मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून उबाठा मुस्लिम अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्यात व्यस्त आहेत. उबाठा आमदार अनिल परब यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून असे लक्षात येते की, उबाठा मराठी मुस्लिम आघाडी बनवण्याचे स्वप्न रंगवत आहेत. बांग्लादेशात हिंदूंचे खून होत असताना ठाकरेंना मराठी मुसलमानांच्या दाढ्या का कुरावळच्यायत? असा प्रश्न निर्माण होतोय.
अनिल परब मुलाखतीदरम्यान म्हणाले की, 'उद्धव ठाकरे मुस्लिमांना विशेष भावतात, मुस्लिम समाजाची पहिली पसंती उबाठा हीच असेल. जर आपण एक भक्कम मराठी–मुस्लिम आघाडी यशस्वीपणे उभी करू शकलो, तर ही लढत अगदी सोपी ठरेल'. बांग्लादेशात मोहम्मद युनुस यांचे सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. आजही इस्लामिक कट्टरपंथीकडून खुलेआम हिंदूंवर हल्ले होत आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारावर उद्धव ठाकरे यांनी मात्र कधी जाहीर भूमिका घेतल्याचे दिसले नाही. हिंदुत्व सोडलेले नाही, असे ते अजूनही म्हणतात, पण मग बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारावर त्यांनी, त्यांच्या पक्षाने एखादा तरी मोर्चा काढला का? तेथील युनुस सरकारचा विरोध नोंदवला का? की बांगलादेशचे हिंदू त्यांच्या लेखी हिंदूच नाहीत.
मुंबईत जेव्हा १९९३च्या दंगलीत धर्मांधांनी हिंदूंवर हल्ले केले, तेव्हा बाळासाहेबांचे शिवसैनिक धावून आले होते. पण आज त्यांचेच चिरंजीव मराठी आणि मुस्लिम मतांची सांगड घालून राजकीय डाव खेळत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा, हिंदुत्व यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे देणेघेणे नाही, हेच सिद्ध होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा मुस्लिम समुदायाने मातोश्रीवर जाऊन दिलेल्या भेटीगाठी आणि जाहीर केलेला पाठिंबा जगजाहीर आहे. २०१९-२० दरम्यान सुद्धा सीएए विरोधात भूमिका घेत सुमारे २०० मुस्लिम समुदाय नेत्यांना भेटून "कोणालाही देश सोडण्यास भाग पाडले जाणार नाही", अशा स्वरूपाचे आश्वासन त्यांनी दिले होते. यंदाही मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंनी ६ मुस्लिम उमेदवार उतरविले आहेत. त्यामुळे ठाकरे मुंबई महापालिकेवर मराठी मुस्लिम महापौर बसवण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न उद्भवू लागलाय. मुंबईचे ममदानीकरण होणार नाही, ऑस्ट्रेलियाच्या बोंडी बिचवर उद्भवलेली परिस्थिती मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी मुंबईकरांनाच मतदानावेळी जागरूक असणे आवश्यक आहे.
नागपुरात महाल परिसरात शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी रस्त्यावर उतरून हैदोस घातला. पोलिसांवर दगडफेक तर केलीच मात्र महिला पोलिसांसमोर अश्लील हातवारे करून त्यांना हिणवण्याचा प्रयत्न देखील धर्मांधांनी केला. या संपूर्ण प्रकाराचा रस्त्यावर उतरून तीव्र निषेध ठाकरेंनी कधी केला नाही.
मध्यंतरी टिस्ता सेटलवाड, ज़ीनत शौकत अली, इरफान इंजिनिअर, सर्फराज आरझू, सलिम खान या मंडळींनी प्रकाशित केलेल्या रिपोर्ट नुसार जून २०२४ ते जून २०२५ दरम्यान भारतात ६०२ द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून भाजप शासित ११ राज्यांत त्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा केला आहे. मात्र ही आकडेवारी मांडताना एकानेही हिंदूंचा उल्लेख केला नाही. हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबाबत कोणीच वाच्यता केली नाही. मौलवींकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा देखील प्रकर्षाने उल्लेख टाळल्याचे दिसले. ही पत्रकार परिषद मुंबई झाली असून उद्धव ठाकरेंनी तेव्हा याबाबत एक अवाक्षरही नाही काढले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक