मुंबई : (Article 370) पाकिस्तानमधील माजी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानातून अचानक हकालपट्टी आणि ७२ तासांत तिथून बाहेर पडण्याचा अनुभव सांगणारा एक लेख शेअर केला आहे. भारत सरकारने ५ ऑगस्ट २०१९ ला जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. कलम ३७० रद्द करण्याच्या काही तास आधी पाकिस्तानातील परिस्थितीचे वर्णन बिसारिया यांनी या लेखात केले आहे. ( Article 370)
बिसारिया त्यावेळी पाकिस्तानमधील भारताचे शेवटचे उच्चायुक्त होते. बिसारिया पाकिस्तानात तब्बल २० महिने होते. त्यांचा अनुभव शेअर करताना त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने अचानक त्यांना देश सोडण्यासाठी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला होता. भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पाकिस्तानने निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांना हद्दपार केले. बिसारिया यांच्या मते, हा अनुभव वैयक्तिक व व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक व भावनिक होता. (Article 370)
अजय बिसारिया यांनी लिहिले की, ५ ऑगस्ट २०१९ ला भारताने कलम ३७० रद्द करण्याच्या काही तास आधी, त्यांना परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा अंदाज होता, परंतु त्याच आठवड्यात त्यांना पाकिस्तान सोडावे लागेल, असे त्यांना वाटले नव्हते. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय आणि राजनैतिक गोंधळ निर्माण झाला आणि परराष्ट्र कार्यालय अधिक सक्रिय झाले. (Article 370)
५ ऑगस्ट २०१९ च्या संध्याकाळी बिसारिया यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे परराष्ट्र सचिव सोहेल महमूद यांनी भारताच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, भारताचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन करतो. त्यावेळी बिसारिया यांनी स्पष्टपणे उत्तर दिले की, कलम ३७० ही भारताची अंतर्गत बाब आहे आणि त्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नाही. त्यांनी असेही म्हटले की, भारताच्या या निर्णयामुळे नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदललेली नाही आणि सीमापार दहशतवाद हे काश्मीर समस्येचे मुख्य कारण आहे (Article 370)
बैठकीनंतर, पाकिस्तानने एक अधिकृत घोषणापत्र जारी केले. ७ ऑगस्ट २०१९ रोजी पाकिस्तानच्या संसदेत जोरदार चर्चा झाली आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी राजनैतिक संबंध ताणले जाण्याचे संकेत दिले. भारतीय उच्चायुक्तालयाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते आणि कर्मचारी कपातीपासून ते मिशन बंद करण्यापर्यंतच्या प्रत्येक संभाव्य परिस्थितीसाठी तयारी करण्यात आली होती. शेवटी, पाकिस्तानने उच्चायुक्तांना परत बोलाविण्यासाठी भारताकडे विनंती केली आणि अजय बिसारिया यांना ७२ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांची रवानगी कोणत्याही औपचारिक समारंभाविना झाली.