ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वाची अखेर

    11-Jan-2026
Total Views |
Dr. Ashokrao Modak
 
ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत, लेखक आणि दीर्घकाळ अभाविपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळलेल्या डॉ. अशोकराव मोडक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने विविध विषयांवर सखोल चिंतनाने, अधिकारवाणीने भाष्य करणारा चिंतनशील लेखक समाजाने गमावला. त्यांच्या सहवासातील आठवणींना भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिलेला उजाळा...
 
नव्या वर्षाची सुरुवात एका दु:खदायक बातमीने झाली. ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व लेखक डॉ.अशोकराव मोडक यांचे, दि. २ जानेवारी रोजी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते व गेली काही वर्षे दुर्धर अशा कर्करोगाशी सामना करत होते. हे खरे असले, तरी ही बातमी दु:खद आहे. कारण, ज्या व्यक्ती अजूनही आपल्याबरोबर असल्या पाहिजेत असे वाटत राहते, अशा अत्यंत कमी व्यक्तींपैकी अशोकराव एक होते. एक ज्ञानसंपन्न व सक्रिय आयुष्य जगून अशोकरावांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
डॉ. अशोकराव मोडक यांच्या निधनामुळे, हिंदुत्व विचारांच्या मांडणीच्या क्षेत्रातील एक फार मोठे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या आजारपणातही अशोकरावांचे वाचन, चिंतन व लेखन सुरूच होते. रामजन्मभूमी आंदोलनाच्या राजकीय परिणामांचे विश्लेषण करणारे ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक त्यांनी याच आजारपणाच्या काळात लिहिले.
 
साधारण १९८० सालापासूनच माझा अशोकरावांशी संबंध व स्नेह होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. १९९२ साली ते कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवरही निवडून गेले. १२ वर्षे त्यांनी विधान परिषदेत प्रभावी कामगिरी करून दाखवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौर्‍यावर आल्यानंतर त्यांचा मुक्काम बहुधा माझ्या घरीच असायचा. तत्पूर्वी, त्यांनी १९६३ ते १९९४ पर्यंत मुंबईत प्राध्यापक म्हणून काम केले होते. २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना पाच वर्षे ‘राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक’ पदाने सन्मानितही केले. त्यांनी छत्तीसगढमधील बिलासपूर येथील ‘गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठा‘चे कुलपती म्हणून, महत्त्वाची जबाबदारीही सांभाळली. त्यांनी १०४ प्रबंध आणि ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. अशोकराव यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली असून, काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’कडून ‘जीवनगौरव’ पुरस्कारही मिळाला होता.
 
डॉ. अशोकराव हे संघपरिवारातील एक फार वेगळे व्यक्तिमत्त्व होते. हिंदुत्व आणि संघ विचारांच्या बरोबरीने त्यांनी साम्यवाद आणि साम्यवादी जग, विशेषत: सोव्हिएत रशियाचाही सखोल अभ्यास केला होता. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात ‘एमए’, तर ‘जेएनयू’मधून ‘पीएचडी’ केली होती. ‘भारताला सोव्हिएत रशियाची आर्थिक मदत’ हा अशोकरावांचा ‘पीएचडी’चा विषय होता. त्या अभ्यासासाठी अशोकराव रशियामध्ये राहूनही आले होते. त्यांच्या सखोल अभ्यासामुळेच, त्यांना सोव्हिएत रशियाच्या आर्थिक आणि राजकीय संदर्भातील तज्ज्ञ मानले जाई.
 
भारतातील साम्यवाद, साम्यवादी पक्ष व त्यांच्या विविध कारवाया या विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करण्याचे काम, अशोकरावांनी अनेक वर्षे केले. त्यांच्या व माझ्या स्नेहाचा तो एक समान धागा होता. ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या माझ्या पुस्तकाला त्यांनी, ३६ पानांची विस्तृत व अत्यंत मार्मिक प्रस्तावना लिहिली होती.
 
अशोकराव स्वभावाने, बोलण्यात व वागण्यात अत्यंत साधे व सौम्य होते. वैचारिक मांडणी आक्रमक रीतीने करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता पण, त्यांची मांडणी ठाम होती. व्यापक व सखोल अभ्यासाच्या आधारामुळेच, त्यांचे मुद्दे खोडून काढणे किंवा त्यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देणे विरोधकांना जड जात असे. त्यांची भाषणाची शैली साधी; पण प्रवाही होती. आपल्या विचारांची सकारात्मक, बुद्धिवादी मांडणी करत असतानाच, आपल्याला विरोध करणार्‍या विचारधारांची साधार, बुद्धिगम्य छाननी करणारा, बुद्धिवादाशी निष्ठा बाळगणारा अशोकरावांसारखा अभ्यासक, विचारवंत दुर्मीळच. त्यामुळेच डॉ. अशोकराव मोडक यांची उणीव दीर्घकाळ जाणवत राहील पण, त्यांनी लिहिलेली पुस्तके येणारी अनेक वर्षे हिंदुत्व विचारांच्या कार्याला मदत करत राहतील.
काही महिन्यांपूर्वी मी त्यांना घरी जाऊन भेटलो होतो. फोनवर आमच्या गप्पा अलीकडेपर्यंत चालू होत्या. प्रत्यक्ष भेटायला जाणे मात्र काही ना काही कारणाने होत नव्हते. अखेर भेट राहूनच गेली, ही खंत आता मनात कायम राहील. डॉ. अशोकराव मोडक यांना विनम्र श्रद्धांजली!
- माधव भांडारी
(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत)