प्रभागातील प्रत्येकाच्या समस्येला धावून जाणार्या आणि जिव्हाळ्याचे नाते जपणार्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ‘प्रभाग क्र.२० क’च्या उमेदवार खुशबू चौधरी. त्या पालिकेच्या निवडणुकीला दुसर्यांदा सामोर्या जात आहेत. त्यानिमित्ताने समाजकारण आणि राजकारणाबरोबरच, प्रभागातील नागरिकांशी माणुसकीचे नाते जोपासणार्या खुशबू चौधरी यांच्याशी साधलेला हा संवाद...
आपला प्रभाग हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. पण, यंदा प्रथमच पॅनेल पद्धत असल्याने प्रभागाची कक्षा वाढली आहे. एकाचे चार प्रभाग झाल्याने प्रचाराचा मेळ आपण कसा साधत आहात?
पॅनेल पद्धतीत प्रभाग मोठा झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी वेळही कमी आहे. त्यामुळे आम्ही चौघेही एकमेकांशी संवाद साधून प्रचार करतो. ज्याठिकाणी जास्त नागरिकांशी संवाद साधायचा आहे, तिथे आम्ही चौघेही जातो. दारोदारी प्रचारांवर अधिक भर दिला आहे. त्याठिकाणी आम्ही एकटे-एकटे फिरतो; पण प्रचार करताना संपूर्ण पॅनेलचा करतो. पॅम्प्लेट आणि बॅनर्सच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. प्रचार करणारी रिक्षाही प्रभागात फिरत असते. प्रभागात एरवीही आमचे काम सुरूच असते. नागरिकांशी भेटीगाठी, त्यांच्या समस्या सोडविणे हे आम्ही नियमित करतो.
प्रभाग वाढल्याने प्रचार करताना काही आव्हाने येत आहेत का?
पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, चोळेगाव हा प्रभाग ९५ टक्के भाजपचा आहे. माझा जन्म चोळेगावात झाला. त्यामुळे येथे नातेवाईक आहेत. सारस्वत कॉलनी ही माझी कर्मभूमी आहे. या प्रभागातून २०१५ साली मी प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आली. पेंडसेनगरमध्ये माझे कार्यालय आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या प्रभागांना मी जवळून ओळखते. इंदिरानगर हा प्रभाग फक्त माझ्यासाठी नवीन आहे. त्याठिकाणी आमचे काही नातेवाईक वास्तव्याला गेले आहेत. त्यामुळे तिथेही प्रचार करताना फारसा त्रास होत नाही. एकत्रित चौघांचा प्रचार करत असल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.
महायुतीचे तब्बल २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पुढे आणखीन यश मिळून महायुतीचा महापौर बसेल, असा विश्वास तुम्हाला वाटतो का?
महायुतीची कणखर ताकद आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची चाणक्यनीती यामुळेच कल्याण-डोंबिवलीच्या पारड्यात हे यश पडले आहे. अर्धी लढाई आम्ही निवडणुकीपूर्वीच जिंकलो आहोत. तसेच विरोधकांनी निवडणुकीपूर्वीच नांग्या टाकल्या आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना बळ द्यायलादेखील ते इकडे फिरकत नाहीत. या सर्व गोष्टी महायुतीला पोषक आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुतीचाच महापौर बसेल.
तुम्ही दुसर्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहात. मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत आहे?
मी पुन्हा नगरसेवक व्हावे, हे या परिसरातील नागरिकांचीच इच्छा होती. मला तिकीट मिळाले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसले. ही माझ्या कामाची पोचपावती आहे. आपल्याच घरातील एक व्यक्ती नगरसेवक होत आहे, अशी त्यांची भावना आहे. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिक खूश आहेत. नगरसेवकपदाचा आता अनुभवही गाठीशी आहे. पहिल्यांदा नगरसेवक झाली, ते केवळ रविदादांमुळेच. ते आता प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, कोणाला तरी सांगून ते ‘असे करा, तसे करा’ अशाप्रकारे मार्गदर्शन करत असतात. आज जे काही आहे, ते केवळ रविदादांमुळे. अनुभव असल्याने अनेक टेक्निकल गोष्टीही समजायला लागल्या आहेत. त्यामुळे आणखी चांगल्याप्रकारे काम करू शकते. आता प्रभाग क्र. ‘२० क’मधून निवडणूक लढवत आहे.
महापालिकेची रुग्णालये असो किंवा विकासकामे, यावर नेहमीच टीका होते; तर हे टाळण्यासाठी काय करू शकतो?
महापालिका फक्त करांकडे उत्पन्नाचे स्रोत म्हणून पाहते. पण, उत्पन्नाचे स्रोत वाढवेत, यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. अनेक प्रकल्प निधीअभावी अर्धवट राहतात. म्हणूनच, उत्पन्नाचे स्रोत वाढण्यासाठी अनेक संकल्पना माझ्याकडे आहेत. त्यामुळे नागरिकांवर करांचा बोजा न वाढता, विकासकामेदेखील होतील. निवडून आल्यानंतर एखादे पद मिळाले, तर महिलांसाठी काम करायला आवडेल.
या निवडणुकीत आव्हान काय वाटते?
निवडणुकीला आम्ही सोपी समजून लढत नाही. ते एक मोठे आव्हान आहे. या प्रभागात मी काम केले आहे. त्यामुळे स्वत:वर विश्वास आहे. माझ्यासमोर काँग्रेस आणि वंचित आघाडीचे उमेदवार आहेत. मतदान होईल की, नाही याबाबत चिंता नाही. पण, आपण लोकांना दिलेला शब्द पूर्ण करू की, नाही ते एक आव्हान आहे.
तुमचे भविष्यातील व्हिजन काय आहे?
माझ्या प्रभागाला लागूनच असलेला ठाकुर्लीकडे जाणार्या पुलाचे काम अर्धवट स्वरूपात आहे. हे काम पूर्णत्वास घेऊन जाणे. ठाकुर्ली स्टेशनला उतरल्यावर ‘९० फीट’ रस्त्याकडे जाणारा रस्ता झोपडपट्टीतून जातो. याठिकाणी ‘स्कायवॉक’ व्हावा, त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होईल. पूल तयार झाला की, वाहतुककोंडीची समस्याही कमी होईल. प्राण्यांसाठी दफनभूमीची सोय करावी. या संपूर्ण परिसरात कुठेही अशाप्रकारची व्यवस्था नाही. परिसरात दफनभूमीची आवश्यकता आहे. महापालिकेच्या शाळांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या शाळेतील मुलांमध्ये ‘स्पार्क’ आहे. त्यांची गुणवत्ता ओळखून शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम राबवू.
- जान्हवी मोर्ये