जनतेचीही मुलाखत; दोन भावांसाठी प्रश्न...!

    11-Jan-2026   
Total Views |
Uddhav Thackeray and Raj Thackeray
 
राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. युती-आघाडीची समीकरणेही यादरम्यान बदलली. नेहमीप्रमाणे मराठी माणूस, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार वगैरे वगैरे म्हणत, दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यानिमित्ताने मुंबई-पुण्यासह इतर शहरांत असलेल्या निवडणुकीसंदर्भात या दोन भावांबद्दल अनेक लोकांची मते जाणून घेतली. लोकांशी चर्चा करताना अनेकवेळा जे मुद्दे समोर आले, ते सारांश स्वरूपात इथे मांडले आहेत. जनतेच्या मुलाखतीतले हे सत्य. दोन भावांसाठी प्रश्न अणि बरेच काही...
 
लाडक्या बहिणींच्या १,५०० रुपयांवर डोळा का?
 
जो मराठी माणूस ‘मोडेन पण, वाकणार नाही’ म्हणत स्वाभिमानाने जगतो, त्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाबाबत राज ठाकरे म्हणाले की, "आमचा आई-बाप पंधराशे रुपयाला विकला गेला नाही, विकास झाला नाही, असे जर तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये असे वाटत असेल, तर भाजपला मतदान करू नका.” राज ठाकरे यांनी मराठी माणसाची हीच का किंमत केली? ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार्‍या पंधराशे रुपयांवर राज ठाकरेंचा आणि त्यांच्या आता कुठे गळ्यात पडलेल्या भावाचा उद्धव ठाकरेंचा डोळा का? लाडक्या बहिणी आणि त्यांचे कुटुंब कसे जगते, हे या दोघांना माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, जन्मत:च यांच्या तोंडात सोन्याचा चमचा होता. त्यांना सगळ्याच सुख-सुविधा ऐषोआराम न बोलताही हाजीर होता. बरे, भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना लाडक्या बहिणींना पैसे देते; त्याचे जर यांना वाईट वाटते, तर मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे काय पैशाची कमी आहे? मराठी माणसावर इतकेच प्रेम आहे, तर त्यांनी इतरांना सोडा; पण राज्यातील गरीब मराठी कुटुंबांना दत्तक घ्यावे. भाजप-शिंदे शिवसेना सरकार जर महिलांना एक हजार, ५०० देते; तर राज आणि उद्धव ठाकरे दोघांनी मिळून महिलांना दरमहिन्याला आर्थिक मदत करावी. कारण, याच महाराष्ट्रातल्या हिंदूंनी या दोन्ही ठाकरे भावांना मोठे केले. आता परतफेड म्हणून यांचेही कर्तव्य आहेच की. सत्तेत असा किंवा नसा, ते कर्तव्य हे का पार पाडत नाहीत?
 
मराठी माणसांचा प्रश्न... तेव्हा का एकत्र आला नाहीत?
 
आर्थिकदृष्ट्या संपन्न तर सोडाच, अगदी गरीब असलेले मजूर आणि शेतकरीबांधवांच्या घरीही जर मायबाप आजारी असतील, तर दोन भाऊ सबुरीने घेतात. या वयात मायबापाला वेदना नको म्हणून दोन्ही भावंडे कितीही वाद असला, तर शक्यतो नमते घेतात. पण, या दोन भावांनी स्व. बाळासाहेबांच्या भावनांचा विचार केला नाही आणि झाले आपले वेगळे. त्यावेळी या दोघांनी ‘चिकन सूप की, तेलकट वडे’ असा घातलेला वाद महाराष्ट्राच्या अस्मितेला कायमचा डाग देऊन गेला. तर, हे असे दोघे भाऊ आज स्व. बाळासाहेबांचे नाव कोणत्या तोंडाने घेत असतील? सत्तेसाठी एकत्र आलेले हे दोघेजण त्यावेळी स्व. बाळासाहेबांसाठी एकत्र आले असते, तर? हा समस्त मराठी माणसांचा प्रश्न आहे.
 
मुंबई केवळ सत्तेसाठी लाडकी, बाकी...?
 
मुंबईवर संकट येते, तेव्हा हे दोघेजण कुठे असतात? ‘कोरोना’ काळात हे दोघे भाऊ कुठे होते? त्यावेळी रस्त्यावर रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि या विचारधारेचे नागरिक जनसेवा करत होते. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, विविध धार्मिक संस्था आणि यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते होते. हे दोघे पक्षप्रमुख भाऊ ‘कोरोना’ काळात रस्त्यावर उतरले नाहीत. मात्र, हे दोेघे भाऊ जरी रस्त्यावर उतरले नाहीत, तरी त्यांच्या पक्षातले हिंदुत्ववादी असलेले आणि या देशाशी, या समाजाशी देणे-घेणे असलेले कार्यकर्ते-पदाधिकारी आपापल्या परीने काम करत होते. हेच काय, २६ जुलैच्या महाप्रलयातही हे दोघे भाऊ कुठे होते? काय करत होते? याचे विदारक सत्य काही माध्यमे मांडत असतात. मुंबई महानगरपालिकेच्या प्रदीर्घ सत्ताकाळात उद्धव ठाकरेंच्या सत्तेने मुंबईतले रस्ते, पाणी नाले, सार्वजनिक शौचालये, रुग्णालये यांच्या विकासाबाबत काय केले? त्यावेळी भाजप सोबत होता; पण छोट्या भावाच्या लादलेल्या भूमिकेत भाजप होता. त्यामुळे निर्णय घेण्याचे जास्त अधिकार भाजपकडे नसून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडेच असणार. उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानंतर भाजपने मुंबईच्या विकासासाठी सर्व स्तरावर काम केले. कोस्टल रोड, मोनो-मेट्रो रिंगरोड, समृद्धी महामार्गाने आणि तिसर्‍या मुंबईच्या गतिमान कामाने मुंबईच्या विकासामध्ये समृद्ध भूमिका बजावली. पण, तरीही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना ‘मुंबई लाडकी’ हे आठवते.
 
समाजासाठी काय केले? आता बाबासाहेब आठवतात?
 
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात वचननाम्यात म्हणतात की, मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली की, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारणार आहेत. इतकी वर्षे हातात सत्ता असताना त्यांनी हा विचार का केला नाही? या तुलनेत भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर असू दे की, इंदू मिलचे स्मारक असू दे की, दादरच्या ‘चैत्यभूमी’चा विकास असू दे, याबाबतीत ठाम कार्यवाही केली. इतकेच काय, करोडो रुपयांची देवाणघेवाण करत, भगवान गौतम बुद्धांचे ‘पिपरहवा अवशेष’ही भाजपच्या केंद्र सरकारनेच भारतात पुन्हा आणले. या सगळ्याबाबत राज आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय होती? आता मात्र, यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात. दुसरीकडे मराठा आरक्षणाने महाराष्ट्रात मोर्चे-आंदोलन झाले. त्यावेळी ‘हैदराबाद गॅझेट’वर काम करत मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्नही भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनेच केले. हे सगळे होत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरेंच्या घरच्या वर्तमानपत्रात मराठा मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणत त्याची निंदा केली गेली.
 
रोहिंग्या-बांगलादेशी मुसलमानांबद्दल भूमिका?
 
‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व’ म्हणणारे उद्धव ठाकरे, "मला दहीहंडीच्या ऐवजी मटणहंडीला बोलवा” म्हणणारे, कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाबद्दल कुत्सित टीका करणारे राज ठाकरे. हे दोघे नुसतेच हिंदूविरोधी विधान करत नाहीत, तर मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी ते प्रयत्नही करतात. दक्षिण मुंबईचे यांचे खासदार अरविंद सावंत यांना जे मतदान झाले, त्याचे पॅटर्न काय होते? हिंदू उत्तर भारतीय, गुजराती दाक्षिणात्य लोकांना राज ठाकरे थेट परप्रांतीय म्हणत विरोध करतात. मात्र, मुंबईवर अतिक्रमण करणार्‍या बांगलादेशी मुसलमान किंवा रोहिंग्या मुसलमानांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख न करता, कालपरवाच्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की, "इतर राज्यांतून आपल्याकडे विशिष्ट लोंढे येतात.” मागे राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्याचा प्रश्न उचलला होता. काही ठिकाणी भोंगे उतरवण्याचे काम त्यांच्या पदाधिकार्‍यांनी केले. पण, आता त्याचे काय झाले?
 
उद्धव ठाकरेंनी अस्लम शेखला मुंबईचे ‘पालकमंत्री’ केले?
 
उद्धव ठाकरे आता म्हणत आहेत की, ते (म्हणजे भाजप आणि शिवसेना) ‘महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार’ म्हणजे मुंबईतून मराठी-संस्कृती मिटवण्याचे काम करणार आहे. पण, ते विसरले की, ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सगळ्या हिंदू आमदारांना डावलत मालाडचे आमदार अस्लम शेखना मुंबईचा ‘पालकमंत्री’ केले होते. अस्लम शेख यांच्यावर मालाडमधून हिंदूंना पळवून लावण्याचे कटकारस्थान करण्याचा गंभीर आरोप आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा हे मालवणीतील हिंदूंच्या हिताची बात करतात म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना काही महिन्यांपूर्वी धमकी दिली होती. म्हणून हिंदुत्ववादी जनतेने अस्लम शेखविरोधात तीव्र आंदोलन केले होते. अशा अस्लम शेख यांना पालकमंत्री बनवून उद्धव ठाकरे यांनी मुंबईची कोणती मराठी-संस्कृती जपली होती?
 
अंबानींच्या शाही सोहळ्यात कोण होते?
 
उद्धव ठाकरे अदानी-अंबानी वगैरे कुटुंबावर टीका करतात. ‘अदानी-अंबानीला भाजप मुंबई विकणार, मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होणार’ असे सातत्याने म्हणतात. पण, अंबानी यांच्या घरच्या कार्यक्रमात नाचणारे आणि मिरवणारे यांचेच सख्खेपक्के होते. यांच्यासोबत असणार्‍या सुप्रिया सुळेंनी तर अदानी हे त्यांचे लाडके भाऊ आहेत, ही ग्वाहीही दिली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी रोजगार उपलब्ध करून दिले असते, तर गोष्ट वेगळी. पण, तसे नाही. स्वतःही रोजगाराच्या संधी द्यायच्या नाहीत आणि दुसरे कोणी देत असेल तर त्यालाही विरोध. बरे, अदानी-अंबानी काय पाकिस्तानचे आणि देशाबाहेरचे आहेत का? यासंदर्भात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींची काँग्रेस सत्तेत असताना अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याची घटना काय सांगते?
 
इतरही अनेक प्रश्न
 
निवडणुकीच्या संदर्भात लोकांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळातले (त्यावेळी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटही सोबत होता) १०० कोटींचे प्रकरण, साधू हत्याकांड, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, दिशा सालियन आत्महत्या वगैरेंवर शंका उपस्थित केली. याबाबतीत लोकांनी जी काही मते मांडलीत, ती मते मी इथे लिहू शकत नाही. थोडक्यात, महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या या दोन पक्षप्रमुखांबद्दल लोकांचे मत ऐकताना जाणवले की, महाराष्ट्राची जनता त्यातही अर्थात, मुंबईकर आंधळेपणाने कुणासमोरही मान तुकवत नाही; तर विचार करतो. हिंदुत्व ज्यासाठी ३५० वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अठरापगड जाती हिंदू म्हणून एकत्र आल्या होत्या, त्याच हिंदुत्वासाठी मराठी माणूस हिंदू म्हणून जागा झाला आहे. जनतेच्या मुलाखतीमध्ये हे सत्य अनुभवले!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.