परदेशी वनस्पतींच्या प्रजातींच्या अनावश्यक वाढीची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. यामधीलच एक प्रजात म्हणजे रानमोडी. कोकणभूमीत या प्रजातीचा परिणाम स्थानिक वनस्पतींवर कसा पडत आहे, जाणून घेऊया...
नुकतीच नववर्षाची सुरुवात झाली. चांगल्या थंडीच्या वातावरणात कोकणातल्या बऱ्याच फळबागांमध्ये नवपालवी आली. कुठे आंबा तर कुठे काजू मोहरातून अगदी पूर्ण बहरून आले. अशातच पश्चिम घाटाच्या पाऊलवाटावर, रस्त्याच्या कडेला, अगदी जंगलातसुद्धा एक वनस्पती आपले अस्तित्व वाढवत आहे, ती म्हणजे रानमोडी. वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या Chromolaena odorata म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती मूळची भारतातली नाही. दक्षिण अमेरिकेतून भारतात प्रसारित झालेली आणि पुढच्या काही काळात संपूर्ण पश्चिम घाटात केवळ आपलच अस्तित्व टिकवू पाहणारी ही वनस्पती आपल्या वनसंपदेला मारक ठरत आहे. आज कोकणात एकही असा रस्ता नाही, ज्या ठिकाणी या वनस्पतीच्या अस्तित्वाच्या खुणा दिसणार नाहीत.
सूर्यफुलाच्या कुटुंबातील ही वनस्पती आपल्या पांढऱ्या रंगांच्या केसाळ फुलांनी कोकणातला सारा परिसर काबीज करू लागली आहे. आक्रमक असणारी ही वनस्पती ज्या ठिकाणी वाढते, त्या ठिकाणी इतर वनस्पतींची वाढ होऊ देत नाही. आपल्या मुळातून रासायनिक द्रव्यांची रेलचेल करत इतर वनस्पतींची वाढ न होऊ देण्याचे काम ही वनस्पती करत आहे. प्रामुख्याने झुडूपवगय असणारी ही वनस्पती काही वर्षांपूव ठरावीक भागातच पाहायला मिळत होती. मात्र, मिळणाऱ्या पोषक वातावरणात आणि असंख्य फुलांच्या फुलोऱ्यात या वनस्पतीच्या बियांचा प्रसार सहज होऊ लागला. आपल्या नावाप्रमाणे ‘रान मोडण्याचा’ निश्चय करूनच ही वनस्पती पश्चिम घाटात वास्तव्य करू पाहात आहे. रस्त्याच्या कडेला फुलणाऱ्या या वनस्पतीच्या फुलांचा पांढरा रंग मनात भरून जातो. साधारण दोन मीटर गुंतागुंतीच्या मांडणीत, दाट झाडींमध्ये ती पसरते. या वनस्पतीच्या फांद्या मऊ आणि हिरव्या असतात. पाने बाणाच्या आकाराची व ‘ओडोराटा’ या प्रजातीच्या नावाप्रमाणे, चिरडल्यावर एक तीव्र वास सोडतात. फांद्यांच्या टोकांवर दहा-35 पांढरी केसाळ फुले गुच्छा-गुच्छांतून दाटीवाटीने वाढलेली दिसतात.
मुख्य म्हणजे, या वनस्पतीला कोणताही प्राणी खात नाही. कारवी, बांबू यांसोबतच वन्यजीवांना आवडणाऱ्या वनस्पतींच्या क्षेत्रात या वनस्पतीची वाढ झपाट्याने झाली. परिणामी, हत्ती, रानगवे डुक्कर यांचा मानवी वस्तीत शिरकाव होऊ लागला. कमी पर्जन्यमान व थंडीच्या ठिकाणी आपला अधिवास टिकवू पाहणारी ही वनस्पती भविष्यात कोकणच्या वनसंपदेत चिंता निर्माण करू शकते. काही ठिकाणी या वनस्पतीच्या पानांपासून नैसर्गिक रंगनिर्मिती होऊ शकते, असे निदर्शनास येते आहे. तण म्हणून वाढणारी वनस्पती काही वर्षांत आपला ताण वाढवू शकते. यासाठी वनस्पतीची फुले येण्याआधीच तिचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. यासोबतच वनस्पतीच्या अंतर्गत गुणधर्मांचा औषधीय उपयोग यावर संशोधन होणे, तितकेच महत्त्वाचे आहे.यासाठी गाव पातळीवर लोकसहभाग व श्रमदान या गोष्टी तातडीने होणे गरजेचे आहे. तरच कोकणची जैवविविधता टिकून राहील.
- परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)