"हिंदुत्व म्हणजे भीतीने जगणारा..." मणिशंकर अय्यरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपकडून प्रत्युत्तर!

सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितला हिंदुत्वाचा अर्थ

    12-Jan-2026   
Total Views |
Hindutva

नवी दिल्ली : (Mani Shankar Aiyar on Hindutva) सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. "हिंदुत्व म्हणजे प्रत्यक्षात भीतीने जगणारा हिंदू धर्म", असे म्हणत त्यांनी हिंदुत्वावर टीकात्मक विधान केले आहे.
 
रविवारी १२ जानेवारीला कोलकाता प्रेस क्लब आयोजित कोलकाता डिबेटिंग सर्कलमध्ये 'हिंदुत्वापासून हिंदू धर्माचे संरक्षण आवश्यक आहे' या विषयावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले, ज्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या विधानावर सत्ताधारी पक्ष भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे.

हिंदुत्व म्हणजे भीतीने जगणारा हिंदू धर्म

चर्चेदरम्यान अय्यर म्हणाले की, "हिंदुत्व म्हणजे भीतीने जगणारा हिंदू धर्म. हिंदुत्व हे बहुसंख्य हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. ८० टक्के हिंदूंना १४ टक्के मुस्लिमांकडून भीती आहे. एका चर्चमध्ये आयोजित ख्रिसमसच्या जेवणाला उपस्थित राहिल्यामुळे एका अंध, भुकेल्या आदिवासी मुलीला भाजप नेता कानाखाली मारतो, शॉपिंग मॉलमध्ये घुसून ख्रिसमसच्या सजावटीची नासधुस करतात, हे हिंदुत्व आहे. हिंदू धर्म हजारो वर्षे जुना, मजबूत आणि स्वयंपूर्ण आहे, त्याला कोणत्याही राजकीय विचारसरणीची किंवा हिंदुत्वावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही."
 
हिंदू धर्माला हिंदुत्वाच्या संरक्षणाची गरज नव्हती

हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यातील कथित फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, "हिंदू धर्म हा एक महान आध्यात्मिक धर्म आहे आणि हिंदुत्व ही एक राजकीय विचारसरणी आहे. हिंदुत्व १९२३ मध्ये अस्तित्वात आले; हिंदुत्वाच्या हजारो वर्षांपूर्वी, हिंदू धर्माला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि तरीही तो टिकून राहिला आणि भरभराटीला आला; हिंदुत्वाच्या संरक्षणाची गरज नव्हती.

अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि धार्मिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीवरील कथित निर्बंधांचा उल्लेख करून अय्यर यांनी हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरूपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा उल्लेख करून त्यांनी असा युक्तिवाद केला की, "महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंदांचा हिंदू धर्म सावरकरांच्या हिंदुत्वाने संरक्षित किंवा प्रवर्द्धित होऊ शकत नाही. गांधींचा हिंदू धर्म अहिंसा आणि सहअस्तित्वावर आधारित होता, तर सावरकरांचे हिंदुत्व राजकीय आक्रमकता आणि संघर्षावर भर देणारे होते."
 
सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितला हिंदुत्वाचा अर्थ

दरम्यान त्याच कार्यक्रमात राज्यसभा खासदार आणि भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी यावर उत्तर देताना म्हटले की, "हिंदुत्व म्हणजे 'हिंदू तत्व', जे हिंदू धर्माचे मूळ सार आहे. हिंदू धर्म सर्व धर्मांमध्ये अद्वितीय आहे, कारण तो त्याच्या अनुयायांना धार्मिक ग्रंथांवरही चर्चा करण्याचे स्वातंत्र्य देतो. हिंदुत्व आणि हिंदू धर्म परस्परविरोधी नाहीत तर ते परस्परपूरक आहेत.

'इझम' हा शब्द फक्त भारतीय धर्मांच्या अपमान करण्यासाठी जोडला जातो|

'इझम' या शब्दाच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्रिवेदी म्हणाले, "कोणती संस्कृती तुम्हाला स्वतःच्या धार्मिक ग्रंथांवरही चर्चा करण्याचे स्वातंत्र्य देते? तो फक्त हिंदू धर्म आहे... मी विचारू इच्छितो की, 'हिंदू धर्म' का? भारतात उद्भवलेल्या सर्व धर्मांशी 'इझम' का जोडला जातो? हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म आणि जैन धर्म. मात्र, तुम्ही कधीही 'इस्लामइझम' किंवा 'क्रिश्चियनिझम' ऐकले नसेल. 'इझम' हा शब्द भारतीय धर्मांच्या तात्विक खोलीला कमी लेखण्यासाठी फक्त अपमान करण्यासाठी जोडला जातो."

अय्यर यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, "पुन्हा एकदा काँग्रेस हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना एका हिंदूने दुसऱ्या हिंदूविरुद्ध उभे राहावे असे वाटते. याचा फायदा काँग्रेसला होतो, ज्याचे एकमेव लक्ष्य मतपेढी मजबूत करणे, अल्पसंख्याकांना एकत्र करणे, हिंदू बहुसंख्यकांमध्ये फूट पाडणे हा आहे."


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\