर्मसभेत "सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका" म्हणत त्यांनी हिंदू धर्माची उदारता सांगितली. हे भाषण ऐतिहासिक ठरले, कारण त्यातून भारतीय संस्कृतीचा गौरव जगासमोर आला. युवकांसाठी यातून शिकण्यासारखे काय? विवेकानंद स्वतः युवावस्थेत होते तेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकटे, कौटुंबिक जबाबदारी आणि धार्मिक संदेहांचा बोजा होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते म्हणत, "युवावस्था ही जीवनातील अमूल्य भांडार आहे. या शक्तीचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करा." आजच्या युवकांना, ज्यांना नोकरीची चिंता, स्पर्धेचा दबाव आणि सोशल मीडियाच्या व्यसनाने घेरले आहे, विवेकानंद सांगतात – संघर्ष हे शिक्षण आहे. नागरी जबाबदारी म्हणजे प्रथम स्वतःला घडवणे. स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि धैर्य – हीच युवकाची खरी शक्ती. उदाहरणार्थ, विवेकानंदांनी हिमालयात एकटे फिरत स्वतःला तपासले, तसेच युवकांनी आज स्वयंसेवा शिबिरात जाऊन सामर्थ्य ओळखावे. समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करून अनुभव घ्यावा. युवा शक्ती जागृत करा: विवेकानंदांचा संदेश विवेकानंद हे युवकांचे खरे गुरू. त्यांनी म्हटले, "माझे ९० कोटी मुले जागे झाली, तर पृथ्वी हलेल!" आज भारतात ६५ कोटींपेक्षा जास्त युवा आहेत. ही शक्ती जर दिशाहीन राहिली, तर देश दिशाहीन होईल.
स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण जेवढे जास्त बाहेर यावे आणि इतरांसाठी चांगले करतो तेवढीच आपली हृदयाची शुद्धता होईल आणि देव त्यांच्यामध्ये असेल. "सेवा हीच खरी पूजा" – हे त्यांचे जीवनाचे सार. आजच्या युवकांसाठी उदाहरणे घेऊया. स्वच्छ भारत अभियानात लाखो युवक सहभागी झाले. मुंबईसारख्या शहरात प्लॉगिंग (धावत प्लास्टिक गोळा करणे) ही मोहीम युवक चालवतात. विवेकानंदांच्या मते, पर्यावरण संरक्षण ही नागरी जबाबदारी आहे. ते म्हणत, "निसर्ग हा देवाचा अवतार आहे." युवकांनी प्लास्टिकबंदी, वृक्षारोपण आणि नदीसफाईसारख्या कार्यात पुढाकार घ्यावा. दुसरे, डिजिटल युगात सायबर गुन्हे वाढत आहेत. युवकांनी सायबर सुरक्षेसाठी जागृती मोहिमा चालवाव्यात. विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन स्थापन केला, ज्याने आपत्तीवेळी सेवा केली. विवेकानंदांचा युवकांसाठी "मसल्स ऑफ आयर्न" हा संदेश आहे. केवळ बौद्धिक नव्हे, शारीरिक सामर्थ्यही हवे. व्यायाम, योग आणि खेळ – यातूनच खरा नेता उदयास येतो. आजच्या सेडेंटरी लाइफस्टाइलमध्ये हे आवश्यक आहे.
नागरी जबाबदारी : स्वामी विवेकानंदांचा दृष्टिकोन नागरी जबाबदारी म्हणजे काय? फक्त मतदान किंवा कर भरणे नव्हे. विवेकानंदांच्या मते, "मनुष्य जन्म हा धर्मासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी आहे." उदाहरणार्थ, महिला सुरक्षेसाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेत युवक सहभागी होऊन घराघरात जागृती करावी. विवेकानंद म्हणतात, "दुर्बलांना उभे करा, ते राष्ट्र मजबूत होईल." आजच्या मुंबईत, झोपडपट्टीतील मुलांसाठी युवकांनी लायब्ररी किंवा स्पोर्ट्स क्लब सुरू केले आहेत. हे विवेकानंदांचे प्रत्यक्ष रूपांतर आहे. नागरी कर्तव्यांची यादी: - मतदार नोंदणी: १८ वर्षांपासून प्रत्येकाने मतदार कार्ड घ्यावे आणि निवडणुकीत भाग घ्यावा.
स्वच्छता : हा देश हे आपले घर आहे हे समजून कुठेही कचरा करू नये आणि कोणी करत असेल तर त्यांना थांबवावे. स्वछता या विषयात सामाजिक जागरणाचे कार्यक्रम चालवावे किंवा त्यात सहभागी व्हावे.
शिक्षण प्रसार : आवश्यक त्या सेवावस्तीत जाऊन तेथील मुलांना शिकवावे.
पर्यावरण : जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि संवर्धन, प्लास्टिक ला पर्याय अशा पर्यावरणपूरक विषयात काम करावे.
सामाजिक समरसता : आपण सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत या भावनेने सर्वांसोबत व्यवहार करावा. भाषावाद आणि प्रांतवाद यामुळे देशाचे नुकसान झाले आहे आणि होत आहे त्यामुळे आपल्याकडून या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आजच्या काळातील आव्हाने आणि उपाय आजचा युवा स्मार्टफोनच्या जाळ्यात अडकला आहे. आज विवेकानंद असते तर म्हणाले असते, "डिजिटल डिटॉक्स करा!" त्यांच्या काळात नसलेले हे व्यसन आजचे संकट आहे. आज सोसिअल मीडिया वर नेपाळ मध्ये घडलेल्या क्रांतीची चुकीची उदाहरणे भारतीय युवाहांमध्ये पसरवली जात आहेत. “भारत नेहमीच अस्तित्वात होता आणि नेहमीच अस्तित्वात राहील. तो शाश्वत, अविनाशी आहे.” असे विवेकानंद म्हणतात तरुणांना देशातील व्यवस्थेबद्दल भडकवण्याचे कटकारस्थान सुरु आहे. बऱ्याचदा देशात होणाऱ्या आणि आपल्याला न पटलेल्या गोष्टींविरोधात चीड येणे स्वाभाविक आहे पण हक्क आणि अधिकार याच्या आधी कर्तव्याची जाणीव होणे आवश्यक आहे. तरुणांनी कोणताही निर्णय घेण्याआधी फक्त वर्तमान नव्हे तर भविष्याचा विचार करून निर्णय घयायला हवा. फक्त नकारात्मक आंदोलनातून देशाचा उद्धार होत नाही. त्यासाठी साकारात्म प्रयोग करणे आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांचे विचार कधीच जुने होणार नाहीत. जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक युवा एक दिवस विवेकानंदांप्रमाणे जगून पाहावा – सेवा करा, ध्यान धरा, राष्ट्रासाठी विचार करा. भारताला विश्वगुरू बनवण्याची जबाबदारी युवकांची. "ARISE INDIA" – हा विवेकानंदांचा संदेश प्रत्यक्षात आणा. भारत माता कि जय !!
- आनंद आंधळे, मुंबई